चिंचवडची भरकटलेली आणि नात्यागोत्यात गुरफटलेली पोट निवडणूक!
निवडणूक मुद्द्यांवर लढली जावी असा एक साधा प्रघात आहे. मात्र, चिंचवड विधानसभेची ही निवडणूक मुद्द्यांवरून भरकटत चालली आहे काय, असा संशय निर्माण होतो आहे. त्याचबरोबरीने गाववल्या नात्यागोत्यात अडकून ही निवडणूक अजून गुरफटली गेल्याचेही चित्र निर्माण होते आहे. निवडणुकीच्या तिरंगी लढतीतील तीनही रंग नात्यागोत्याच्या बेरंगात बुचकाळले जात आहेत. या नात्यागोत्याच्या पलीकडे देखील मतदार आहेत याचा विसर निदान भाजपच्या प्रचार यंत्रणेला तरी पडायला नको. कारण भाजपची ती पद्धत नाही. तरीही आपल्या विरोधातील उमेदवारांची आडनावे आपल्या कशी बरोबर आहेत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपची प्रचार यंत्रणा करीत आहे. तर कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना आम्ही कसे उपयोगी पडलो याची वाच्यता करून लक्ष्मणभाऊंना मानणाऱ्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीकडून केला जातो आहे.
लक्ष्मणभाऊ जगताप यांनी परिसराचा कसा विकास केला आणि म्हणून मतदार आम्हाला मते देतील, असा कंठारव भाजपाई करताहेत. मात्र हा सगळा विकास करताना लक्ष्मणभाऊ जगताप सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तेचीच मदत घेत होते, हे हेतुपुरस्सर झाकून ठेवण्याचा प्रयत्न भाजपाई करताहेत. भाजपच्या सत्ताकाळात स्वतःचाच विकास साधण्यात समस्त भाजपाई मश्गुल होते, हे त्याकाळातील कार्यपद्धतीवरून सहज लक्षात येण्याजोगे आहे. आपले नातेवाईक, सगेसोयरे यांची उखळे पांढरी करण्यासाठी या सर्वच भाजपाईंनी सत्ता अक्षरशः वापरली, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा बाजूला राहून त्या विकासातून साधलेला स्वाहाकार जास्त दिसेल ही भीती भाजपाईंना आहे. म्हणून मग आता नात्यागोत्याच्या राजकारणाचा आसरा घेऊन मतदारांना मूर्खात काढण्याच्या पद्धती अवलंबला जात आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि तोडीचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आडनाव असलेले नातेवाईक कसे आपल्या बरोबर आहेत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. आमकेतमके काटे, कलाटे यांच्याबरोबरची छायाचित्रे खरेदी केलेल्या प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःचीच फसवणूक असल्याचेही या मंडळींच्या लक्षात येत नाही. किंबहुना, आले तरी त्याकडे कानाडोळा करण्याचा दुराग्रह पाळला जात आहे. उमेदवारी अर्ज भरून एक आठवडा उलटून गेला तरी, निवडणूक रंगविण्यात भाजपाई अपयशी ठरले आहेत. अगर असेही म्हणता येईल की आपणच निवडणूक मारू असा भ्रम समस्त भाजपाईंना झाला आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सोडून खऱ्याखुऱ्या प्रचाराला भाजपाई कधी सुरुवात करताहेत, याकडे लक्ष्मणभाऊ जगताप यांचे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही वेगळे काही चाललेले नाही. दिखाव्यापुरता प्रचार ही पद्धत सर्रासपणे राष्ट्रवादीकडून अवलंबली जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे नात्यागोत्याच्या गराड्यापलीकडे अजूनही पोहोचले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. वस्तुतः महाविकास आघाडीचा मेळावा घेतल्यामुळे एक चांगली सुरुवात या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, या मेळाव्यातील भाषणे आणि त्याचा हेतू यांची पूर्णतः फारकत झाल्यानेच जास्त स्पष्ट झाले. हा संपूर्ण मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गुणगान आणि महत्ता पटवून देण्यातच खर्ची झाला. उमेदवाराला त्याचा किती फायदा झाला, यावर खरोखरच संशोधन करावे लागेल. वज्रमुठ , गद्दारांचे सरकार, पाठीतले चाळीस खंजीर, खोके – ओके याचीच चर्चा या मेळाव्यात झाली.
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे “बेडूक फुगून बैल होत नाही” यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विशेष भर दिला. मात्र आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील बत्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनीच कितीतरी “बेडूक, फुगवून बैल करण्याचा” शिरस्ता अगर पायंडा पडला असल्याचे ते विसारताहेत, हे दुर्दैवी. आता त्याहीपुढचा भाग असा की, इतर सव्वीस अपक्षांपैकी एक राहुल कलाटे आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एकूणच महाविकास आघाडीचे लोक करताहेत. भाजपाई सुद्धा तोंडदेखले पद्धतीने राहुल कलाटे हे इतरांसारखेच एक अपक्ष उमेदवार असे संभावितपणे म्हणताहेत. मात्र, या अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे नाव घेतल्याशिवाय या दोघांचाही प्रचार पूर्णच होत नाही. राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढताहेत की दोनही पक्ष राहुल कलाटे यांच्या विरोधात लढताहेत, यावर गंभीरपणे संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.
———————————————————