लक्ष्मणभाऊंच्या वारसदारांमध्ये वाद, समर्थक “परिंद्यांची” भूमिका आतबट्ट्याची?

अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील बेबनाव आणि वाद चव्हाट्यावर आलाच. लक्ष्मणभाऊंच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ३१ जानेवारी पासून ७ फेब्रुवारी पर्यंत आहे. काल गुरुवार दि. २ फेब्रुवारी रोजी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातून त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकरराव यांनी वेगवेगळ्या वेळी उमेदवारी अर्ज नेल्यामुळे हा कुटुंबातील वाद सर्वस्पष्ट झाला आहे. भाजपच्या वतीने या दोहोंपैकी कोणा एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात असले तरी, दोघांनीही निवडणूक लढविण्याची दुर्दम इच्छाच या प्रकारातून प्रकट केली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता भाजपाई शिर्षस्थ नेते कोणाला उमेदवारी देतात यावरून हा गृहकलह किती वाढेल यावर सांप्रतला जोरदार चर्चा सुरू आहे. 

लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या हयातीत चिंचवड विधानसभा क्षेत्रावरच नव्हे तर, पिंपरी चिंचवड शहराच्या मोठ्या भूभागावर आपला एकछत्री, निर्विवाद अंमल आणि अंकुश ठेवला होता. या भागात लक्ष्मणभाऊंच्या परवानगीशिवाय “परिंदा भी पर नही मार सकता” अशी परिस्थिती होती. एखाद्याला स्वतःसाठी घर मिळण्यापासून ते अगदी त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने जगता यावे इथपर्यंत भाऊंच्या अंमलदारांची परवानगी लागत होती. पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोणताही ठेका अगर कोणतेही काम भाऊंच्या परवानगी शिवाय सुरू किंवा बंद करणे अगदी कलिकाळालाही कालत्रयी देखील शक्य नव्हते. लक्ष्मणभाऊ जगताप यांची राजकीय कारकीर्द तर, राजकारणावर पूर्ण वर्चस्व आणि परिसरातील सार्वभौमत्व निर्माण करणारी ठरली आहे. १९८६ पासून २०२३ पर्यंत उणेपूरे सदुतीस वर्षे हा निर्विवाद आणि निरंकुश अंमल राखण्यात लक्ष्मणभाऊंना यश मिळत गेले आहे.

सम्राटपद भोगलेल्या व्यक्तीच्या निधनाने त्याच्या साम्राज्याची वाताहत होते हा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा विचका म्हणावा की काय अशी परिस्थिती संप्रतला चिंचवड विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. सत्ता आणि संपत्तीसाठी गृहकलह होणे ही बाब काही नवी नाही. मात्र, ज्याच्या साम्राज्यावर “परिंदा भी पार नही मार सकता” अशी परिस्थिती होती, तिथे आता “परिंदोंका झुंड मंडरा रहा है!” खरे म्हणजे आता या उत्तराधिकाऱ्यांनी या बाबीचा विचार करायला हवा. आज लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरात त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकरराव यांच्यातच सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. शंकरराव जगताप आणि अश्विनी जगताप या दोहोंमध्ये लक्ष्मणभाऊंचे समर्थक परिंदे विभागले गेले आहेत. आता हे सगळे परिंदे आपापल्या दाणापाण्यासाठी स्वतःच्या सोयीनुसार शंकरराव आणि अश्विनी जगताप यांच्यात वितंडवाद निर्माण करीत आहेत.

लक्ष्मणभाऊंच्या या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पेटलेला वाद कितपत पराकोटीचा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. अश्विनी जगताप यांनी स्वतःच्या नावाने चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे, तर शंकरराव जगताप यांनी देखील आपल्या समर्थकाद्वारे उमेदवारी अर्ज मागविल्याची माहिती, त्यांच्याच गोटातून प्रसूत करण्यात आली आहे. याशिवाय भाजपाई नेत्यांकडून हा वाद मिटविण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबात फूट पडू नये यासाठी प्रयत्न केले. तरीही या दोनही व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवारी अर्ज मागवून आपापली तयारी सुरू केली आहे.

आता हा कौटुंबिक वाद किती मोठ्या प्रमाणात उफाळतो, की भाजपाई नेते तो शांत करण्यात यशस्वी होतात, हे येत्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईलच. मात्र या दोहोंचेही समर्थक “परिंदे” हे भांडण आणि वाद मिटू देतील काय हा खरा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×