शहर भाजप पिंपरी चिंचवड वासीयांना मूर्ख ठरवते आहे काय?

नवनवीन फंडे काढून जनतेला संभ्रमात टाकण्याची कला भारतीय जनता पक्षाएव्हढी कोणत्याही राजकीय पक्षाला अवगत नाही, हे एक स्वयंसिद्ध सत्य आहे. अर्थात पिंपरी चिंचवड भाजपही याला अपवाद नाही. प्रसिद्धी पत्रकापूरता निर्णय घ्यायचा, सवंग लोकप्रियता मिळवायची, बातमी आली, की काम झाले. घेतलेल्या निर्णयाने आणि त्या निर्णयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी आपण या शहरातील सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहोत, याचा विचार आणि भानही पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाईंना अजिबात नाही, हे विशेष. तसाही भाजपच्या एकूणच कार्यप्रणालीचा विचार करता, जनतेचा, त्या जनतेच्या भावनांचा, विचार या मंडळींनी कधी केल्याचे दिसत नाही. मुकी बिचारी, कशीही हाका, हा या भाजपाईंचा खाक्या. जनतेला मूर्ख बनविण्याचाच यांचा उद्योग आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला शहर भाजपाईंनी आतापर्यंत दिलेली किती आश्वासने पूर्ण केली आहेत, याबाबतचे सत्य आता जनतेला कळलेच पाहिजे.

पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आजी शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांचा शहरवासीयांना मूर्खात जमा करण्याचा कलगीतुरा तर अगदीच अफलातून आहे. खाजगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून म्हणजेच सीएसआर फंडातून महापालिकेला व्हेंटिलेटर मिळाले. हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना वापरण्यास देण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ठरवून टाकले आणि कोविड काळात कोविडग्रस्त रुग्णांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या शहरातील आदित्य बिर्ला, निरामय यांसारख्या रुग्णालयांना वाटून टाकले. आमदार महेशदादांनी या व्हेंटिलेटर वाटण्याच्या निर्णयाची तोंड भरून स्तुती केली. त्यानंतर आमदार लक्ष्मणभाऊंनी हा व्हेंटिलेटर वाटण्याचा प्रकार कसा शहरातील गोरगरीब रुग्णांचा हक्क डावलणारा आहे, हे उच्च कंठारवाने सांगितले. म्हणजे व्हेंटिलेटर देणारेही भाजपाई आणि देऊ नका म्हणून ओरडणारेही भाजपाईच! मग शहरवासी कोण, तर तद्दन मूर्ख!

भाजपचा हा शहरवासीयांना मूर्ख ठरविण्याचा उद्योग, केवळ तेव्हढ्यापुरता सीमित राहात नाही तर, या सामान्य शहरवासीयांच्या भावनेशी खेळणाराही आहे. लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी, कामगारांना प्रत्येकी तीन हजार रुपये दिलासा निधी देण्याचा निर्णय असाच गाजावाजा करून महापालिकेच्या भाजपाई पदाधिकाऱ्यांनी घेतला. हा निर्णय घेताना शहरातील सर्वच भाजपाईंनी आम्हालाच गोरगरिबांचा कसा कैवार आहे, हे आरडाओरडा करून सांगितले. आता शहराच्या भाजपाई महापौर म्हणतात की, आम्ही निर्णय घेतला, राज्य शासनाने आता आम्हाला ही रक्कम वाटण्याची अनुमती द्यावी. पण कोणत्याही महापालिकेला असा वैयक्तिक निधी देत येत नाही, हे अनेक वेळा महापालिका निवडणूका लढवून आमदार आणि इतर पदाधिकारी झालेल्या भाजपाईंना माहीत नव्हते काय? पण शहरवासीयांना मूर्ख समजून निर्णय घेणाऱ्या या मंडळींना त्याबाबत काही घेणेदेणे नाही. करण हा निर्णय घेतल्याच्या बातम्या मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून प्रसिद्ध होऊन गेल्या आहेत. निधी देता येतो की नाही ही आता महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. ठरले असतील शहरवासी मूर्ख, त्याला कोण काय करणार?

आप्तस्वकीयांना गमावून बसलेल्या आणि कोविडने त्रस्त झालेल्या जनसामान्यांना आता फक्त कोविड लस हाच एक तरणोपाय आहे, हे कळून चुकले आहे. ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत कोविड लस आहे, ते भाजपचे सरकार कोविडने लोक मरत असताना निवडणूक, निवडणूक खेळत होते. हजारोंच्या संख्येने गंगेत वाहिलेली आणि सामुदायिक रीतीने जाळली जाणारी प्रेते पाहून “मगरमच्छ के आसूं” वाहणारे देशाचे प्राधानसेवक आणि आपल्याला काय कमी? म्हणून विदेशी कोविड लस खरेदीची निविदा काढू म्हणणारे पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी, दोन्ही भाजपचेच. आपल्या निवडणुकीच्या खेळामुळे कोविडला माणसे मारण्याची संधी मिळाली, हे जनतेला कळले आहे, हे माहीत झाल्यावर डोळे गाळणारे भावुक निवेदन दृकश्राव्य माध्यमांना देणारे भाजपाई आणि आपले भाजपाई नेते लस आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही, हे माहीत झाल्यावर ती परदेशातून विकत घेण्याचा गतिमंद आणि मतिमंद विचार करणारे पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई ही सगळी नाट्यनिर्मिती करताना आम जनतेलाच मूर्ख असल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या तयारीत आहेत. अशा प्रकारे लस मिळणे अशक्य असल्याचे माहित असूनही निविदा काढताहेत. का, तर जनता मुर्खच असते हे यांना माहीत झाले आहे. उरतो तो प्रश्न असा की पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजपच्या मंडळींना हे का कळत नाही की या मूर्ख जनतेने या भाजपईंनाच मूर्ख बनविण्याचे ठरवले तर?

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×