शहर काँग्रेसची साडेसाती संपली आहे?

शहराच्या राजकीय सत्ताकारणात शून्यवत असलेली काँग्रेस पुन्हा बाळसे धरू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही झाले तरी काँग्रेसची आजची अवस्था, येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अगदीच मोडीत काढून गुंडाळण्याजोगी नक्कीच राहिलेली नाही हे नक्की! गेल्या ऑक्टोबर २०२१ मध्ये काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची खांदेपालट होऊन इंटकच्या माध्यमातून कामगार चळवळीत असलेले डॉ. कैलास कदम शहराध्यक्ष झाले. त्यानंतर आतापर्यंतच्या सुमारे साडेसात महिन्यात काँग्रेसच्या मागची साडेसाती संपली किंवा संपण्याच्या वाटेवर आहे, असे म्हणण्या इतपत काँग्रेसने नक्कीच बाळसे धरले आहे. एकेकाळी शहराच्या सत्ताकारणात एकमेव असलेली काँग्रेस पुन्हा जिवंत करण्याचे श्रेय्य नक्कीच कामगारनेते कैलास कदम यांना द्यावे लागेल. मात्र, केवळ कोंडाळ्यापूरता मर्यादित न ठेवता काँग्रेसच्या मतदारांपर्यंत हा जिवंतपणा नेण्याचे कठीण काम डॉ. कैलास कदम कितपत करतात हे महत्त्वाचे आणि त्यानंतरच हे नव्याने आलेले बाळसे, खरे आहे की नुसतीच सूज, हे स्पष्ट होणार आहे.

गेल्या साडेसात महिन्यात सुरुवातीचे भाजपाई सत्ताकाळातील उणेपूरे सहा महिने आणि त्यानंतरच्या प्रशासक राजवटीतील उणापुरा दीड महिना या कालावधीत काँग्रेसने आपणही शहरात आहोत, हे दाखवून दिले आहे. कधी पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधक म्हणून असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर तर कधी एकट्याने आंदोलने, मोर्चे करून, काँग्रेस शहरात अस्तित्व ठेऊन असल्याचे दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. अर्थात यापूर्वीच्या काँग्रेस शहाराध्यक्षांनी पक्षाची धुगधुगी ठेवली म्हणूनच आताच्या शहराध्यक्षांना काँग्रेसला संजीवनी देणे शक्य झाले, हेही जितके महत्वाचे, तेव्हढेच, काही अक्षम्य चुकांमुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस सत्ताकारणातून बाद झाली, हेही महत्त्वाचे. त्याहीपेक्षा, पुन्हा तश्या चूका होऊ न देणे आणि शहर काँग्रेस कोंडाळ्यात राहणार नाही हे पाहणेही गरजेचे.

काँग्रेसला पुन्हा “ते दिवस” दिसतील काय?

शहराच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण होईपर्यंत काँग्रेसचे पूर्ण अधिपत्य पिंपरी चिंचवड शहरात होते. अगदी सुरुवातीला कालवश अण्णासाहेब मगर आणि त्यानंतर कालवश प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पूर्ण अंमलाखाली या पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली आहे. शहराच्या विकासाची पायाभरणी या दोन नेत्यांच्या दुरदृष्टीतून झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी या पायभारणीवर शहर विकासाची इमारत उभी केली. मात्र, काँग्रेस पक्षाची पिछेहाटही राष्ट्रवादीने ठरवून केली. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर काँग्रेसला या शहरात कोणतेही मोठे नेतृत्व उरले नाही. राज्यातील काँग्रेस नेतृत्वानेही अगदी ठरवून केल्यासारखे या शहराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीकडे पळाले आणि काँग्रेसला शहरात घरघर लागली. राष्ट्रवादी अस्तित्वात येण्यापूर्वी या शहरात भाजप आणि शिवसेना हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखी राखण्यात काँग्रेसच्या त्यावेळच्या अण्णासाहेब आणि मोरेसरांनी यशस्वी प्रयत्न केले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हे का साधता आले नाही, यावर अलाहिदा संशोधन आणि लेखन करावे लागेल.

आजच्या मितीस पिंपरी चिंचवड शहराच्या सत्ताकारणात काँग्रेस पक्ष नाही. ही मोडकळीस येऊन अडगळीत पडण्याची अवस्था काँग्रेसवर का आली याचा विचार राज्यातील आणि देशातील कोणत्याही नेतृत्वाने कधीच केला नाही. अर्थात देशात आणि राज्यातही काँग्रेसची अवस्था फार काही चांगली आहे, असे दृष्गोचर नाही, हा भाग आणखी वेगळा. राहता राहिला पिंपरी चिंचवड शहराचा प्रश्न. तर, पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचा म्हणून एक वेगळा मतदार नक्कीच आहे. आता तो मतदार, समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या पदरात आहे. काँग्रेसच्या आताच्या शहराध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी भरोसा दिला तर, तो मतदार नक्कीच काँग्रेसकडे पुन्हा वळेल. आता हा भरोसा शहर काँग्रेसने शहरातील आपल्या मतदारांना कसा द्यायचा याचा विचार काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी करायचा आहे. पुन्हा या पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसचे “ते दिवस” काँग्रेसला दिसतील काय, हे आता या नवीन कर्त्याधर्त्या मंडळींच्या हातात आहे. मात्र, त्यासाठी या मंडळींनी आपल्याच कोंडाळ्यापूरती काँग्रेस न ठेवता सामान्य मतदारांना काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे काळच ठरवेल.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×