खुल्या बाजारात मिळत नाही, सरकारी यंत्रणा देत नाही, कोणी रेमडीसीविर देतं का हो? (रेमडीसीविरचे गौडबंगाल! भाग ४)

पिंपरी  (दि. १७/०४/२०२१)

कोविड१९ने बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रेमडीसीविर शोधताहेत आणि कोणालाही ते मिळत नाहीये. शासनाचा अन्न व औषधे विभाग म्हणतो, रेमडीसीविर रुग्णालयात मिळेल. रुग्णालयाचे व्यवस्थापन म्हणते, सरकारकडून आलेच नाही. लोक मात्र ‘कोणी रेमडीसीविर देतं का?’ असा टाहो करताहेत. खुल्या बाजारात विक्रीसाठी रेमडीसीविर उपलब्ध नाही, शासकीय यंत्रणेकडे साठाही नाही आणि पुरवठाही नाही. खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर मात्र सरळ रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात रेमडीसीविरची चिट्ठी देऊन मोकळे होताहेत. याबाबत सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास येते की, खाजगी रुग्णालयांचा हा घोळ घालण्याचा प्रकार आहे. रुग्णालयाची मंजूर क्षमता वीस रुग्ण एव्हढी असलीतरी ही रुग्णालये जास्त रुग्ण दाखल करून घेतात. अन्न व औषधे प्रशासन मात्र मंजूर रुग्ण क्षमतेप्रमाणे रेमडीसीविर पुरवतात.

मग जादाच्या रुग्णांना इंजेक्शन मिळणारंच नाही, ही खरी बाब आहे. त्याहीपेक्षा मोठी मेख आहे ती रेमडीसीविरचा अपुरा पुरवठा आला म्हणून या खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन बोंब मारते आणि मंजूर कोट्याप्रमाणे उपलब्ध झालेले रेमडीसीविरही दाबून ठेवतात. एकीकडे रेमडीसीविर नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडायचे आणि दुसरीकडे मिळालेलेही गायब करायचे हा या रुग्णालयांचा खरा कारभार आहे. दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णास रेमडीसीविर लागणारच आहे काय याचा विचार मात्र होताना दिसत नाही. खरं म्हणजे हे इंजेक्शन कोणाला द्यावे, याचे एक मानांकन आहे. रुग्णाच्या छातीत किती लागण झाली आहे, हे सिटीस्कॅन करून पाहता येते. एक ते पंचवीस असे मानांकन देऊन रुग्णाची श्रेणी ठरवली जाते. यापैकी एक ते पाच मानांकनाची श्रेणी म्हणजे रेमडीसीविरची तितकीशी गरज नाही.सहा ते दहा च्या श्रेणीतील रुग्ण रेमडीसीविर मिळाले तर लवकर बरे होतात, असे म्हटले जाते. अकरा ते सतरा श्रेणीतील रुग्णांचा जीव रेमडीसीविर नाही मिळाले तर धोक्यात येऊ शकतो. अठरा ते पंचवीस मानांकनाची श्रेणी रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक असते. या शेवटच्या श्रेणीतील रुग्णांना जीवरक्षक प्राणलीदेखील वाचवू शकेल असे सांगत येत नाही.

कोणत्याही म्हणजे खाजगी, शासकीय अगर निमशासकीय रुग्णालयात पहिल्या श्रेणीतील रुग्णांना रेमडीसीविर देतच नाहीत. दुसऱ्या श्रेतील रुग्णांना इतर काही आजार असतील तरच रेमडीसीविर दिले जाते. तिसऱ्या श्रेणीतील रुग्णांना मात्र रेमडीसीविर द्यावेच लागते. काही खाजगी रुग्णालयातील व्यवस्थापन चौथ्या श्रेणीतील रुग्णाला रेमडीसीविर देणे टाळतातच. करण त्यांच्या म्हणण्यानुसार हा रुग्ण दगावणारंच असतो. म्हणजेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी जास्तीत जास्त तीस ते चाळीस टक्के रुग्णांनाच हे इंजेक्शन देणे अत्यावश्यक असते. मग रुग्णासंख्येएव्हढे रेमडीसीविर मिळत नाही म्हणून खाजगी रुग्णालये का ओरड करीत असावीत हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. या सर्व प्रकारात नाडला मात्र रुग्ण जातोय हेच वास्तव आहे.

———————————–

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×