अजित पवारांना खरोखरच या शहरातील सत्ता मिळवायची आहे काय?
आतापासून बरोबर नऊ महिन्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असेल. या नऊ महिने नऊ दिवसात सत्ता कोणाची हे ठरणार आहे. आतापासून कार्यक्रम आखला नाही, तर हाती काय लागेल माहीत नाही. कोरोनामधून थोडेसे बाजूला होऊन आता निवडणुकीची तयारी करणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता सांप्रतच्या काळी महापालिकेत असली तरी त्यांच्या आघाडीवर सध्या निवडणूक हा अग्रक्रम दिसत नाही. अर्थात भाजपकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक सुप्तपणे कार्यक्रम राबविणारी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे. ही यंत्रणा चोखपणे आपले काम करीत असते. पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीकडून अक्षरशः सत्ता हिसकावून घेतली आहे आणि ती परत मिळविण्यासाठी काही करायला हवे, हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते विसरून गेले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यावर राष्ट्रवादीच्या लोकांची, किंबहुना सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांची जी नामुष्की झाली, तीमुळे अजित पवार वर्षभर शहरात फिरकलेच नाहीत. आपली ड्रीम सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड वासीयांनी आपल्याला धोका दिला, अशी त्यांची त्यावेळची भावना होती. अर्थात, शहरवासीयांनी अजित पवारांना फसवले नव्हते तर, त्यांच्याच स्थानिक सरदारांनी त्यांना निवडणुकीत तोंडघशी पडले होते, हे वादातीत सत्य आहे. वस्तुस्थिती लपवून ठेवून, आपण शहरात निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच आहोत, सत्ता आपलीच आहे, असे खोटे दृश्य या सरदारांनी उभे केले. स्वतंत्र यंत्रणा उभी करून निवडणुकीचे चित्र व्यवस्थितपणे रंगविण्याचे कसब असलेल्या अजित पवारांना स्थानिक राजकारणाची भनक या मंडळींनी लागू दिली नाही. परिणामी राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड शहराची सत्ता केवळ हलगर्जीपणामुळे गमवावी लागली.
राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील सत्ता जाऊन सुमारे सव्वाचार वर्षे झाली. या काळात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काय केले हा संशोधनाचा विषय आहे. काही नव्या उमेदीच्या दोन चार लोकांना सोडले तर, २०१७ पूर्वी पंधरा वर्षे सत्ता भोगलेले नेते, गेली सव्वाचार वर्षे निसुर आणि बिनधास्त आहेत. कारण सत्ता नसली तरी राष्ट्रवादीच्या या प्रमुखांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम झालेला नाही. या मंडळींचे बगलबच्चे, हितसंबंधी, नातेवाईक यांची महापालिकेतील कमाई भाजपच्या लोकांनी बंद पडू दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या, पुढाऱ्यांना महापालिकेतील पक्षाची सत्ता गेली असली तरी, ते स्वतः सत्तेत असल्यासारखेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांनी खऱ्या विरोधो पक्षाची भूमिका कधी वठवलीच नाही. एव्हढेच काय तर, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या गळ्यात गळे घालून या मंडळींनी आपली सत्ता आणि आपल्या लोकांचे हितसंबंध शाबूत राखले. राष्ट्रवादीच्या स्वहित जपणाऱ्या स्थानिक नेत्यांमध्ये भाजपला त्रासदायक ठरलेली दत्ता साने यांची विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्द सोडली तर इतर कोणी विरोधी पक्षनेता म्हणावा तसा प्रभाव पडू शकला नाही. सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे करून आपले हित साधण्यात ही मंडळी जास्त कार्यरत राहिली.
२०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांपूर्वी सुमारे दीड वर्ष भाजपच्या लोकांनी त्यावेळच्या सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या कारकिर्दीला इतके बदनाम केले, की मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी या शब्दाचा अर्थच भ्रष्टाचार आहे काय असे वाटावे एव्हढी बदनामी करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुरते भंडावून सोडण्यात आले. या नाहकच्या बदनामीला प्रत्युत्तर देण्याचे त्यावेळच्या राष्ट्रवादीला शक्य झाले नाही अगर त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. सत्ता गेल्यावर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना गेल्या सव्वाचार वर्षात सत्ताधारी भाजपला गोत्यात आणण्याच्या अनेक संध्या खुद्द भाजपनेच निर्माण करून दिल्या आहेत. मात्र, भाजपने टाकलेले तुकडे चघळण्यात ही मंडळी इतकी मश्गुल होती, की साधे गुरगुरण्याचेही भान या मंडळींना राहिले नाही. सत्ता नसतानाही आपापली दुकाने शाबूत राहावीत यासाठी भाजपच्या काही स्वयंघोषित काडीबाज लोकांच्या कच्छपी राहून आपला स्वहिताचा कार्यभाग जपणारी राष्ट्रवादीची ही मंडळी किती ढालगज आहेत, याचे एक उदाहरण देता येईल ते असे की, भाजपच्या ज्या लोकांनी आपल्या कांडारव्याने राष्ट्रवादीला सत्तेत असताना सळो की पळो करून सोडले, त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची गळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या एक निच्छड स्थानिक नेत्याने केला आहे. सध्या भावाचे नाते लावणारा हा राष्ट्रवादीचा स्थानिक नेता, भाजपमध्ये जातो की काय, असे वाटावे इतपत हे साडगे जुळल्याच्या चर्चा शहरात आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही टाकल्या तुकड्यांवर जगणाऱ्या नेत्यांची स्वहिताची कार्यपध्दत दिसून आली नाही काय? हा प्रश्न प्रकर्षाने निर्माण होतो. राष्ट्रवादीला राज्यात सत्तेत येऊन सुमारे वीस महिने झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपला रोखण्याच्या अनेक संधी या कालावधीत राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. किंबहुना, भाजपने त्या स्वतःहून तयार करून दिल्या आहेत. मग राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कानाला धरून किंवा प्रसंगी कानपिचक्या देऊन भाजपला विरोध करण्याची अगर भाजपचा भ्रष्टाचार खंदून काढण्याची तजवीज अजित पवारांनी का केली नाही? का अजित पवार भाजपच्या स्थानिक नेत्यांवर एव्हढे मेहेरबान आहेत? की अजित पावरांचेच भाजपच्या या स्थानिक नेत्यांशी साटेलोटे आहे?
शहरातील एक छोट्या तर अजित पवार कसे आमचे ऐकतात, याचे रसभरीत वर्णन नेहमीच ऐकवीत असतो. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्या कार्यकर्त्याला सरळ अजितदादांना मीच तुमची तक्रार करिन अशा धमक्या तर कायमच या छोट्याकडून दिल्या जातात. याहीपुढे शहरात अशी चर्चा आहे की, भाजपचे माजीआजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे अजित पावरांशी चांगले सूत आहे. त्यामुळे अजित पवार भाजपच्या या दोनही नेत्यांवर विशेष मर्जी ठेऊन आहेत. मग यांना विरोध करून उगाचच अजित पवारांचा रोष का ओढवून घ्यायचा, म्हणून राष्ट्रवादीचे लोक भाजपच्या महापालिकेतील कारभारावर, नागरिक कितीही त्रासले, पिळले गेले तरी टीका करीत नाहीत. शहरातील या चर्चेला अजित पावरांनीच पूर्णविराम देणे गरजेचे आहे. आपले आणि भाजपच्या या आजीमाजी शहराध्यक्षांचे नक्की कसे आणि काय संबंध आहेत, किंवा ते तसे संबंध असल्याचे भासवून राष्ट्रवादीच्या लोकांना नुसतेच धमकावत आहेत, हे अजित पावरांनीच एकदा जाहीरपणे सांगून टाकावे. म्हणजे भाजपच्या एकंदर अनागोंदी कारभाराला कंटाळलेले शहारवासी येत्या २०२२ च्या महापालिका निवडणुकीत कोणाला मते द्यायची हे निश्चित करू शकतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या शहरात पुन्हा स्थापित व्हावी अशी खरेच अजित पवारांच इच्छा आहे काय? याही प्रश्नाचे उत्तर दस्तुरखुद्द अजित पावरांनीच या शहरातील आम जनतेला दिले पाहिजे. किंवा निदान तसे दर्शविले तरी पाहिजे. ज्याप्रमाणे शहरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे संबंध, त्यांनी स्पष्ट करायला हवेत, तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक पातळीची सफसफाईही केली पाहिजे. भाकरी फिरवली नाही की करपते, या सांसारिक सत्याचा वापर राजकारणात करणाऱ्या अध्वर्यू साक्षात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा विचार अजित पवारांनी आता करायला हवा. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आणि एकंदरच राजकारणाचे राष्ट्रवादीतील लाभधारक आणि सत्तेचा लाभ घेऊन गब्बर झालेल्यांना बाजूला सारून नवीन फळी उभी करणे, त्यांना ताकद आणि अधिकार देणे, ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अति आवश्यक बाब ठरणार आहे. आताच भाकरी फिरवली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील संपूर्ण राजकारणच करपून जाईल. हा करपट वास या नऊ महिन्याच्या अटीतटीच्या कालावधीत आम शहरवासीयांच्या नाकात बसला, तर पुढचा काळ कठीण होणार आहे. यासाठी अजित पवारांनी स्वतःच डॉक्टर होऊन हे शल्यकर्म शक्य तेवढ्या लवकर करायला हवे. अर्थात दस्तुरखुद्द अजित पावरांनाच या शहरातील सत्ता पुनःस्थापित करायची आहे किंवा कसे आणि त्यासाठी ते काही करणार आहेत काय याचे उत्तर त्यांच्याकडूनच लवकरात लवकर मिळावे ही सामान्य अपेक्षा!
———–——————————––———-–-