अण्णा बनसोडे म्हणतात, “होय, मी सव्वा तास मुख्यमंत्र्यांच्या गाडीत होतो!”

परवा मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी  पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीत मंत्री उदय सामंत यांच्यासह आढळून आले. अण्णा बनसोडे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक असल्याचे बोलले जाते. मग अजितदादांचे समर्थक बाळासाहेबांची शिवसेना या राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीत कसे, यावर दृक्श्राव्य माध्यमांमधून दिवसभर दळण दळण्यात आले. या दळणाचे मुख्य कारण म्हणजे पिंपरीच्या लगत असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली पोट निवडणूक होय. मात्र, अण्णा बनसोडे यांनी ” होय, मी मुख्यमंत्र्यांच्या गाडीत होतो आणि मंत्रालय ते मुख्यमंत्र्यांचे ठाणे येथील घर हे अंतर पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे सव्वा तास मी त्या गाडीत होतो”, हे मान्य करून टाकले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी पिंपरीच्या काही प्रश्नांबाबत चर्चा करायची होती, मुख्यमंत्र्यांनी गाडीत बोलू म्हटल्यावरून मी गाडीत बसलो, असेही सांगून टाकले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मतदारसंघाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात गैर काय असेही अण्णा बनसोडे यांनी आपल्या प्रवासाचे समर्थन केले आहे. 

प्रसिद्धी माध्यमांनी हे दळण दळण्याचे मुख्य कारण म्हणजे, चिंचवडची ही निवडणूक बिनविरोध करावी आणि कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील ज्याला भाजप उमेदवारी देईल, त्याला पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य आमदार अण्णा बनसोडे यांनी ही पोट निवडणूक जाहीर झाल्याझाल्या केले होते. कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांची आणि अण्णा बनसोडे यांची घनिष्ट मैत्री सर्वश्रुत होती. त्यानंतरही लक्ष्मणभाऊंनी भाजपशी जवळीक साधल्यावरही ही मैत्री आपल्या पातळीवर अभेद्य होती. पण म्हणून अण्णा बनसोडे भाजपमध्ये गेले नाहीत. अर्थात राष्ट्रवादीचे शिर्षस्थ नेते नामदार अजितदादांनी देखील लक्ष्मणभाऊंशी असलेले संबंध उघड मान्य केले आहेत. मात्र, “ष्टोरी” बनवण्याच्या नादात प्रसिद्धी माध्यमांनी अण्णा बनसोडेंच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या प्रवासाचे दळण दळले.

त्यावर आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी नवनायक ने संवाद साधला असता, त्यांनी आपल्या सव्वा तासाच्या प्रवासाचे रहस्य उजागर केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राज्य सरकारशी निगडित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही वेळ उपयोगी पडली, हे अण्णा बनसोडेंचे म्हणणे रास्त असण्यात काहीच  गैर नसावे. मग प्रसिद्धी माध्यमांनी या प्रवासाला इतके महत्त्व देऊन दिवसभर का दळले असावे, हा प्रश्न शिल्लक राहतो. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियमित बैठकांना अण्णा बनसोडे गैरहजर असतात, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. मात्र, महत्वाचे काही असल्यास अगर आंदोलने, पक्षधोरणांबाबाबत निर्णय यावेळी ते उपलब्ध असतातच असे त्यांनी या पूर्वीही स्पष्ट केले आहे. 

त्याचबरोबर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्ताधार्ता नामदार अजितदादा पवार यांनीही यापूर्वी कोणीही गैरहजर असलंइ तरी, ते आमच्या बरोबरच हे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, दळण दळण्याच्या नादात प्रसिद्धी माध्यमांना या गोष्टीचा हेतुतः विसर पडत असतो, हे मात्र विशेष!

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×