भाजपाई शहराध्यक्षांचा प्रसिद्धीचा अतिरेकी हव्यासच भाजपला बुडवणार?

समाज माध्यमांचा वापर करून सवंग आणि खोटी प्रसिद्धी मिळविण्याची अतिरेकी प्रसिद्धीलोलुपता, हा समस्त भाजपाईंचा स्थायीभाव आहे. पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्ष आमदारांनी तर यासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केली आहे. ही यंत्रणा काहीही आणि कशीही, अगदी खोटी देखील माहिती समाज माध्यमांद्वारे पसरविण्याचा प्रयत्न करीत असते. अशीच एक खोटी पारपत्रिका (टेम्प्लेट) नुकतीच “महेशदादा लांडगे फॅन क्लब” नावाच्या फेसबुक पानावरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील बारा वर्ग आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून संगणकीकृत (डिजिटल) करण्यात येणार असून त्यासाठी एकतीस लाखांचा निधी खर्च होणार आहे, आशा आशयाची ही पारपत्रिका झळकवण्यात आली आहे. या पारपत्रिकेत भारतीय जनता पक्षाच्या आजीमाजी शहराध्यक्ष आमदारांच्या छबीसह भाजपची प्रसिद्धी साधण्याचा घाट घातला गेला आहे. मात्र, वास्तवात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बारा वर्गांचे संगणकीकरण करण्यासाठी जो एकतीस लाख रुपयांचा आमदार निधी खर्च होत आहे, तो शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या निधीतून होत असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी अगदी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष आमदारांचा दुरान्वयेही संबंध नसताना, “मीच केलं” आशा आशयाची ही पारपत्रिका, महेशदादा लांडगे फॅन क्लबच्या फेसबुकवर का प्रसिद्ध करण्यात आली असावी, याबाबत प्रसिद्धीचा अतिरेकी सोस यापेक्षा वेगळे कोणतेही कारण शोधून सापडत नाही. येनकेन प्रकारेण सतत प्रसिद्धी मिळवत राहण्याचा हा उद्योग करण्यासाठी भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांची आख्खी यंत्रणा काम करीत असते. एखाद्याचा पिछवाडा वाजला तरी, तो भाजपाई शहराध्यक्ष आमदारांच्या कर्तृत्वाचा भाग असल्याचा डांगोरा पिटण्याची या यंत्रणेची तयारी असते. त्यासाठी फेसबूकवर पाच ते सहा पाने, या यंत्रणेद्वारे सुरू करण्यात आली आहेत. शहरात काहीही नवीन झाले, की ते भाजपाई शहराध्यक्षांमुळेच कसे झाले, हे दर्शविण्यासाठी, हा फॅन क्लब नावाचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा प्रसिद्धीची हवा देणारा फॅन क्लब, प्रसिद्धीची हवा काढून घेणारा “एक्झॉस्ट फॅन क्लब” ठरणार नाही ना, हे पाहणे आगत्याचे आहे.

पिंपरी चिंचवड महापलिकेच्या बारा वर्गखोल्या संगणकीकृत ( डिजिटल ) करण्यासाठी आपला आमदार निधी वापरताना अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, आपण समाजाचे उत्तरदायित्व म्हणून हे काम केल्याचे सांगताहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, महापालिकेच्या शाळेत शिकणारे जवळपास सगळेच विद्यार्थी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आणि दुर्बल घटकातील असतात. त्यांना संगणकीकृत वर्गखोल्या उपलब्ध करून देऊन आम्ही समाजासाठी असलेले आपले योगदान देत आहोत, यात वेगळे असे काही नाही. संगणकीकृत शिक्षण मिळाले तर हे विद्यार्थी लवकर संगणक साक्षर होतील, म्हणून हा निर्णय घेतला आहे. 

आमदार निधी मधून अशा प्रकारच्या बाबींवर खर्च करता येतो, हे आमदार अण्णा बनसोडे यांनी दाखवून दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष आमदारांचा निधी कोठे गेला, कशावर खर्च झाला, याचे अलाहिदा संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गत आर्थिक वर्षासाठी सुमारे तीन कोटींचा आमदारनिधी प्रत्येक आमदाराला स्वतःच्या मतदारसंघात विविध समाजोपयोगी कामांसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तीनही आमदारांनी आपापल्या आमदारनिधीतून काय कामे केली, याची माहिती दरवर्षी जाहीर करावी अशी मागणी, या निमित्ताने मतदारसंघातील मतदारांनी केली पाहिजे. त्याचबरोबर बारा वर्गखोल्या संगणकीकृत करण्यासाठी एकतीस लाख खर्च होतो, हे स्पष्ट झाल्यामुळे, भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने महापालिकेच्या शाळा संगणकीकृत म्हणजे डिजिटल करण्यासाठी किती आणि कसा खर्च केला आहे, काम अजून पूर्ण का झाले नाही, यात काही घपला तर नाही ना, याची चौकशी लवकरात लवकर होणे अति आगत्याचे झाले आहे.

आपले माजी शहराध्यक्ष गंभीर आजारी असताना, त्यांचेही नाव वापरून अशी खोटी प्रसिद्धी मिळविण्याचे या भाजपाई पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांना आणि त्यांच्या यंत्रणेला कसे सुचत असेल, यावरही अलाहिदा संशोधन होणे गरजेचे आहे. “काहीही बोल, प्रसंगी खोटे बोल, पण रेटून बोल”, अशी सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा हा प्रकार नक्कीच किळसवाणा ठरतो. पण खरे बाहेर आले तर आपली नाचक्की होईल आणि अनेकदा ती तशी झालीही आहे, तरीही याची भीती आणि लज्जा या यंत्रणेला का वाटत नसावी, हे अनाकलनीय आहे. अर्थात काहीही करून प्रसिद्धी मिळवायचीच हा या मंडळींचा मुख्य उद्देश असल्याने, भाजपाई शहराध्यक्षांची ही यंत्रणा, अगदी किळसवाणी देखील प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात, हा भाग अलाहिदा!

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×