आमचे बिघडलेले पर्यावरण आणि आम्ही!

एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर, सगळा आसमंत तुमच्या मदतीसाठी उभा राहतो, हे एक वादातीत सत्य आहे. त्या उलट एखादी बाब नकारात्मकता ठेवूनच करणार असाल तर, किंवा त्यामागचा हेतूच शुद्ध नसेल तर? आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे पर्यावरण दुर्दैवाने नाकारात्मकतेचेच आहे आणि त्याच्या हेतूबद्दल तर साशंकताच आहे. आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या पर्यावरणासाठी आमच्या महापालिकेचा एक पर्यावरण विभाग आहे. शिवाय आमचे पर्यावरण सुशोभित करण्यासाठी एक उद्यान विभागही आहे. आमचे पुन्हा दुर्दैव की या दोनही विभागांचा हेतू शुद्ध नाही आणि म्हणून मग आमचे पर्यावरणही बिघडलेलेच आहे. आपल्या अशुद्ध हेतूने आमच्या पर्यावरणाला अशुद्ध करणारे हे दोनही विभाग म्हणूनच बदनामही झाले आहेत.

शहराची पर्यावरण स्थिती नक्की कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी कायद्याने बंधनकारक असलेला एक पर्यावरण सद्यस्थिती अहवाल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नित्यनेमाने तयार केला जातो. या अहवालात पाणी, वायू यांचे प्रदूषण तपासून त्या प्रदूषणाची सद्यस्थिती अहवालात नमूद असते. बिघडलेले पर्यावरण सुधारण्यासाठीच्या उपाययोजनाही या अहवालात नमूद असण्याचे बंधनकारक आहे. खरे म्हणजे असा अहवाल नियमित तयार करणे आणि त्यातील उपाययोजना प्रत्यक्षात आमलात आणणे हेही कायद्याने बंधनकारक असते. मग आमच्या महापालिकेचा पर्यावरण विभाग या बंधनकारकतेचे बंधन पाळतो आहे काय?

नदी सुधार प्रकल्पांसारखे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सल्लागारांकरवी तयार करून घेणे आणि संबंधितांना गब्बर करणे या व्यतिरिक्त वेगळे काही नजरेत भरेल असे या पर्यावरण विभागाने केल्याचे गेल्या दशकात तरी दृष्टीस पडलेले नाही. एव्हढेच काय तर तसे कागदावरही कधी आल्याचे दिसले नाही. याची प्रचिती गेल्या पाच वर्षातील पर्यावरण अहवाल तपासले तर येऊ शकते. संगणकीय भाषेत सांगायचे झाले तर, हा अहवाल प्रत्येक वेळी काही आकडे बदलून कॉपी पेस्ट केला जातो. शहराच्या हवा, पाण्याच्या प्रदूषणाची रोजची स्थिती सांगणारे काही विद्युत फलक शहरात लावण्यात आले आहेत. बहुतांशी हे फलक आपली काळी, कोरी पाटीच धारण करून असतात. या बंद फलकांसारखाच या शहरातील पर्यावरण आणि पर्यावरण विभाग काळा, कोरा आणि बंद असल्याचेच जणू हे फलक द्योतक असावेत. यावरूनच आमच्या शहराचे पर्यावरण काळे आणि म्हणूनच झाकलेले आहे काय असा प्रश्न कायम आम्हाला अक्षरशः धप्पकन पडतो.

कोणे एके काळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे तत्कालीन प्रशासक हरनाम सिंग यांच्या दुरदृष्टीमुळे हरित शहर म्हणून नावाजले गेलेल्या या शहराचा हरितपणा उजाड वनात रूपांतरित झाला आहे. तरीही दुर्गादेवी टेकडीसारखा नजरेत हिरवाई भरणारा भाग अजून शिल्लक आहे, हे या शहराचे सुदैव! गेल्या सुमारे तीस वर्षात महापालिकेच्या उद्यान विभागाने दर पावसाळ्यापूर्वी रोपणासाठी आणलेल्या रोपांत, खोदलेल्या वृक्षारोपणाच्या खड्डयात आणि त्यात भरण्यासाठी मागावलेल्या मातीत या शहराच्या पर्यावरणाचा हरितपणा गाडला गेला आहे. शहरातील सफारी पार्क, डिअर पार्क, औषधी वनस्पतींची उद्याने आता केवळ कागदावर आणि अर्धवट उजाडलेल्या अवस्थेत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने गेल्या तीस वर्षात वृक्षारोपणाच्या नावाखाली खोदलेल्या खड्डयांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. उद्यान विभागाने आतापर्यंत ठेकेदारांना दिलेली बिले तपासली, तर ही संख्या लगेच लक्षात येईल. मात्र या खड्डयांमध्ये लावलेली त्या प्रमाणातली झाडे काही शहरात दिसून त्यात नाहीत, हे चक्षुर्वै सत्य आहे.

पण जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करायची झाल्यास आणि त्यासाठी लोकोरतिनिधीही आग्रही असल्यास कसे नंदनवन फुलू शकते, याचीही काही उदाहरणे या शहरात आहेत. चिंचवडगावातील लिंक रोडला आलेल्या लक्ष्मीनगर येथे ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात आले आहे. तेथील महापालिका सदस्य राजेंद्र गावडे यांच्या परिकल्पनेतून हे उद्यान निर्माण झाले आहे. उद्यान विभागाच्या नेहमीच्या पायंड्यानुसार तकलादू विदेशी झाडे लावून काम उरकण्याच्या प्रयत्नांपेक्षा वेगळे असे हे उद्यान आहे. सुमारे दोन एकरात अडीच हजार देशी झाडे या उद्यानात जोपासली गेली आहेत. पर्यावरणीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या या उद्यानाचा कित्ता इतर ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने का गिरवला नाही, हा प्रश्न अलाहिदा निर्माण होतो.

थोडक्यात, या शहराच्या पर्यावरणाला चांगला वाली नाही हे आमचे दुखणे आहे. केवळ मोठमोठ्या निविदांमध्ये रस असलेला पर्यावरण विभाग आणि वृक्षारोपणाच्या खड्डयात, मातीत असलेला उद्यान विभाग यांमधून या शहराची सुटका झाली तर आणि तरच या शहराचे पर्यावरण काही प्रमाणात का होईना, सुधारू शकेल अशी आशा लावून आम्ही आहोत. आता आमची म्हणजेच या पिंपरी चिंचवड शहरवासीयांची अवस्था “आशेला लावले आणि डेंगणे दावले” अशी होईल, की काही सकारात्मक बदल होऊन आमचे पर्यावरण पुन्हा हरित शहर हे नामाभिधान धारण करील, हे काळ आणि या शहराचे प्रशासन ठरवेल. तोपर्यंत या प्रदूषणात जगण्या व्यतिरिक्तचा पर्याय या शहरवासीयांकडे सध्या तरी नाही.

———––——————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×