ओबोसींनी ठेवले आंबेडकरांसह फुलेही अस्पृश्यच!…..आणि यांना म्हणे ओबीसी आरक्षण हवंय!

सोमवारी, ११ एप्रिल २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी विचार प्रबोधन पर्व २०२२ चे उदघाटन झाले. मागची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कोणताही समारंभ होणे शक्य नव्हते. कोरोना महामारीचे निर्बंध उठल्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात हा उदघाटन समारंभ पार पडला. दरवर्षी प्रमाणे महात्मा फुले जयंतीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत महापालिकेमार्फत आयोजित  होणाऱ्या या विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात अगदी थाटामाठात झाली. आंबेडकरी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून या दोनही विभूतींना मानाचा मुजरा दिला. मात्र, काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सोडले तर, सर्वच म्हणजे कथित आणि तथाकथित ओबोसींनी मात्र, या सोहळ्याकडे अक्षरशः गदळ पद्धतीने पाठ फिरवली. राजकीय, आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरून घेणाऱ्या, राक्षसी आकांक्षा पूर्ण करून घेणाऱ्या या ओबोसींची ही आश्चर्यकारक पाठ फिरवणी पाहिल्यावर, महात्मा फुले यांच्या एकशे पंच्याण्णवव्या जन्मदिनीही आंबेडकरांसह फुलेही या मंडळींनी अस्पृश्यच ठरविले आहेत! …..आणि यांना म्हणे ओबीसी आरक्षण हवंय!

महात्मा जोतीराव फुले यांच्या दलितोद्धारक आणि समाजसुधारक कार्यक्रमाला शेण दगड मारून आणि मारेकरी घालून विरोध करणारे, लहानग्या भीमाला तो महार आहे म्हणून गाडीतून खाली उतरवणारे सनातनी, कर्मठ, ब्राह्मणी लोक आणि आजचे हे महात्मा फुले यांच्या जयंतीकडे पाठ फिरविणारे ओबीसी लोक, यांच्यात कोणताही फरक नाही. आपल्या सुमारे पासष्ट टक्के ओबीसी समाजाला ही मंडळी राजकीय आरक्षण मागताहेत. मात्र, त्यासाठी त्रिस्तरीय माहिती म्हणजेच इम्पिरीकल डेटा नाकारणारी ब्राह्मणी व्यवस्था जितकी दोषी आहे, तेव्हढीच, किंबहुना त्याही पेक्षा जास्त आरक्षणाला संवैधानिक बनविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या विचार पर्वाकडे पाठ फिरविणारे कथित आणि तथाकथित ओबीसी, हे दोनही घटक, सारख्याच प्रमाणात नालायक आणि नामुराद आहेत.

यांच्या नालायकपणामुळेच आरक्षण धोक्यात आले!

ब्राह्मणी पगड्यात जीवनव्यापन करणारे हे समस्त समाजघटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या अनुयायांना कधीच जवळ करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आंबेडकरांनी भारताच्या संविधानात आरक्षण मांडले नसते तर काय, याचाही विचार ही मंडळी करीत नाहीत. ब्राह्मणी व्यवस्थेने या ब्राह्मणेतर लोकांना कायम समाजसुधारकांच्या विरोधात हत्यार म्हणून वापरले आहे, आजही ते तसे वापरले जाताहेत. समाजसुधारकांनी तरीही आपला समाजहितकर कार्यक्रम पुढे नेला, पार पाडला. आरक्षण मागणारे मराठा, अनुसूचित जातीत समावेश मागणारे धनगर आणि आपले आरक्षण गेले म्हणून टाहो फोडणारे पासष्ट टक्के ओबीसी यांनी आरक्षणाची सोया करणाऱ्या डॉ. आंबेडकरांना आणि त्यांच्या अनुयायांना कायम दूर ठेवले, ही स्वयंस्पष्ट वस्तुस्थिती आहे. त्याहीपेक्षा विदारक प्रकार म्हणजे, महात्मा फुले यांनाही या ओबीसी मंडळींनी दूरस्थ करून अस्पृश्य ठेवले आहे.

स्वतःला ब्राह्मणी जोखडाखाली राखण्यात धन्यता मानणारे हे सकल ओबीसी, मराठा ही जात नसून प्रांतवार संबोधन आहे, हे माहिती असूनही आपल्या शहाण्णव कुळींचा अगदी अलीकडे, म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आलेला मिथ्याभिमान पोसणारे मराठा, हे सर्व घटक खरोखरच आरक्षण मिळविण्याच्या लायकीचे आहेत काय, हा खरा प्रश्न आहे. कारण ही मंडळी खऱ्या अर्थाने एहसान फरामोश आहेत. आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे यांना नको आहेत, तसेच या आरक्षणाचे मूळ निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या महात्मा जोतीराव फुले देखील यांच्या पचनी पडत नाहीत, किंबहुना, ते पचविण्याची वकूब आणि लायकी या मंडळींमध्ये नाही.

प्रातिनिधिक स्वरूपात पिंपरी चिंचवड शहरातील हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र देशी सारखेच आहे. जे काही मातब्बर आसामी या आरक्षणासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर झगडताहेत, ते प्रामाणिकपणे फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा घेऊन कार्यरत आहेत. मात्र, हे काही थोडके लोक सोडले तर, आरक्षणाची आस असलेल्या इतरांना यातील खाचा, खस्ता नको आहेत. आयत्या मिळालेल्या कोणत्याही बाबीची किंमत कळत नाही, हेच खरे!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×