भाजपाईंना भाऊंच्या कुटुंबात आमदारकी असावी, असे खरेच वाटते काय?
भाजपाई यंत्रणेने लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली खरी, पण त्या विजयी व्हाव्यात असे वाटणारे किती लोक शहर भाजपमध्ये आहेत, यावर संशोधन करावे लागेल. जसे अश्विनी जगताप यांनी उमेदवारी जाहीर झाली, तसेच ही हिस्सेदारी टाळण्यासाठी काय करता येईल यावर शहर भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे. याचाच परिपाक म्हणजे अश्विनी जगताप यांना पक्षाची उमेदवारी देताना भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी पर्यायी उमेदवार (डमी कँडीडेट) म्हणून शंकरराव जगताप याचे नाव नमूद केले आहे. वस्तुतः लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या एक विधान परिषद आणि तीन विधानसभेच्या उमेदवारीचे अर्ज त्यांचे बंधू शंकरराव जगताप यांच्या देखरेखीखालीच भरण्यात आले आहेत. त्यावेळी कधीही पर्यायी उमेदवार म्हणून कोणी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली नव्हती. मग आता अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी देताना, उमेदवारीचे प्रमुख दावेदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकरराव जगताप यांचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची वेळ का आली असावी, हे अनाकलनीय आहे.
उमेदवारी अर्ज चुकण्याची अगर काही त्रुटी राहण्याची शक्यता असल्यास अशा प्रकारे पर्यायी उमेदवार अर्ज भरला जातो. उमेदवारी अर्ज भरताना कोणती माहिती कशा पद्धतीने द्यायची याची माहिती अर्जाबरोबर उपलब्ध करून देण्याची पद्धत अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून राष्ट्रपतींच्या उमेदवारी पर्यंत प्रचलित आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करून घेणारे अधिकारी देखील उमेदवारांच्या विनंतीवरून अर्ज तपासून देतात, असा प्रघात आहे. जेणेकरून उमेदवारी अर्जात कोणती त्रुटी राहू नये, असे पाहिले जाते. शिवाय लक्ष्मणभाऊंच्या कार्यालयीन कामकाजाची पूर्तता करण्याची सवय शंकरराव जगताप आणि त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पुरेपूर आहे. मग असे असताना पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जगताप कुटुंबियांवर का यावी हा खरा प्रश्न आहे. यावरूनच अजूनही मतभेद मिटल्याचे दर्शविले जात असले तरी लक्ष्मणभाऊ जगताप याच्या कुटुंबियामध्ये मनभेद असल्याचे दिसते.
लक्ष्मणभाऊंचा वचक आणि वकुब शाबीत राखण्यात त्यांच्या वारसदारांना यश मिळेल काय हाही प्रश्न आहेच. १९८६ च्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांच्या निधनापर्यंत लक्ष्मणभाऊ जगताप यांचा वचक शहराच्या राजकारणावर राहिला आहे. त्यांचा वकुब मोठाच होता याबद्दलही कोणाला आक्षेप अगर शंका असण्याचे कारण नाही. त्यांच्याबद्दल असणारे प्रेम, स्नेह, व्यावसायिक सलोखा, आदर, आदरयुक्त भीती अगर नुसतीच भीती असणंरे लोक, लक्ष्मणभाऊंच्या शब्दाबाहेर नव्हते. मात्र त्यांच्यानंतर त्यांचा शब्द पाळणारे, त्यांच्या कुटुंबियांसाठी कितपत कारगर शाबीत होतील, हा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यातही व्यक्तिगत प्रेम, स्नेह, आदर असणाऱ्यांचे ठीक आहे, मात्र व्यावसायिक सलोखा, आदरयुक्त भीती अगर नुसतीच भीती असलेले लोक काय करतील याचा भरवसा नाही. त्यामुळे जो वचक आणि वकुब लक्ष्मणभाऊंनी राखला, तो त्यांच्या कुटुंबियांना राखता येईल किंवा कसे, हे येत्या काही दिवसात नक्कीच स्पष्ट होईल.
राहता राहिला तो, कुटुंबात सर्व काही आलबेल आहे काय, हा प्रश्न. आता लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली असली तरी पर्यायी उमेदवार म्हणून शंकरराव जगताप यांचे नाव दिले आहे आणि शंकररावांनी तसा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. ही उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर या कुटुंबात वाद होते हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. शंकरराव जगताप यांनी भाजपची उमेदवारी स्वतःला मिळावी म्हणून प्रयत्न केला नाही, असे म्हणता येणार नाही. त्याचबरोबर शंकररावांना विरोध करून ही उमेदवारी मिळविण्यात अश्विनी जगताप यशस्वी झाल्या आहेत, हेही मान्य करावे लागेल. पडद्यामागे घडलेल्या घटना फारशा लपून राहिलेल्या नाहीत. कुटुंबसलोखा राखण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही लपून राहिलेले नाही. तरीही भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी देताना पर्यायी उमेदवार म्हणून शंकरराव जगताप यांना नामनिर्देशित केले आहे आणि शंकररावांनी तसा अर्जही दाखल केला आहे.
भाजप विरोधक महाविकास आघाडीतही काही सरळ आणि सुरळीत नाही हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने चिंचवड मतदारसंघ लढवायचा नक्की केल्यानंतर काल अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या चर्चा घडवून आणल्या आहेत. सुरुवातीला २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत या चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून लढलेले राहुल कलाटे यांना या पोट निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी आग्रह धरून आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्या असा तगादा लावल्यावर विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. आता नाना काटे यांनी तर उमेदवारी अर्ज भरला आहेच, मात्र राहुल कलाटे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतही बिघाडी होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आज दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तसे विहित कालावधीत चाळीस उमेदवारांचे त्रेपन्न अर्ज चिंचवडच्या या पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यातील छाननीत किती टिकतील हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईलच. मात्र, अश्विनी जगताप आणि शंकरराव जगताप यांच्यापैकी कोणाचा, मुख्यत्वे अश्विनी यांचा अर्ज बाद होतो काय हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. तसे झाले तर अनायासे शंकरराव जगताप भाजपचे अधिकृत उमेदवार ठरतील. अर्थात या दोघांचेही अर्ज छाननीत टिकले तर, येत्या दहा तारखेला म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसअखेर पर्यंत ही निवडणूक चौरंगी होईल, तिरंगी असेल की, एकास एक उमेदवार राहून दुरंगी लढत पाहायला मिळेल, हे स्पष्ट होईलच.
आता आपला मूळचा प्रश्न, शहरातील भाजपाईंना कालवश लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील उमेदवार असावा असे खरेच वाटते काय?
विद्यमान भाजपाई शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि दिवंगत माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या शहराचे दोन भाग वाटून घेतले होते. राज्याचे भाजपचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गळ्यातले ताईत म्हणून सध्या महेशदादा लांडगे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याच आशिर्वादाने शंकरराव जगताप यांच्याऐवजी अश्विनी जगताप यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता हे सर्वश्रुत गुपित आहे. संपूर्ण शहरावर हुकूमत गाजवण्याची संधी या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांना मिळणार आहे काय, हेही स्पष्ट होणार आहे, हे या चिंचवडच्या पोट निवडणुकीचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे, हे एक अलाहिदा समीकरण असणार आहे.
———————————————————-