अजितदादांना अचानक लक्ष्मणभाऊंचा गहिवर आला तर काय?

कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा परस्पर स्नेह हा पिंपरी चिंचवड शहरासाठी कायम चर्चेचा विषय राहिला आहे. तसे पाहिले तर लक्ष्मणभाऊंची एकंदर राजकीय कारकीर्द केवळ अजितदादांमुळेच घडली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १९८६ पासून सलग तीन वेळा नगरसेवक, त्यातही स्थायी समिती अध्यक्षपद आणि महापौरपद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद, विधान परिषदेचे अपक्ष आमदार, त्यानंतर २००९ साली चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यावर अपक्ष आमदार, त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करून भाजपचे शहराध्यक्षपद, २०१४ आणि २०१९ असे सलग चिंचवड विधानसभेचे आमदार अशी सलग सदतीस वर्षांची दैदिप्यमान अशी राजकीय कारकीर्द लक्ष्मणभाऊंनी अक्षरशः भोगली आहे. मात्र नंतरच्या २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूक वगळता या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला लक्ष्मणभाऊंना अजितदादा पवार यांचे पाठबळ राहिले आहे, असे इतिहास सांगतो.

आता लक्ष्मणभाऊ नाहीत, त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकरराव आता उमेदवारीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत अजितदादा पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या बाबतीत मोठाच गहिवर दाखवला आहे.  मग आता देखील या पोट निवडणुकीत अजितदादांच्या गहिवर पुन्हा उफाळून येऊ शकतो काय? मुळात असा गहिवर अजितदादांना आहे, याबाबत अनेकांना लघु आणि दीर्घ अशा शंका उपस्थित होऊ शकतात.या समस्त शंकांचे निरसन करण्यासाठी अजितदादा आणि लक्ष्मणभाऊ यांच्या संबंधांवर इतिहासात जाऊन उजेड पडावा लागेल. त्याचाच हा प्रयत्न.

नामदार अजितदादांनी अनेकवेळा दुसऱ्याची संधी त्याला डावलून लक्ष्मणभाऊ जगताप यांना दिली आहे. १९९३ मध्ये भाऊ स्थायी समिती अध्यक्ष झाले. त्यावेळी प्रा. रामकृष्ण मोरे यांनी भाऊसाहेब भोईर यांच्या नावाचा आग्रह धरून लक्ष्मणभाऊंना विरोध दर्शविला होता. मात्र, बंडखोरीची भाषा वापरून अजितदादांनी लक्ष्मणभाऊंच्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ घातली. त्यानंतर २००० साली आझमभाई पानसरे यांनी योगेश बहल यांच्या नावाचा आग्रह धरून सर्व निश्चिती केल्यावरही, अजितदादांच्या आग्रहाखातर ऐनवेळी योगेश बहल यांना माघार घेण्यास भाग पाडून लक्ष्मणभाऊ जगताप यांना महापौरपदी बसविले. २००३ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून भाऊंची वर्णी लागली.  २००४ साली पुणे जिल्हा स्वायत्त संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेची जागा तेव्हाचे आमदार शिवाजीराव भोसले यांच्या निधनाने रिक्त झाली होती. काँग्रेस पक्षाने चांदुकाका जगताप यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस यांची राज्यात आघाडी असतानाही, केवळ अजितदादांनी लक्ष्मणभाऊंना अपक्ष निवडणूक लढविण्यास भाग पाडले. एव्हढेच नव्हे तर त्यांना मतदान करावे म्हणून जिल्ह्यातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना फतवा काढून भाऊंना विजयही मिळवून दिला. 

२००९ साली नव्याने तयार झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आघाडीतील काँग्रेस पक्षाची उमेदवारी भाऊसाहेब भोईर यांना असतानाही अपक्ष उमेदवार म्हणून लक्ष्मणभाऊ जगताप यांना ताकद दिली आणि भाऊसाहेब भोईर यांचा पुन्हा एकदा बळी दिला. एव्हढे करूनही २०१४ साली लक्षणभाऊ जगताप यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन भाजपशी गाठ बांधली आणि शहरात भाजपाई मुळे रोवण्यास सुरुवात करून दिली. भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर एकीकडे लक्ष्मणभाऊ आणि दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडून आलेले महेशदादा लांडगे यांच्याशी संगनमत करून पिंपरी चिंचवड शहराला २०१७ साली भाजपच्या दावणीला बांधले. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे २०१४ पासून अगदी आजतागायत अजितदादा पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे या दोहोंनाही कधी ठाम विरोध केल्याचे निदर्शनास आले नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाण्याला मुख्यत्वे कारणीभूत असलेल्या या द्वयीला अजितदादांनी ठरवू  नजरंदाज केले असल्याचेच गेल्या आठ वर्षात दिसले आहे. त्यातही लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या बाबतीत अजितदादांना विशेष गहिवर असल्याचेच आजवर निदर्शनास आले आहे. आता लक्ष्मणभाऊ हयात नाहीत, त्यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे, आशा परिस्थितीत पुन्हा नामदार अजितदादांच्या हा गहिवर उफाळून आला तर काय? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांमध्ये निर्माण झाला आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×