राहुल कलाटेंची शिट्टी वाजली, “झुकता नही स्स्साला”!

अखेर चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले. अनेकांनी अनेक पद्धतीने जंगजंग पछाडूनही राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेऊन शिट्टी वाजवली आणि “झुकेगा नही स्स्साला!” हा आपला बाणा कायम ठेवला. राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी आपापल्या पक्षांचा विचार करून मतदारांपुढे उमेदवार आणले. कमीतकमी पर्याय शिल्लक ठेवल्यास नाईलाजाने लंगड्या घोड्यालाही अबलख असल्याचा भास होतो आणि राजकीय पक्ष नेमके तसेच करतात, हा नियमित पायंडा आहे. राजकीय पक्षांच्या या पायांड्याला शिंकाळुन एखादा उमेदवार स्वतःच्या हिंमतीवर ज्यावेळी मतदारांना सामोरे जातो, त्यावेळी निकोप स्पर्धा होण्याची शक्यता निर्माण होते आणि राहुल कलाटे यांनी नेमके हेच केले आहे. जाणकार आणि प्रसिद्धी माध्यमांचे सर्व अंदाज खुंटीला टांगून निवडणुकीचे वातावरण लोकशाहीला पोषक ठेवण्याचे काम केल्याबद्दल खरे म्हणजे राहुल कलाटे यांचे अभिनंदन करायला हवे. 

चिंचवडच्या या पोट निवडणुकीत एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. मान्यताप्राप्त पक्षांचे भाजपच्या वतीने अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे हे दोन वगळता सव्वीस उमेदवार पर्याय म्हणून आता मतदारांना उपलब्ध आहेत. हीच बाब निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यास उपयोगी ठरणार आहे. मग आता एव्हढे अठ्ठावीस उमेदवार असतानाही निवडणूक तिरंगी कशी असा प्रश्न पडू शकतो. मात्र, मतांचे विभाजन करण्याची ताकद आणि मगचा इतिहास याचे आकलन यासाठी महत्वाचे ठरणार आहे. राहुल कलाटे यांच्या उमेदवारीचा खेळ आणि घोळ झाल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केला. अर्ज भरल्यावरही तो माघारी घ्यावा म्हणून अनेकांनी आटापिटा केला.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून आणि भाजपच्या एकूणच शिर्षस्थ मंडळीकडून आमिषे, प्रलोभने, आणि इतरही पर्यायांचा वापर झाला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहेर यांच्यासह यांच्याच मार्फत दस्तुरखुद्द उद्धवजी ठाकरे यांच्याशी बातचीत झाल्यावरही राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी कायम राखली. अशा प्रकारची बातचीत झाल्यावर माघार घेतली जाते, असा सर्वसाधारण प्रघात असतानाही राहुल कलाटे रिंगणात आहेत. याचाच अर्थ निवडणुकीसंबंधी त्यांचे आडाखे आणि आराखडे तयार आहेत, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. आता २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुकांचा अनुभव आणि त्यात झालेल्या चुका सुधारून पुन्हा कामाला लागण्याची विजिगिशू वृत्ती ठेऊन राहुल कलाटे या चिंचवडच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकूण सव्वीस अपक्ष आहेत, त्यापैकी राहुल कलाटे एक असे सांगितले. मात्र, या सव्वीस पैकी एकाने उमेदवारी अर्ज भरू नये, भरला तरी माघारी घ्यावा म्हणून दस्तुरखुद्द सुनीलअण्णा शेळके मनधरणी करीत होते ते का? शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, आणखी कोणकोण, एकट्या राहुल कलाटेंनी माघार घ्यावी म्हणून आटापिटा केला आहे. मात्र, राहुल कलाटेंनी निवडणुकीची शिट्टी फुंकली आहे. आता हा शिट्टीचा घुंघुरनाद कितपत घुमतो आणि त्याला किती  प्रतिसाद मिळतो, हे येता काळ ठरवेल.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×