उमेदवार कोण, संभ्रम कायम? चिंचवड विधानसभा निवडणूक (भाग २)

प्रचाराचा एक दिवस कमी करून येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीच्या नावाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीने बुधवार दि. २५ जानेवारी रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केवळ चिंचवड विधानसभा निवडणुकीसंबंधीच प्रश्न विचारावेत असा अप्रत्यक्ष दम पालकमंत्र्यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समस्त पत्रकारांना दिला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी अजून महिनाही ज्यांच्या दुःखद निधनाला झाला नाही अशा कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी आणि भाऊ यांना उजवी डावी कडे ठेऊन जगताप कुटुंबियात कोणताही बेबनाव नाही हे सुचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वस्तुतः या निवडणूक पूर्वतायरीच्या बैठकीत लक्ष्मणभाऊंचे बंधू शंकरराव आणि पत्नी अश्विनी यांनी उपस्थित राहणे अजिबात अगत्याचे नव्हते. ही पूर्वतयारी करताना पक्षप्रणालीतील लोक आणि इतर कार्यकर्ते असते तरी चालण्यासारखे होते. मग अशा अनाकलनीय पद्धतीने या द्वयींना बोलावण्याची प्रयोजन काय, या बाबत शहरभर चर्चा सुरू झाली आहे. 

कालवश आमदार लक्ष्मणभाऊंचे राजकीय वारस कोण यावर तशीही उलटसुलट चर्चा आहे. त्यांच्या कुटुंबात सगळे काही आलबेल नाही अशी कुजबुज आहे. मग भाजपाई पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कुटुंबात समेट घडवून आणण्यासाठी ही बैठक आयोजली काय आणि बैठकीत या द्वयीला बोलावले होते काय आणि त्याही पुढे जाऊन जगताप कुटुंबात असा समेट घडवून आणण्याचा भाजपाई प्रयत्न कितपत यशस्वी झाला, याबाबत आता शहरभर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक नव्हती असे निक्षून सांगणाऱ्या भाजपाई पालकमंत्र्यांना आपल्या डावी उजवी कडे जगताप कुटुंबीय बसवावेसे का वाटले असावे, याबाबतही आता जाणकार चर्चा करताहेत. याबाबतचे ज्ञातव्य असे की, पोट निवडणुकीत उमेदवारी कुटुंबातील कोणाला द्यावी, याचा निर्णय कुटुंबाने एकत्र बसून घ्यावा, असे सांगण्यासाठी या द्वयींना बोलावण्यात आले होते असे अंतर्गत सूत्रांकडून सांगण्यात येते आहे.

महाविकास आघाडी की स्वतंत्र उमेदवार हाही संभ्रमच!

आतापर्यन्तच्या म्हणजे विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये ज्यांनी कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ते सर्व या पोट निवडणुकीत कंबर कसून आहेत. सहानुभूती वगैरे काही नाही, निवडणूक लढवायचीच अशी प्रत्येक भाजपविरोधकांची इच्छा सरेआम आणि खाजगीत अनेक बोलून दाखवीत आहेत. २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवार म्हणून लढलेले राहुल कलाटे यांनी तर निवडणुकीची खुलेआम तयारी सुरू केली आहे. त्यांच्याच बरोबरीने भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, विठ्ठल तथा नाना काटे यांनीही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा असा आग्रह धरला आहे. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याला पूर्ण ताकद देऊ असा या मंडळींचा घोषा आहे.

कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाई शिर्षस्थांनी घाईघाईत निवडणूक तर लावली, मात्र मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही निवडणूक असणार आहे, हे नक्की! लक्षणभाऊंचा नक्की वारसदार कोण, याबाबत अनेक मतमतांतरे चिंचवड विधानसभेत आहेत. काहींच्या मते भाऊंचे बंधू शंकरराव यांना उमेदवारी मिळावी, तर काहींना भाऊंच्या पत्नी अश्विनी यांना संधी द्यावी, असे वाटते. ही निवडणूक लढविणे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय गरज आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गेल्या वेळी झालेल्या लढतीचा दाखल देऊन ही निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या सव्वा वर्षात कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरात घेतलेली उभारिपूर्ण भरारीही नजरंदाज करून चालणार नाही.

थोडक्यात काय तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार आता गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. “कोणता झेंडा घेऊ हाती” हा सनातन प्रश्न सध्या मतदारांना पडतो आहे. हा संभ्रम पुढच्या एक दिड आठवड्यात संपेल असे वाटत असले तरी, निवडणूक वाजल्यावर कोणाच्या, कधी आणि किती वेगात अंगात येते, हे अगदीच अनाकलनीय असते. 

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×