भोसरीच्या बैलगाडा शर्यती रद्द, भाजपाई शहराध्यक्ष आमदार लांडगेंसाठी नामुष्की?

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, न्यायालयासमोर शड्डू ठोकून, आपल्यामुळेच परवानगी मिळाल्याचा आव आणून, पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्या स्वतःच्या गावात, भोसरीत, बैलगाडा शर्यती रद्द झाल्याची नामुष्की, सध्या आमदार लांडगे यांच्यावर आली आहे. बैलगाडा शर्यतींसाठी बांधण्यात आलेल्या घाट, बैल आणि माणसे दोहोंसाठीही योग्य नाही असा निर्वाळा शासकीय यंत्रणेने दिल्यामुळे या बैलगाडा शर्यती तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. गावकीभावकीच्या बळावर राजकारण करण्याचा दावा करणाऱ्या आमदार महेशदादा लांडगे यांना त्यांच्याच भोसरीच्या गावकीभावकीने फाट्यावर मारल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. भोसरीगावचे ग्रामदैवत भैरवनाथांचा, दोन दिवसांचा उत्सव, येत्या सोमवारी, १८ एप्रिल २०२२ पासून सुरू होत आहे. पूजाअर्चा, छबिना यांसह उद्या बैलगाडा शर्यतींचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र, या बैलगाडा शर्यती रद्द झाल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने शर्यतीचा घाट योग्य नसल्याचा निर्वाळा दिल्यामुळे शर्यती रद्द झाल्याची प्रथमदर्शनी माहिती असलीतरी, भोसरी गावच्या या राजकारणात काही वेगळेच शिजत असल्याचा वास येत असून, याचा संबंध भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांची ही पराभावी नामुष्की असल्याची चर्चा शहरात आहे.

भोसरी गावातील हा बैलगाडा शर्यतीचा घाट दुरुस्त करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे करण्यात आली होती. उत्सव समितीच्या म्हणण्यानुसार ही दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या यंत्रणेने दिली आहे. मात्र, तरीही घाट योग्य नसल्याची माहिती शासन यंत्रणेने दिली आहे. त्याहीपुढे जाऊन भोसरीच्याच काही मंडळींनी घाट योग्य नसल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच शासकीय समितीने घाटाचे पुनर्निरीक्षण करून, घाट योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अगदी गोव्यात यशस्वी झालेले आमदार भोसरीत फेल कसे!

स्वतःला मिडास स्पर्शाची ताकद असल्याचे भाजपाई शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे म्हणणे आहे. ते जिथे जातात तिथे, “कामयाबी पहले पहूंचती है”, असा त्यांचा लौकिक आहे. आत तो खराच आहे, की त्यांच्या प्रसिद्धी यंत्रणेने तसा आपणहून तयार केला आहे, यावर वेगळे सखोल संधोधन करावे लागेल, हा भाग अलाहिदा. मात्र, दृश्य तर असेच निर्माण करण्यात आले आहे की, महेशदादा काहीही करू शकतात. पण मग, भोसरीच्या आपल्याच भाईबंदांचे एकमत करण्यात त्यांना का अपयशाची नामुष्की पत्करावी लागत असावी, हे तसे सारासार विचारशक्तीच्या पलीकडले आहे.

भोसरीच्या उत्सवातील राजकारणाचा धांडोळा घेतला असता, अनेक सुरस आणि तरीही गंभीर बाबी समोर येताहेत. भोसरीकरांमध्ये या बैलगाडा शर्यतीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते भोसरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाचा उत्सव आणि चिखलीचा ग्रामउत्सव एकाच वेळी असल्याने बैलगाडा शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या गाडा मालकांवर ताण येईल आणि त्यांना योग्य तयारीनिशी शर्यतीत भाग घेणे कठीण होईल. त्यामुळे ग्रामउत्सवातील बैलगाडा शर्यत थोडी लांबणीवर टाकावी. मात्र, काहींच्या मते ग्रामउत्सव हा ठरल्या दिवशी, ठरल्या पद्धतीप्रमाणे झाला पाहिजे. ज्यांना भाग घ्यायचा आहे, ते घेतील आणि ज्यांना अशक्य असेल, ते घेणार नाहीत. ग्रामउत्सव महत्त्वाचा, की कोणालातरी संधी मिळणे महत्त्वाचे, हे ठरविले पाहिजे.

या सर्व प्रकरणात एक तिसरा छिद्रांवेशी म्हणजे फाटक्यात बोटे घालणारा गटही कार्यान्वित आहेच. तो गट ग्रामउत्सव समितीसमोर वेगळे बोलतो आहे, तर बैलगाडा मालकांसमोर वेगळी भाषा वापरतो आहे. थोडक्यात सध्या ग्रामउत्सवाची सगळीच गावगुंडी चालू आहे. मात्र, या सर्व गावगुंडीत भाजपाई शहराध्यक्ष आमदार हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोव्याचा आमदार निवडून आणण्याची धमक असलेल्या आमदारांना आपल्याच गावच्या चार डोक्यांना एकत्र आणता येऊ नये, म्हणजे जर अतीच झाले.

अनेक तुकड्यांची मोट बांधण्यात वाकबगार असलेले भोसरीचे आमदार आणि त्यांची यंत्रणा, आपल्याच गावातील, आपल्याच भाईबंदांना एकत्र आणून, एखाद्या बाबीवर त्यांच्यात एकमत घडवून आणू शकत नसतील, तर भोसरीच्या या आमदारांचा पुढचा काळ नक्कीच सुकर नाही. गोव्यात यशस्वी झालेले भाजपाई शहराध्यक्ष आमदार, पिंपरी चिंचवड शहरातील त्यांच्याच गावाच्या, त्यांच्याच भाईबंदांना एकत्र करू शकत नाहीत असे चित्र सध्यातरी स्पष्टपणे दृष्गोचर झाले आहे. ही प्रभावी नामुष्की आमदारांच्या पदरी का पडली असावी, यावर अलाहिदा संशोधन होणे अत्यावश्यक आणि क्रमप्राप्त आहे. मात्र, सांप्रतला आमदारांची आपल्याच गोतावळ्यावरील पकड ढिली झाली आहे, हे स्वयंस्पष्ट आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×