जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्यांच्या नाकात वेगळा मोती ओवलाय का?
गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. सर्वपक्षीय नगरसदस्यांनी या दोनही सेंटर चालविणाऱ्या ठेकेदारांवर यथेच्छ तोंडसुख घेऊन हे दोनही ठेकेदार महापालिकेचे कोविड सेंटर चालविण्यास नालायक असल्याची चर्चा केली. रुग्णसेवेला घातक असलेल्या या ठेकेदारांवर येत्या दहा दिवसात कारवाई करावी, असा फतवा महापौरांनी आयुक्तांना बजावला. आयुक्त हा फतवा मान्य करून कारवाई करतील की नाही, अशी शंका घेऊन त्याबाबत पुढचा पवित्रा म्हणून पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र ही तक्रार करताना अगर त्याविषयी आयुक्तांना तगादा लावताना जम्बो कोविड सेंटरला का वगळण्यात आले, हे आकलनाच्या पलीकडचे आहे.
ऑटो क्लस्टर कोविड सेंटर चालविणाऱ्या फॉरचून स्पर्श हेल्थकेअर बाबत ज्या तडफेने आणि वेगाने कारवाईचा आग्रह धरण्यात आला, तो वेग आणि ती तडफ जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्या मेड ब्रोज हेल्थकेअर डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई व्हावी म्हणून दाखविण्यात आली नाही. किंबहुना या सर्व प्रकरणातून जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्या मेड ब्रोज हेल्थकेअर ला अलगद बाजूला काढण्यात आले. मग जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्या मेड ब्रोज हेल्थकेअर च्या नाकात कोणता आणि कोणाचा वेगळा मोती ओवला आहे, याचे संशोधन व्हायला हवे. नवनायकने यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला. या संशोधनातून एक वेगळेच सत्य निदर्शनात आले. मेड ब्रोज चे संचलन करणारी मंडळी भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आणि धडाडी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनात अगर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांत नाही. भाजपचा मोती नाकात घालून त्याच नाकाने कांदे सोलणाऱ्या मेड ब्रोज वर वेगळी मेहेरनजर दाखविणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपईंना अगत्याचे आणि महत्त्वाचे आहे.
मेड ब्रोज संचलित जम्बो कोविड सेंटरबाबत अनेक आक्षेप आहेत. त्यातील सगळ्यात मोठा आक्षेप म्हणजे येथील कामगार, कर्मचारी खरोखरच मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत असे बोलले जाते. कोविडग्रस्त रुग्णांच्या मृतदेहावरील दागिने आणि त्यांचा इतर किमती ऐवज चोरीला जाण्याच्या तीन घटना आतापर्यंत पोलीस तक्रारीपर्यंत गेल्या आहेत. मृतदेह अंतिम संस्कारांसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. वेगळ्या यंत्रणेमार्फत हे संस्कार केले जातात. त्यासाठी नेताना मृतदेह पूर्णतः बंद करून दिला जातो. मृताच्या नातेवाईकांना केवळ तुमचा आप्त मृत झाला आणि अमुक ठिकाणी अंत्यसंस्कार आहेत, एव्हढेच सांगितले जाते. आपला आप्त निधन पावला म्हणून दुःखात असलेल्या नातेवाईकांना त्याचा इतर ऐवज नंतर न्या, असे सांगण्यात येते. अनेक हेलपाटे मारूनही हा ऐवज परत दिला जात नाही. आपला व्यक्तीच राहिला नाही, म्हणून अनेक नातेवाईक नाद सोडून देतात. तर काही प्रकरणी पोलीस तक्रार होते.
जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्या मेड ब्रोज कडून अप्रशिक्षित कामगार कर्मचारी वापरून काम चालविले जाते, हे कर्मचारीच मृतदेहावरून किमती ऐवज काढून घेतात अशी चर्चा आहे. अत्यावस्थ रुग्ण जम्बो कोविड सेंटरच्या अप्रशिक्षित कामगार, कर्ममचाऱ्यांकडूूून हाताळताना योग्य खबरदारी घेतली जात नाही. दाखल केलेेेल्या रुग्णाची माहीती नातेेेवाईकांंना योग्य पद्धतीने दिली जात नाही. आत चालत गेलेला रुग्ण मृतदेहाच्या रूपाने बांधूनच बाहेर येतो. अशी जम्बो कोविड सेंटरची ख्याती आहे. सगळ्यात जास्त म्हणजे अठरा ते वीस टक्के मृत्युदर असलेल्या या कोविड सेंटरमध्ये अप्रशिक्षित कामगार कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची हेळसांड होते आणि रुग्ण मृत्यूच्या दारात येतो. थोडक्यात येथे रुग्ण सोडणे म्हणजे मरायलाच सोडणे असे आहे. ही चर्चा इतर कोणी नाही तर, चक्क आपल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आमसभेत केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रदीर्घ चाललेल्या ज्या आमसभेत आरोपांच्या फैरी झाडून स्पर्शला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले गेले, त्याच आमसभेत जम्बो कोविड सेंटर कसा अनागोंदीचा कहर करणारा मृत्यूचा सापळा आहे, हे देखील उच्चारवाने सांगितले गेले. या दोनही सेंटर चालकांवर दहा दिवसांत कारवाई करावी आणि यांच्याकडून काम काढून घेऊन यांना काळ्या यादीत टाकावे, असे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले असतानाही एकाला पायदळी आणि दुसऱ्याला मांडीवर हा न्याय का? कारण जम्बो कोविड सेंटर चालविणारी मेड ब्रोज हेल्थकेअर ही संस्था महापालिकेतील सत्ताधारी भाजपची लाडकी संस्था आहे. भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाच्या ज्या ज्येष्ठ, श्रेष्ठ नगरसेवकांनी आरडाओरडा केला त्यापैकी काहींना केवळ स्पर्शला हाकलून द्यायचे होते. मेड ब्रोजने रुग्ण मारून टाकले तरी चालतील, तिथून मृतांच्या अंगावरचे दागिने आणि इतर किमती ऐवज काढून घेतला जाऊन मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार अगदी वाच्च्यार्थाने झाला तरी चालेल, मेड ब्रोजला कोणी काही करू शकत नाही. कारण मेड ब्रोजच्या नाकात भाजपचा विलोभनीय आणि देखणा मोती ओवला आहे.
––—————————–——————–