भाजपाई शहराध्यक्ष अगोदर कानठाळीत लगावतात नंतर नागरिकांचे कानठाळ कुरवाळतात!

घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिका “उपभोगकर्ता शुल्क” आकारते आहे. हे उपभोगकर्ता शुल्क निवासी, व्यावसायिक, उपहारगृहे, संस्था, आस्थापना, उद्योग, कारखाने इत्यादींसाठी साठ रुपये प्रति महिना ते दोन हजार रुपये प्रति महिना अशा दराने आकारण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली नागरिकांच्या बोकांडी हळूच भुर्दंड आदळण्याचा हा प्रकार असल्याचे सर्वच नागरी स्तरांवरुन सांगितले जात आहे. सगळ्यात विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनीही या शुल्काला विरोध दर्शविला आहे. वस्तुतः पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आणि त्यांचे अधिकारी या भाजपाई शहराध्यक्षांना विचारल्याशिवाय लघुशंकेस अगर शौचासही जात नाहीत हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. तरीही भाजपाई शहराध्यक्ष या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवीत आहेत आणि हे शुल्क रद्द करावे म्हणून पत्रकबाजी करते झाले आहेत. 

सांप्रतच्या काळी पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासक राज आहे, राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे, केंद्रातील सरकारही भाजपाईच. असे असतानाही प्रशासकीय आणि राजकीय सत्ता एकाच प्रशासकाच्या अर्थात आयुक्तांच्याच हातात असतानाही भाजपाई पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या उपभोगकर्ता शुल्काच्या प्रशासकीय निर्णयाबाबत अनभिज्ञ असावेत हे पचणे अशक्यच आहे.  राज्य सरकारकडून प्रशासकांना भाजपाई शहराध्यक्षांचे शतप्रतिशत ऐकायचेच असे निर्देश असतानाही या निर्णयाबद्दलची माहिती त्यांना नाही, असा शहरातील सामान्य नागरिकांचा समज करून देण्याचा प्रयत्न म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील सकल नागरिकांच्या कानठाळीत वाजवणेच असल्याचे शहरात बोलले जात आहे. या चर्चेनंतर भाजप तोंडावर आपटेल या भीतीतून हा उपभोगकर्ता शुल्काचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक यांनी माघारी घ्यावा म्हणून पिंपरी चिंचवडचे भाजपाई शहराध्यक्षांनी पत्र दिले आहे. त्यांचे हे पत्र देणे म्हणजे कानठाळीत वाजवल्यावर त्याचा विसर पडावा म्हणून कानठाळ कुरवाळण्यासारखेच म्हणावे लागेल. 

भाजपाई शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या दावणीला बांधलेली हाऊसिंग सोसायटी फेडरेशन नामक संस्था देखील आयुक्तांनी लावलेल्या या उपयोगकर्ता शुल्क नामक अधिभाराला विरोध करीत आहे. याचा अर्थ भाजपाई शहराध्यक्षांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना प्रशासनाचा हा निर्णय माहीत नव्हता काय असा प्रश्न निर्माण होतो. मग संपूर्ण पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाई शहराध्यक्षांनी जे आपले हेरांचे जाळे उभे केले आहे, ते कुचकामी आणि खोगिरभरतीचे आहे काय, हाही प्रश्न आपोआपच निर्माण होतो. महापालिकेत कुठेही साधे खुट्ट वाजले तरी, त्याचा आवाज भाजपाई शहराध्यक्ष आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या कार्यालयात पोहोचतो. लगोलग कार्यालयातील सर्वेसर्वा असलेले “छोट्या मोठ्या” वकुबाचे लोक, त्या आवाजामुळे आपल्या साम्राज्याला तडा तर जाणार नाहीना हे तपासण्यासाठी महापालिकेत धाव घेतात, हे सर्वश्रुत आहे. 

असे गहन जाळे विणून कारभार करीत असलेल्या भाजपाई शहराध्यक्ष आमदारांच्या यंत्रणेपर्यंत आयुक्तांसह यच्चयावत अधिकारी वर्गाने “काय केले, त्याचे काय झाले” हे समजते. मग पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने घेतलेला हा उपयोगकर्ता शुल्काचा निर्णय यंत्रणेच्या त्या कानांना कळविण्यात आला नसावा, अगर तिथपर्यंत पोहोचला नसावा, हा या सकल यंत्रणेचा पराभवच म्हणावा लागेल. या पुढचा भाग म्हणजे ही उपयोगकर्ता शुल्काची माहिती भाजपाई शहराध्यक्षांना असूनही त्यांनी हा निर्णय प्रशासनाला घेऊ दिला. म्हणजेच आयुक्त तथा प्रशासक यांच्या हाताने आख्ख्या नागरिकांच्या कानठाळीत फाडकन वाजवली आहे. आता प्रशासनाने वाजवलेली कानठाळीत चपखल बसली हे पाहिल्यावर हे भाजपाई शहराध्यक्ष महाभाग, महापालिका प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा म्हणून पत्र देते झाले आहेत. म्हणजेच नागरिकांचे शेकलेले कानठाळ कुरवळण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याचे पत्र भाजपाई शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या सहीने देण्यात आले आहे. या पत्रात भाजपाई शहराध्यक्ष म्हणतात की, या निर्णयाबाबत सर्व राजकीय पक्ष, समाजसेवी संस्था आणि गृहसंकुल संस्था यांना विश्वासात घ्यावे. मात्र हा सगळा प्रकार भाजपाई शहराध्यक्षांकडून मानभावी पणे आपल्या पदरात श्रेय्य घेण्याचाच आहे, हे आता समस्त नागरिकांच्या नक्कीच लक्षात आले आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×