राहुल कलाटेंच्या माघारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे “देव पाण्यात”!

माघारीच्या एक दिवस आधीपासूनच चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मोठमोठ्या हस्तींचा हस्तक्षेप आतापासूनच या निवडणुकीत सढळ हस्ते होताना दिसतो आहे. निवडणुकीच्या रिंगणातील एकूण तेहतीस वैध उमेदवारांपैकी कोणीही अजून माघार घेतलेली नाही. प्रमुख उमेदवारांचा विचार केला तर, ही निवडणूक तिरंगी होईल असे सध्याचे तरी दृश्य आहे. यात कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे किंबहुना महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी ही तिरंगी लढत आहे. उमेदवारी माघारीसाठी आज म्हणजे १० फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत निवडणुकीतील प्रमुख दावेदार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून महाविकास आघाडी प्रमाणेच भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली होत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक म्हणजे या उभयतांनी येनकेन प्रकाराने राहुल कलाटेंंनी माघार घ्यावी म्हणून “देव पाण्यात” ठेवल्यासारखे मनावर घेतले आहे.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वेगवेगळ्या क्र्लुप्त्या वापरण्यास सुरुवात केली गेली आहे. यासाठी विविध मंडळींकडून राहुल कलाटे यांना समजावून सांगण्याची पहिली पायरी संपून गेली आहे. कोणाच्याही सांगण्याने कलाटे बधत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर आता आमिषांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यात विधान परिषद, एखादे महामंडळ, यांसह अगर यांशिवाय काही खोक्याची बेगमी करण्याची भाषाही बोलली जात आहे. आद्यपपावेतो राहुल कलाटे या आमिषांना बळी पडलेले नाहीत, हे स्पष्ट असले तरी, आजचा दुपारपर्यंतच दिवस नक्की कोणकोणते खेळ दाखविणार आहे, माहीत नाही. या पुढचा प्रयत्न हा ईडी, बिडी, काडी, चौकश्या, फाजील वावड्या, खोट्यानाट्या बातम्या, एखादी दीर्घकाळ चालणारी बदनामी असाही असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

खरे म्हणजे हे प्रयत्न भाजप आणि सहयोगी पक्षांकडून होताहेत हेच मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. राहुल कलाटे यांची उमेदवारी राहिल्याने खरा घाम फुटायला हवा तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीला. कारण दृश्य असे निर्माण करण्यात आले आहे की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वाटणे उमेदवार असलेले विठ्ठल उर्फ नाना काटे आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यातच खरी लढत होईल. त्याही पुढे जाऊन अशीही चर्चा करण्यात येते आहे की, राहुल कलाटे यांनी उमेदवारी ठेवल्यास महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणे अटळ आहे. मात्र, राहुल कलाटे यांनी ही निवडणूक लढवू नये म्हणून ज्या पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीने जे प्रयत्न करायला हवेत, ते करताना राष्ट्रवादीचा एकही नेता दिसत नाही. जे प्रयत्न चालू आहेत, त्यात वेळकाढूपणा आणि काहीतरी केल्याची हौस भागविण्याचाच प्रयत्नच जास्त दिसतो आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची उमेदवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना का घातक ठरू शकते, हे कळणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही. या अशक्यतेच्या शक्यता पडताळण्यासाठी आजची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याशिवाय कळणे अशक्य आहे. अर्थात त्यासाठी राहुल कलाटे यांनी कोणत्याही प्रकारे आपली उमेदवारी मागे घेऊ नये हे महत्त्वाचे. दाखविलेल्या आमिषांना राहुल कलाटे बळी पडले नाहीत तर ही निवडणूक तिरंगी तर होईलच, पण त्याहीपेक्षा प्रेक्षणीय म्हणजेच रंगतदार देखील होईल. मात्र, या निवडणुकीत राहुल कलाटे यांना इतके असाधारण महत्व का प्राप्त झाले आहे आणि भाजपाई शिर्षस्थ नेते राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी मागे घेण्यास का सांगत नाहीत, यावर अलाहिदा संशोधन होणे गरजेचे आहे आणि “नवनायक” यावर उजेड पडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. अर्थात ही लढत अशी तिरंगी  राहिली तरच!

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×