अजितदादांचे खरेखुरे पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्ट आणि शहर भाजपाईंची असंवेदनशीलता!

राजकारणातून समाजकारण आणि पक्षातीत विचारसरणी याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा कायम नावलौकिक आहे. समाजात वावरताना पक्षीय जोडे बाजूला काढून ठेवणे आगत्याचे असते, मानवी संवेदनशीलता जास्त महत्त्वाची, हे अजितदादा यांच्या एकूणच कामकाज शैलीचे वैशिष्ट्य आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आज शनिवारी १६ एप्रिल, २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नामदार अजितदादा पवार प्रमुख म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, अजितदादांनी अचानक आपले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत असा निरोप महापालिका आणि शहर राष्ट्रवादीला पोहोचवला. अजितदादांनी आपले कार्यक्रम का रद्द केले यावर शहरात तर्ककुतर्क चालू असतानाच अजितदादा आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खाजगी रुग्णालयात जीवरक्षा प्रणालीवर उपचार घेत असलेल्या भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे माजी भाजपाई शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यांचे बंधू विजय जगताप यांच्याकडे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करून शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि काही गरज लागली तर कळवा असा निरोप देऊन या जगताप बंधूंना धीर दिला. 

मात्र, पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंची आणि त्यांच्या नेत्यांची असंवेदनशीलता इतकी विदारक की, शहर भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या कार्यक्रमाला हजर असलेले भाजपचे राज्य प्रवक्ते आशिष शेलार यांनी कार्यक्रम रद्द करणे सोडाच, लक्ष्मणभाऊ जगताप यांची साधी भेट घेणेही नाकारले. वस्तुतः ज्यांच्या शहराध्यक्षपदाच्या अंमलाखाली या शहरात अशक्यप्राय असलेली सत्ता भाजपला मिळाली, त्यांची प्रकृती गंभीर असताना साधी भेट देणेही टाळणारे हे भाजपाई किती आपमतलबी आहेत, हेच यावरून दिसून येते. ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाजपाई राज्य प्रवक्ते आशिष शेलार शहरात आले, तो कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम असलातरी, भाजपाई षडयंत्राचा एक भाग असलेला होता.

चिन्मय मांडलेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा हा कार्यक्रम म्हणजे त्याआडून धार्मिक दरी वाढविण्याचा हा एक गदळ प्रकार होता. राज्यात आणि एकूणच राजकारणात अस्थैर्य निर्माण करण्याच्या भाजपाई कार्यक्रमाचा हा एक भाग होता. आपल्याच पक्षाच्या एका आमदाराच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी काळजी करण्यापेक्षा हा कार्यक्रम भाजपाईंना जास्त महत्त्वाचा वाटला, हे सगळ्यात विदारक. त्याहीपेक्षा पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि शहराची सत्ता मिळवून देणाऱ्या आमदारापेक्षा या भाजपाईंनी कार्यक्रमाला महत्त्व दिले हे त्याहून विदारक. 

आता या पार्श्वभूमीवर नामदार अजितदादा यांची संवेदनशीलता जास्त प्राकर्षाने जाणवणारी ठरते. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रयत्नाने या शहरात राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. तरीही आपला एक विधानभवनातील सहकारी, मग तो विरोधी पक्षाचा असलातरी, गंभीर आजारी असताना, कार्यक्रम वगैरे करणे आणि तेही याच शहरात, हे नामदार अजितदादांना गैर वाटले. मात्र, आपल्या पक्षाचा कार्यक्रम राबविण्यापुढे कसलीच तमा न बाळगता या भाजपाईंनी कार्यक्रम पूर्ण केला. त्याहीपुढे जाऊन आपल्याच पक्षाच्या आमदाराला अडचणीच्या वेळी साधी भेट देण्याचेही या मंडळींनी टाळले. पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्टचा डांगोरा पिटणाऱ्या शहर भाजपाईंनी पॉलिटिक्स फॉर सेल्फ बेनेफिट असेच दर्शन दाखविले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यापुढे ही मंडळी किती तोकडी अगर थिटी आहेत, हेच यावरून स्पष्ट होते.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×