टेक महिंद्राकडे महापालिका आणि त्यांच्या स्मार्ट सिटी प्रशासनाच्या मुली नांदताहेत काय?
आपल्या मुली सुक्षेम आणि सुखनैव नांदाव्यात म्हणून त्या मुलींचा बाप जावयाचे लाड करतो. काही वेळा या जावयाने केलेल्या अवास्तव मागण्याही नाईलाजाने पूर्ण करण्याची वेळ त्या बापावर येते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था असलेल्या बापासारखी परिस्थिती पिंपरी चिंचवड महापालिका आणि महापालिकेचा स्मार्ट सिटी विभाग यांची झाली आहे काय असे वाटावे इतपत सध्या टेक महिंद्रा आणि त्यांच्या पोट कंपन्यांचे लाड महापालिका पुरवते आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी विभाग तर या कंपन्याच चालवताहेत काय, असे वाटावे एव्हढे हा विभाग या कंपन्यांच्या पुढेपुढे करताना दिसतो आहे. यापूर्वी या कंपन्यांनी योग्य खबरदारी घेतली नाही म्हणून महापालिकेचा डाटा खराब झाला होता. यात आपले नुकसान झाले अशी ओरड करून या कंपन्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली होती.
अर्थात महापालिकेचा संपूर्ण व्यवहार नोंदला जाण्यापूर्वीच हा घोळ झाल्याने महापालिकेचे तसे नुकसान झाले नव्हते. मात्र डाटा नोंदताना संगणकीय सुरक्षेची योग्य तजवीज न केल्याने सॉफ्टवेअर मध्ये मालवेअर विषाणू घुसल्याचे या कंपन्यांनीही कबूल केले आहे. त्याही पुढे पोलिसांनी या प्रकारात कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचेही स्पष्ट केले आहे. थोडक्यात काय तर टेक महिंद्रा आणि त्यांच्या पोट कंपन्या चांगली संगणकीय सुरक्षा प्रणाली वापरण्याच्या लायकीच्या नाहीत.
आता यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचा कंपन्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने, पर्यायाने महापालिकेने आपल्या संपूर्ण संगणकीय प्रणालीची सुरक्षा तयार करणे आणि ती अबाधित राखण्याचे काम सोपविले आहे.
नाचता न येणाऱ्या माणसाला नाट्यशाळेचे प्रमुख शिक्षक म्हणून नेमण्यासारखे किंवा कसाही वागला तरी जावयाचे लाडच करायचे असा हा प्रकार नाही काय? लाडात जोपासल्या गेलेल्या या कंपन्या नक्की काय करताहेत कळत नाही. गेली अडीच वर्षे या कंपनीच्या चालढकलीमुळे महापालिकेच्या अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा पाणीपुरवठा विभागही हतबल झाला आहे. नक्की किती पाणी वितरित होते आहे, किती पाणी नदीतून उचलले गेले, हे कळून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून २०१० साली पिंपरी चिंचवड महापालिकेने स्काडा (Supervisory Control And Data Acquisition) प्रणाली सुमारे सव्वादहा कोटी रुपये खर्चून उभी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पातळीची रोजची सद्यस्थिती कळणे सुलभ होते. गेल्या अकरा वर्षात पाणी पुरवठा विभागाने २४/७, अमृत अशा योजना राबवून पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्या प्रमाणात स्काडा प्रणालीची श्रेणीवाढ (upgradation) झाले नाही. हे होणे गरजेचे आहे म्हणून तीन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने स्काडा प्रणालीच्या श्रेणीवाढीसाठी निविदा काढण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी या निविदेचे दोन भाग करून अमृत योजनेचे काम करणाऱ्या स्मार्ट सिटी विभागाला प्रणालीसाठी लागणाऱ्या तांत्रिक समुग्रीचा भाग आणि पाणीपुरवठा विभागाला देखभाल, दुरुस्तीचा भाग असे दोन भागात निविदा प्रसूत करणे भाग पाडले.
स्मार्ट सिटी विभागाने टेक महिंद्रा नावाचा घरजावई पाळला असल्याने स्काडा प्रणालीसाठी लागणाऱ्या तांत्रिक सुट्या भागांच्या खरेदीचे काम टेक महिंद्राला दिले. गेली अडीच वर्षे या टेक महिंद्रा कंपनीने स्काडा साठी लागणारे तंत्रसाहित्य म्हणजेच फ्लो मीटर, कॅट्रोल पॅनल आदी साहित्याच्या खरेदीची चालढकल चालविली आहे. त्यामुळे प्रणालीची श्रेणीवाढही रखडली आहे. स्मार्ट सिटी विभाग आपल्या ढालगज जावयाला तगादा लावू शकत नाही आणि प्रणालीची श्रेणीवाढ काही होऊ शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.
———-–———————-