भाजपच्या कार्यकर्ते, नगरसेवकांची मदत होईल की हस्तक्षेप वाढेल?
पिंपरी (दि. २४/०४/२०२१)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार येत्या १ मे पासून अठरा वर्षांवरील प्रत्येकाचे कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहर भाजपने काल २३ एप्रिल रोजी शहराला कॉविडपासून वाचविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमात १ मे पासून शहरातील दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. मात्र केंद्र शासनाकडून अन्न व औषध प्रशासन आणि तिथून पिंपरी चिंचवड महापालिका असा होणारा लसींचा पुरवठा इतका तुटपुंजा आहे की, रोजची गरज भागविणेही मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत शहर भाजप दहा लाख नागरिकांचे लसीकरण कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका आणि खाजगी रुग्णालये मिळून एकोणनव्वद लसीकरण केंद्र आहेत. उपलब्ध साठा आणि लसीकरणाचा वेग याचा ताळमेळ पाहता साधारणतः दिवसाला आठ ते दहा हजार व्यक्तींचे लसीकरण सध्या होत आहे. त्यातही आजची परिस्थिती विचारात घेतली तर, आज पुरतील एव्हढा लसींचा साठा कालच्या रात्री महापालिकेला उपलब्ध झाला आहे. काल संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आज लसीकरण होईल की नाही याची खात्री नव्हती. रोजंदारीच्या मजुरासारखी आज कमावलं तरच आजचं काम भागेल, अशी पिंपरी चिंचवड शहरचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची अवस्था आहे. कुठून मीठ, कुठून पीठ, कुठून तांदूळ गोळा करून संसार चालविणारा मजूर आणि कुठून रेमडीसीविर, कुठून ऑक्सिजन, कुठून लस असा रोजचा रोजमेळ जुळविणारे आणि त्यानंतर ते शहरवासीयांसाठी वापरणारे महापालिका प्रशासन यात कोणताही फरक राहिला नाही.
काल दि. २३ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे यांनी भाजपचे जिल्हा समन्वयक यांच्या समवेत शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची ऑनलाइन बैठक घेतली. शहरात कोविडमुळे निर्माण झालेल्या अपात्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी एकोणनव्वद लसीकरण केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ब्याऐंशी पक्ष कार्यकर्ते व नगरसेवकांचा गट काम करणार आहे, तर खाजगी व महापालिकेच्या कोविड सेंटरवर नागरिकांना मदत करण्यासाठी किंवा प्रशासकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी तीस लोकांचा गट काम करणार आहे. खाजगी रुग्णालये आणि अथवा महापालिका प्रशासन यांना या भाजप कार्यकर्ते, नगरसेवकांची मदत होणार आहे की, रोजच्या कामात यांची लुडबुड वाढून त्रास होणार आहे, हे काही दिवसात कळेलच.
भाजपच्या या मदत अथवा हस्तक्षेपचा काय उपयोग, यावर अद्यापपर्यंत महापालिकेतील शिवसेना गटनेते असलेल्या राहुल कलाटे यांची प्रतिक्रिया बोलकी आणि गंमतीशीर आहे. ते म्हणतात, भाजपचा हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेला आपल्या नजरेखाली ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे करण्यापेक्षा शहरातील भाजप नेत्यांनी केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार असल्याने केंद्राच्या अखत्यारीतील कोविड लस, रेमडीसीविर, ऑक्सिजन याचा पुरवठा सुरळीत आणि पुरेसा होईल, यावर आपली ताकद आणि शब्द खर्च करावेत. खाजगी रूग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि महापालिका प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे प्रशासन सक्षम आहे.
————-–——————– —