भोसरीच्या हरकती आणि प्रभागरचनेचे लचके!

भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि मतदार विशेष जागरूक आहेत आणि त्यांच्या एव्हढे राजकीय स्वारस्य इतर विधानसभा मतदारसंघातील नागरिक, मतदारांमध्ये नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निमित्त आहे, येत्या पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभागरचनेचे. १ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. १३९ नगरसदस्यांसाठी तीन जणांचे ४५ आणि चारचा एक अशी सेहेचाळीस प्रभागांची रचना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. १४ फेब्रुवारी, दुपारी तीन वाजेपर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या विहित वेळेत ५ हजार ६६४ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात जास्त हरकतींचा पाऊस भोसरी विधानसभा मतदारसंघातील भोसरी, दिघी, चऱ्होली या गावातुन पडला आहे. याशिवाय कासारवाडी आणि दापोडीतील प्रभागांसाठीही मोठ्या प्रमाणात हरकती सूचनांचा उपलब्ध झाल्या आहेत. यातील साडेचार हजारांहून अधिकच्या हरकती एकट्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. त्यामुळे भोसरीकर विशेष जागरूक आहेत, आणि बाकीचे मतदार झोपले आहेत काय, असा संशय निर्माण झाला आहे.

हरकती सूचनांचे गठ्ठे आणि कार्यकर्त्यांची पळापळ!

पिंपरी चिंचवड महापालिकेतील निवडणूक विभागात आणि महापालिकेच्या आठ प्रभाग कार्यालयांमध्ये या हरकती, सूचना स्वीकारण्याची सोय होती. मात्र, सर्वाधिक हरकती मुख्य कार्यालयात उपलब्ध झाल्या आहेत. त्यातही गंभीर तरीही गंमतीचा भाग म्हणजे, यातील नव्वद टक्के हरकती, शंभर ते पाचशेंच्या गठ्ठ्याने आल्या आहेत. या गठ्ठ्याने आलेल्या हरकती एकाच प्रकारच्या झेरॉक्सवर केवळ नाव, आधार क्रमांक, मतदार कार्ड क्रमांक आणि सही टाकून देण्यात आलेल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे केवळ दोन किंवा तीन लोक, हे शंभर ते पाचशे हरकतींचे गठ्ठे घेऊन येत होते, त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, हे गठ्ठे घेऊन येलारे लोक, राजकीय कार्यकर्ते अगर राजकीय कार्यकर्ते, नेत्यांच्या कार्यालयातील पगारदार नोकर होते. थोडक्यात या गठ्ठ्याने आलेल्या हरकती राजकीय हेतूने प्रेरित होत्या, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

राज्य निवडणूक आयोगाने मात्र, हरकती आणि सूचना दाखल करणारे व्यक्तिशः सुनावणीला आले नाहीत, तर त्या हरकती आणि सूचना निरस्त केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाने, गठ्ठ्याने हरकती आणून देणाऱ्या लोकांनाच, त्या गठ्ठ्यातील हरकतदारांना सुनावणीसाठी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी दिली आहे आणि तसे त्यांच्याकडून लिहूनही घेतले आहे. त्यामुळे सुनावणीच्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी, या गठ्ठ्यातील किती हरकतदार हजर राहतील, त्यावर त्या हरकतींची वैध संख्या अवलंबून आहे. या हरकतींना राजकीय वास असल्याचे प्रमुख कारण म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपाई मंडळींनी, एकूणच प्रभागरचनेच्या बाबतीत आक्षेप घेतले असून, निराकरण झाले नाही, तर न्यायालयीन लढाईची भाषा वापरली आहे. म्हणूनच हा हरकतींचा डोंगर कृत्रिमरीत्या तयार केला जात आहे, ज्यामुळे न्यायालयीन वादात या हरकतींची संख्या प्रभागरचना चुकीची झाली आहे, हे दर्शविण्यासाठी वापरता येईल.

प्रभागरचनेचे लचके, २०१७ मध्ये भाजपने जे केले, तेच त्यांच्या नशिबी आले!

राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडी सरकारने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०२२मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना, चुकीची आणि त्यांच्या उमेदवारांना सोयीची प्रभागरचना तयार केली आहे, असा पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंचा मूळ आक्षेप आहे. हे भाजपाई असे आरोप करताहेत की, प्रभागांचे लचके तोडून नविन प्रभागरचना करण्यात आली आहे. मात्र, हा आरोप करताना या मतिमंद, गतिमंद भाजपाईंच्या हे लक्षात येत नाही, की पूर्वी चारचा प्रभाग होता, तीनचा करताना, पूर्वीच्या प्रभागाचा काही भाग तोडावाच लागेल, त्याशिवाय चाराचे तीन करणे शक्य नाही. पण या भाजपाईंना केवळ गोंधळ घालायचा आहे आणि या गोंधळाचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही.

त्याचबरोबर शहर भाजपाईंनी २०१७च्या महापालिका निवडणुकीत प्रभागरचना करताना राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारच्या अधिपत्याखाली आणि स्वतः नेमलेल्या चाणक्याच्या देखरेखीखाली करून घेतली होती. २०१२ च्या निवडणुकीतील तीनच्या प्रभागांना अगदी बादरायण संबंध नसलेलेही भाग जोडून नवीन चारची प्रभागरचना तयार केली. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांना सोयीचे प्रभाग करताना जी लफडी, कुलंगडी शहर भाजपाईंनी केली, ती आणि तशीच आता आघाडीच्या राज्य सरकारने केले असल्यास त्यात, शहर भाजपाईंनी उद्विग्न होऊ नये. मात्र, आपण केले, ते पुण्य आणि दुसऱ्याने केले, ते पाप, हा जुना भाजपाई खेळ, शहर भाजपाईंनी का करावा हे अनाकलनीय आहे. प्रभागरचना करताना दबावतंत्र वापरून भाजपाईंनी जो घोळ गोंधळ घातला होता, तो त्यावेळी योग्य असल्याची भाजपाईंची भावना होती, मग आता जर तसा घोळ गोंधळ झाला असेल, तर भाजपाईंनी गदारोळ करू नये, हेच आता उत्तम!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×