या शहरावर अजितदादांचे प्रेमच नाही! – लक्ष्मण जगताप

पिंपरी (दि. १०/०६/२०२१)

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे या शहरावर प्रेमच नाही. असते, तर त्यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलिनीकरण सरळ पिंपरी चिंचवड महापालिकेत केले असते, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए चा तिढा मधे घातला नसता. आता नवनगर विकास प्राधिकरणाची मालमत्ता पीएमआरडीएकडे आणि प्राधिकरणाची खरकटी सगळी महापालिकेकडे असे हे अतार्किक विभाजन झाले आहे. प्राधिकरणाच्या निधी, मालमत्तेसह विकसित, अविकसित मोकळ्या जागा देखील पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित होते. महापालिकेबाबत नामदार अजितदादांनी, त्यांचे या शहरावर प्रेम असते तर असा दुजाभाव होऊ दिला नसता, असे मत पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्राधिकरणाच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने काल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. शहर भाजपचा या विलीनीकरणास पूर्वीपासून विरोध होता, हे स्पष्ट करून राज्यात भाजपची सत्ता असताना असा प्रस्ताव पुढे आला होता, त्याला आम्ही दोन्ही आमदारांनी विरोध करून हा प्रस्ताव थांबविला असे शहर भाजपच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी हा निर्णय घेताना आम्हाला म्हणजेच या शहरातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला आहे. २०१४ पासून नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली असून नागरिकांची घरांची गरज भागविण्याचा प्राधिकरण स्थापनेमागचा खरा उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्राधिकरणाने सहा हजार घरांच्या संकुलाचे उभारणी केली असल्याची आणि त्याचबरोबर रस्ते, उद्याने अशी काही कामे केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अर्थात विश्वासात घ्यायचे म्हणजे भाजपच्या पदाधिकऱ्यांचा मताप्रमाणे निर्णय घ्यायचा का? असा सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे. प्राधिकरणाच्या वाल्हेकरवाडी, काळेवाडी, थेरगाव या परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे झाली आहेत. मात्र ही बहितांश बांधकामे निवासी स्वरूपाची आहेत. प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली असलेल्या भोसरी परिसरात मात्र शेकड्याने अनाधिकृत व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने उभे राहिलेले हे व्यापरी गाळे या स्थानिक पुढाऱ्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना लक्षावधी रुपयांची कमाई करून देत आहेत. त्यामुळे हा कांगावा केला जात आहे काय असा सवालही समान्यांकडून विचारला जात आहे. विकास व्हावा, पण तो आपल्या म्हणण्यानुसारच व्हावा आणि आपल्या व आपल्या संबंधितांच्या फायद्याच्याच व्हावा असा या ओरड्यामागे सरळ उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.

भाजपच्या या पत्रकार परिषदेआगोदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी प्राधिकरणाच्या विनिलीकरणाचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या विलीनीकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे नव्व्याण्णव वर्षाच्या कारारातून प्राधिकारणातील रहिवाशांची सुटका होईल असे मत व्यक्त केले. अनाधिकृत बांधकामांचा प्रश्नही विचाराधीन आणता येईल असेही त्यांनी सांगितले. नवनगर विकास प्राधिकरणाच्या विलीनीकरणामुळे काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यावर शासनाशी चर्चा करून नक्कीच मार्ग काढता येईल, असा आशावादही खासदार बारणे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×