जनतेची माफी मागा! सत्ताकांक्षी राजकारण्यांनी जनतेला गृहीत धरू नये!

जनतेची माफी मागा, अशा मागणीचे एक प्रसिद्धीपत्रक  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसूत केले आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, त्यापेक्षा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवारांना शहरातील जनातेसाठी साकडे घालावे अशी मल्लिनाथी महापालिकेतील भाजपचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी केली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेला मूर्ख बनवण्याचे आता या मंडळींनी खरे म्हणजे थांबवायला हवे आणि सामुदायिक रित्या जनतेची खरोखरच माफी मागायला हवी. “तू कर मारल्यासारखे, मी करतो रडल्यासारखे!” असा हडेलहप्पी कार्यक्रम करून जनतेला गृहीत धरणे थांबवले पाहिजे.

कोरोना महामारीमुळे सामान्यांच्या रोजच्या जगण्यावर निर्बंध आले आहेत. नियमित मिळणारा रोजगार कोरोना संसर्गाच्या भीतीने मिळेनासा झाला आहे. बांधकाम मजूर, घरकाम मजूर, टपरीधारक, ठेलेवाले, पथारीवाले बेरोजगार झाले आहेत. रिक्षाचालक, हॉटेल , दुकाने, मॉल, चित्रपटगृहे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती इत्यादींच्या कामगार, कष्टकऱ्यांचे रोजगार कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत राजकारण करणाऱ्या सत्ताकांक्षी मंडळींचा हा खेळ समाजाला नक्कीच हितकारक नाही. ज्या समाजाच्या जोरावर आणि मतांवर या राजकारण्यांची मदार आहे, तेच सध्या अडचणीत आहेत. यातही गंभीर बाब अशी की, हे सर्व राजकारणी स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्यासाठी आटापिटा करताहेत.

समाजासाठी काहीतरी करण्याचा आव आणून आपल्या बगलबच्च्यांचे भले करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका वापरणारे सत्ताधारी आणि एखाद दुसरा सोडून त्यातील वाटा आपल्याही पदरात कसा पाडून घेता येईल, यासाठी कोलांटउड्या मारून मर्कटचेष्टा करणारे विरोधक हे सगळेच आता वीट उत्पन्न करीत आहेत. यात सत्ताधारी दोषी आहेतच, पण त्याचबरोबर विरोधकही तितकेच दोषी आहेत. सत्तासुंदरीचा उपभोग घेणारे सत्ताधारी आता निवडणुकीच्या भीतीने वैधानिकता नसणारे निर्णय घेऊन शहरातील सामान्य कष्टकरी, कामगारांची मस्करी करीत असतानाच त्यांना केवळ नावापुरता विरोध करणारे विरोधक या दोनही गटांनी पिंपरी चिंचवड शहरातील आम जनतेची माफी मागायला हवी.

कोरोना महामारीतून उसंत मिळाली तर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. आपली पोटे भरण्याव्यतिरिक्त शहरवासीयांसाठी आपण  आपल्या सत्ता काळात नक्की काय केले हे आता सत्ताधाऱ्यांना दाखवावे लागणार आहे. अर्थात सत्ता मिळावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही आपण जनतेच्या हितासाठी आणि सत्ताधाऱ्यांना थोपविण्यासाठी काय केले हे सुद्धा जनतेसमोर मांडावे लागणार आहे. सत्ताधाऱ्यांपेक्षा आपण कसे जनहीतदक्ष आहोत, याचे स्पष्टीकरण देण्याचे जादाचे काम विरोधकांना करावे लागणार आहे. जनहिताचा ठोस कार्यक्रम दाखवला नाही तर, विरोधक पुन्हा विरोधकच राहतील. तोच निकष सत्ताधाऱ्यांनाही लावला तर, आतापर्यंत चालवलेला आप्पलपोटीपणा सोडून शहरवासीयांसाठी आपण सत्ताकाळात काय केले, याचा हिशोब सत्ताधाऱ्यांनाही द्यावा लागणार आहे. शिवाय या सत्ताधाऱ्यांना आपली जनतेबाबतची उपयोगीताही सिद्ध करावी लागणार आहे.

मुकी बिचारी कुणीही हाणा, हा आपमतलबी प्रकार आता सामान्य मतदार खपवून घेणार नाही. ही आम मतदार जनता आता शहाणी झाली आहे. समाज माध्यमे आणि माहितीच्या खुल्या स्तोत्रामुळे राजकारण्याचा ढालगज कार्यक्रम आता जनतेच्या लगेच नजरेत येतो, हे राजकारण्यांनी लक्षात घेऊन वागले पाहिजे. आता सामान्य मतदार जनतेला गृहीत धरून चालणार नाही. पैसा, जात, धर्म, आपले, तुपले या पलीकडे जाऊन समाजमन जाणणे आणि त्याप्रमाणे आपले कार्यक्रम आणि प्राथमिकता तयार करणे यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर या राजकारण्यांना जनता नाकारेल हे यांनी आता समजून घेतले पाहिजे, नाहीतर गच्छंती निश्चित!

———-–——————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×