राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन झाले आणि हुहु ची पुपु झाली!
पेट्रोल, गॅस, डिझेल, रासायनिक खते यांच्या अन्यायकारक दरवाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे रोजचे जगणे अशी भाववाढ करून मुश्किल करतंय, त्याचा हा निषेध. नेहमीचे पाच पन्नास यशस्वी कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी पक्षाचा म्हणून हा एक कार्यक्रम पार पडला. आंदोलन झाल्यावर नियमित प्रथेप्रमाणे प्रसिद्धी पत्रक तयार करून सर्व प्रसिद्धी माध्यमांना पाठवून झाले. या प्रसिद्धी पत्रकात असाही उल्लेख करण्यात आला की, राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून हे आंदोलन पार पाडण्यात आले.
थोडक्यात, हुहुची पुपु म्हणजेच हुजूर हुकूमांची पुर्ण पुर्तता करायची म्हणून आम्ही आपले आंदोलन केले, बाकी जनता बिनता, त्यांचे प्रश्न बीश्न यांच्याशी आमचा काही मतलब नाही, हीच भावना या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. आंदोलन, मग ते कोणत्याही कारणासाठी असले तरी, त्यामागे एक उदात्त हेतू असतो. आंदोलनाद्वारे ज्या सामान्य आर्थिक स्तरावरील लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत, त्यांच्याविषयी जिव्हाळा, ममत्व, आपुलकी, काळजी खरे म्हणजे आंदोलनकर्त्यांना असावी लागते. मात्र, हुहुची पुपु करण्यासाठी केलेल्या शहर राष्ट्रवादीच्या आंदोलनात या सामान्यांच्या यातना कोठेही दिसल्या नाहीत. वस्तुतः राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी चिंचवड महापालिकेत आणि केंद्रात विरोधी पक्षात आहेत. केंद्रातील राष्ट्रवादिबद्दल बोलण्याची आमची टाप नाही. या शहरातील राष्ट्रवादिबद्दल मात्र आम्ही हक्काने भाष्य करू शकतो.
राष्ट्रवादीचे या शहरातील नेते, कार्यकर्ते या शहराविषयी एव्हढे निसुर का आहेत, हे शहरातील कोणत्याही नागरिक मतदारांच्या आकालनशक्तीच्या पलीकडले आहे. येत्या नऊ महिन्यांनंतर याच लोकांच्या मतांवर पुन्हा सत्तेत येण्याची यांची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असे काही करताना ही मंडळी दिसत नाहीत. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची काही दोन चार आंदोलने सोडली, तर शहर राष्ट्रवादी शहरवासींसाठी काही ठोस करताना दिसत नाही. वस्तुतः शहरात राष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक आहेत, त्याच बरोबर हजारभर कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी हे मनुष्यबळ भरपूर आहे. दुर्दैवाने शहर राष्ट्रवादीकडे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा हुहुची पुपु करण्याव्यतिरिक्त कोणताही ठोस कार्यक्रम नाही. शिवाय या मोठ्या मनुष्यबळाची मोट बांधून काही करण्याचा वकुब आणि तयारी असलेला स्थानिक सर्वंकष नेताही शहर राष्ट्रवादीकडे नाही. जे आहेत, ते त्या त्या भागातील सरदार सुभेदार आहेत, अगर त्यांना शहराचे नेतृत्व करण्याची संधी दिली जात नाही. अशा परिस्थितीत सत्ताकांक्षी राष्ट्रवादी पुन्हा सत्ता कशी काबीज करू शकेल, हा प्रश्न निर्माण होतो.
आंदोलने, मोर्चे यांच्यासाठी एक वेगळी मानसिकता असावी लागते. आपण ज्या मतदार आणि नागरिकांच्या बलबुत्यावर सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहतो आहोत, त्यांच्यासाठी काही करण्याची, झिजण्याची ही मानसिकता शहर राष्ट्रवादीमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. तशी ती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवड शहारवासी अशी मानसिकता या मंडळींमध्ये निर्माण व्हावी यासाठी डोळे लावून आहेत. त्यांच्या या आशा फलद्रुप व्हाव्यात ही प्रार्थना!
–––––––––––––––––––––––––––––––––