आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल बिर्ला गृपच्या नावाला काळिमा?

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल चे एकंदर कारनामे पाहता थेरगाव येथील या रुग्णालयाने वैद्यकीय नैतिकतेला पूर्णतः तिलांजली दिली आहे. त्याचबरोबर बिर्ला गृपच्या नावलौकिकाला काळिमा फसला आहे. अत्यंत धार्मिक समाजकारणी रायबहादूर राजाजी बलदेव दास बिर्ला यांच्या वंशजाच्या नावाने असलेले हे रुग्णालय पूर्णतः व्यापारी केंद्र बनले आहे. १९३८ साली कोलकाता येथील भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेन्टीक यांनी उभारले. या पहिल्या भारतीय रुग्णालयाच्या उभारणीत बिर्ला गृपचे अग्रणी रायबहादूर राजाजी बलदेव दास बिर्ला यांनी मोठे योगदान दिले होते. आपली व्यावसायिकता सांभाळून समाजाची गरज पूर्ण करणाऱ्या या अग्रणींच्या मूळ हेतुलाच टाच लावणारे हे रुग्णालय खरोखरच बिर्ला या नावाला काळिमा फासणारे असल्याचे दिसून येत आहे.

बिर्ला या नावाला असलेला ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे. १९३९साली रायबहादूर बलदेव दास बिर्ला यांनी दिल्ली येथे बांधलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे, जे आता बिर्ला मंदिर म्हणून प्रख्यात आहे, उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते, असे थोर वलय बिर्ला या नावाला आहे. मात्र, थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने हे वलंयच मोडीत काढले आहे. काय करताहेत हे आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे लोक, ज्यामुळे बिर्ला या नावालाच धक्का लागावा? खरोखरच या रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय नैतिकता विसरले आहे काय? गेल्या काही वर्षात या रुग्णालयाबाबत ऐकू येणाऱ्या आणि आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून काळणाऱ्या घटना अत्यंत विदारक आहेत.

२००६साली अस्मादिकांनी दस्तुरखुद्द अनुभवलेली एक घटना अशी की, पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या एका कामगाराच्या कुटुंबातील सदस्याचे बिर्ला रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ती शनिवारची रात्र होती. चतुर्थ श्रेणीतील त्या कामगाराला महापालिकेच्या वैद्यकीय परिपूर्तीचा सहारा होता. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने महापालिकेतून रकमेचा धनादेश मिळणे शक्य नव्हते. रुग्ण दाखल करताना अग्रीम रक्कम महापालिकेनेच अदा केली असल्याने, कागदपत्रं पूर्ण करून राहिलेली बिलाची रक्कम रुग्णालयाला मिळू शकली असती. मात्र, आता बिल भरा तरच रुग्णाचा मृतदेह ताब्यात मिळेल अशी अडवणूक रुग्णालयीन व्यवस्थापनाने केली. शेवटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. नागकुमार कुणचगी यांना सुटीच्या दिवशी भेटून त्यांच्याकडून, महापालिका सदर बिलाची परिपूर्ती करेल आणि याला स्वतः डॉ. नागकुमार व्यक्तिगत जबाबदार राहतील असे हाताने लिहिलेले पत्र डॉ. नागकुमारांनी दिले आणि त्यानंतर रविवारी दुपारी दोन वाजता म्हणजे सुमारे बारा तासांनी मृतदेह ताब्यात मिळाला. या विदारक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनुभवांच्या अनेक मालिका या रुग्णालयाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिल्या आहेत.

मार्च २०२० पासूनच्या कोविड काळात तर थेरगाव स्थित या आदित्य बिर्ला रुग्णालयाने माणुसकी नासविण्याच्या सर्व हद्दी पार केल्याचे दिसून येते. शासनाच्या आदेशाला खुंटीला टांगून मनमानी आणि भरमसाठ बिल आकारणी, विमा कंपन्यांना हाताशी धरून केलेली वारेमाप लूट, बिल भरल्याशिवाय कोणत्याही जिवंत अगर मृत रुग्णाला बाहेर जाऊ न देता डांबून ठेवण्याची बेकायदा हरकत अशा या रुग्णालयाच्या अनेक तक्रारी अगदी खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्यापासून ते सामान्य माणसापर्यंत अनेकांनी केल्या आहेत. मात्र, केंद्र, राज्य अगर स्थानिक पिंपरी चिंचवड महापालिका यांपैकी कोणतेही प्रशासन या रुग्णालयाच्या “हम करे सो कायदा” या प्रवृत्तीला आळा घालू शकलेले नाही.

आदित्य बिर्ला रुग्णालयाची एक ताजी तक्रार नुकतीच निदर्शनात आली आहे. २५ एप्रिल रोजी या रुग्णालयात दाखल झालेल्या पोपट शिंदे या कोविडग्रस्त रुग्णाला १८ मे रोजी आजारातून बरे झाल्यावर रुग्णालयातून सोडण्याचे ठरविण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करून सहा लाख सहासष्ट हजार रुपयांचे बिल या रुग्णाचा मुलगा प्रशांत याला देण्यात आले. त्यापैकी तीन लाख एकोणीस हजार रुपयांची रक्कम विमा कंपनीने रुग्णालयाला दिली. वस्तुतः विमा कंपनीने शासनमान्य दराने तेवीस दिवसांचे बिल अदा केले. तरीही वरची रक्कम जमा केल्याशिवाय रुग्ण सोडता येणार नाही आणि दरम्यानच्या काळात रुग्णाचे काही बरेवाईट झाल्यास रुग्णालय जबाबदार राहणार नाही, अशी अप्रत्यक्ष धमकी रुग्ण आणि त्याच्या मुलाला देण्यात आली. रुग्णाच्या मुलाने आपल्या वडिलांच्या जिविताचा धसका घेऊन राहिलेली सर्व रक्कम भरून आपल्या वडिलांना घरी नेले. त्यानंतर रुग्णाचा मुलगा प्रशांत शिंदे याने सर्व कागदपत्रांनिशी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंकित वाकड पोलीस ठाणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडे रीतसर ज्यादाच्या बिलासह रुग्णाच्या जीविताला धोका पोहोचविण्याच्या रुग्णालयाच्या धमकीसह तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या तक्रारीची पोलीस आणि महापालिका या दोनही स्तरावर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही.

शहरातील खाजगी रुग्णालयांच्या ज्यादाच्या बिलांबाबत यापूर्वीही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने मार्च २०२० पासूनच्या बिलाची छाननी करून खाजगी रुग्णालयांनी सुमारे पंधरा कोटी रुपयांची शासनमान्य दरापेक्षा ज्यादा बिले कोविडग्रस्त रुग्णांकडून वसूल करण्यात आल्याचा अहवाल महापालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. गंभीर बाब म्हणजे खाजगी कोविड रुग्णालयातील बिलांची छाननी प्रत्यक्ष त्या रुग्णालयात जाऊन करणारे जवळपास सर्वच लेखाधिकारी आणि लेखपालांनी कोविडग्रस्त होऊन मृत्युदारी घंटा वाजविली आहे. या ज्यादाच्या बिल आकारणीत सगळ्यात जास्त प्रकरणे थेरगावच्या आदित्य बिर्ला रुग्णालयाची असल्याचे सदर अहवालात नमूद आहे. मात्र, महापालिकेचा प्रशासन विभाग आणि वैद्यकीय विभाग पुढच्या कारवाईच्या उत्तरदायित्वाची टोलवाटोलवी करीत आहेत. मग जीवावर उदार होऊन आम्ही केलेल्या कामाला काय अर्थ उरला आहे, अशी उद्विग्नता लेखपरिक्षण विभागासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी खाजगीत व्यक्त करीत आहेत. थोडक्यात आदित्य बिर्ला रुग्णालयाने आपली माणुसकी पूर्णतः सोडली आहेच, शिवाय कोणतेही प्रशासन या रुग्णालयाला काहीही करू शकत नाही अशी गर्वोक्तीही हे रुग्णालय मिरवीत आहे. मात्र, आपल्या या गैरव्यवहारामुळे आपणच आपल्या बिर्ला या नावाला काळिमा फासत आहोत याचेही रुग्णालयाच्या प्रशासनाला आकलन होत नाही, ही अत्यंत विदारक आणि चमत्कारिक बाब आहे.

( या लेखाच्या सुरुवातीला वापरलेले छायाचित्र १९३९ साली रायबहादूर राजाजी बलदेव दास बिर्ला यांनी दिल्ली येथे बांधलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले, त्यावेळचे आहे. सदर छायाचित्र विकिपीडिया या जागतिक शोध यंत्रणेतून घेतले असून त्याबाबत नवनायक च्यावतीने विकिपीडियाचे आभार!)

—————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×