भाजपचे शहरवासीयांवरचे प्रेम पुतना मावशीचे आहे काय?

कोविड महामारीने त्रस्त झालेल्या असंघटित कामगार, कष्टकाऱ्यांना तीन हजार रुपये दिलासा निधी देण्यावरून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा सत्ताधारी भाजपचे महापौर, पक्षनेते यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला. शहरातील गोरगरिबांना मिळणाऱ्या या निधीला आयुक्तांनी मुद्दामहून अडकवून ठेवले आहे, असा या महापौर, पक्षनेते वगैरे भाजपाईंचा आरोप आहे. आपात्कालीन परिस्थितीतून शहरवासीयांना उभारता यावे म्हणून उपाययोजना करण्याची तरतूद असतानाही आयुक्त ऐकत नाहीत, सत्ताधारी भाजपने स्थायी समिती आणि महापालिकेच्या आमसभेत विषय मंजूर करूनही आयुक्त दाद देत नाहीत, हा सत्ताधारी भाजपचा आरोप आहे. हा आरोप करताना आयुक्त गोरगरिबांच्या अन्नात माती कालवत आहेत असा ओरडा महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी केला. शहरातील गोरगरिबांचे आम्हीच कसे तारणहार आहोत, हे दाखवण्याच्या सोसापायी असलेले भाजपचे हे पुतना मावशीचे प्रेम आहे काय असा प्रश्न आता उभा राहतो आहे.

किती आणि कसे प्रेम करतात हे सत्ताधारी भाजपाई या पिंपरी चिंचवड शहरावर? प्रश्न तसा गमतीशीर आहे. गमतीशीर अशासाठी की, आतापर्यंत म्हणजे मार्च २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केल्यापासून भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी शहरवासीयांचा आणि या महापालिकेचा विचार केल्याचे एकदाही दिसून आलेले नाही. गेल्या सव्वाचार वर्षात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा माल आपल्या आणि आपल्या बगलबच्चांच्या खिशात कसा येईल, याचाच विचार या सत्ताधारी भाजपाईंनी केल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी या मंडळींनी जो भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, तो शहरवासीयांच्या लक्षात येऊ लागला आहे. आपण महापालिकेची तिजोरी रिकामी करून आपली आणि आपल्या बगलबच्चांची पुढच्या सात पिढ्यांची कशी सोय केली आहे, हे शहरवासीयांच्या लक्षात आल्याचे यांच्या लक्षात आल्याने आता या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटू लागली आहे.

काहीतरी करून शहरवासीयांना भुलवून पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नातून या भाजपाईंचे शहरातील गोरगरिबांबाबत हे पुतना मावशीचे प्रेम उफाळून आले आहे. शहरातील असंघटित कामगार, कष्टकाऱ्यांना तीन हजार रुपये वाटण्याची योजना म्हणजे शुद्ध फसवणूक आहे, याची जाणीव या भाजपाईंनाही आहे. कारण अशा प्रकारे व्यक्तिगत लाभ कोणत्याही शहरवासीयांना देण्याची तरतूद महापालिका कायद्यात नाही हे यांना माहीत आहे. मग पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेले भाजपाई शहरातील गोरगरिबांच्या भावनांशी का खेळते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, सत्तालालसेचे राजकारण! असा व्यक्तिगत लाभ कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत देत येणार नाही, हे माहीत असूनही हा तीन हजारांचा विषय मंजूर करताना विरोधकांच्या नावाने बोंब मारण्याची सोय व्हावी हा एकमेव उद्देश या मागे आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे दोन आमदार माजी शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप आणि आजी शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्यासह विद्यमान महापौर माई ढोरे या तीनही महोदयांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भोगले आहे. कोणत्याही महापालिकेतील कोणताही आर्थिक निर्णय स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय घेता येत नाही याचे या तिघांनाही पूर्ण ज्ञान आहे. मात्र हे तीनही महाभाग त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये होते हा भाग अलाहिदा! महत्त्वाचे म्हणजे या तिघांनीही आपल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कालावधीत वैयक्तिक आर्थिक मदत एखाद्या व्यक्तीस देण्याचे विषय मंजूर केले आहेत आणि अशी आर्थिक मदत हे तीनही महाभाग कोणाला देऊ शकलेले नाहीत. असे मंजूर विषय राज्य शासनाकडे पाठवावे लागले आहेत आणि राज्य शासनाने असा व्यक्तिगत लाभ कोणालाही देत येणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कारण असे प्रावधान महापालिका अधिनियमात नाही. मग आता पिंपरी चिंचवड शहराचे वाटे घालून अधिराज्य गाजवणारे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे आणि महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कामगार, कष्टकाऱ्यांना तीन हजार रुपये दिलासा निधी देण्याचा व्यक्तिगत लाभाचा विषय का मंजूर केला असावा, हा प्रश्न निर्माण होतो. तर, याचे कारण शुद्ध राजकारणच आहे, हे खात्रीने सांगता येते.

काय आणि कसे राजकारण खेळताहेत हे पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाई पदाधिकारी? शहरातील सामान्य कष्टकरी, कामगारांच्याच मतावर निवडणूक लढवता येते. या सामान्य कष्टकाऱ्यांना मदत करण्याचा आव आणून या मंडळींनी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती आणि आमसभेत हा विषय मंजूर केला तरी हे होणार नाही याची पूर्ण खात्री भाजपाई पदाधिकाऱ्यांना आहेच. मग हा विषय मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवावा लागेल आणि राज्य शासन याला मंजुरी देणार नाही. राज्यात सत्ताधारी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतरांचे सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याच पक्षांशी लढून पुन्हा सत्ता मिळवायची आहे. गोरगरीब कष्टकाऱ्यांना भाजप मदत करू इच्छिते, मात्र विरोधात असलेले राज्य सरकार ही मदत करू देत नाही, अशी बोंब ठोकून शहरातील सामान्य मतदारांना आपल्या बाजूने आणि महापलिकेतील प्रमुख सत्ताकांक्षी विरोधकांच्या विरोधात नेता येईल, हा यामागचा शहर भाजपाईंचा उद्देश आहे. मात्र कोणत्याही चुकीच्या पायंड्यामुळे कोणालाही, अगदी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपलाही अवैध आणि अतिरिक्त लाभ मिळू नये आणि महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहाराबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या भाजपचे हे सत्तालालसेचे राजकारण हाणून पाडले आहे आणि म्हणून आता शहरातील भाजपचे पदाधिकारी आयुक्तांचा निषेध करण्याची भाषा वापरत आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना आपात्कालीन परिस्थितीत शहरवासीयांच्या भल्यासाठी उपाययोजना करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, तरीही आयुक्त आपले अधिकार न वापरता हा निर्णय डावलून गोरगरिबांच्या अन्नात माती कालवत आहेत, असा आरोप केला आहे. आपात्कालीन परिस्थितीत कोणत्याही महापालिकेने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी त्या प्रदेशातील विभागीय आयुक्तांची असते. त्याचबरोबरीने महापालिकेच्या कोणत्याही निर्णयाची राज्य शासनाला जबाबदेही विभागीय आयुक्तांची असते. ही प्रशासकीय प्रणाली आहे. या प्रशासकीय पद्धतीनुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आपात्कालीन परिस्थितीत करण्याच्या उपाययोजनेत व्यक्तिगत आर्थिक लाभ शहरवासीयांना देता येईल किंवा कसे याचे मार्गदर्शन करण्याची विनंती विभागीय आयुक्तांना केली. त्यानुसार असा व्यक्तिगत लाभ महापालिका कोणालाही देऊ शकत नाही असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आता या सगळ्या प्रशासकीय प्रणालीमुळे महापालिकेत विरोधात असलेल्या आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विरोधात शहरवासीयांना भडकवण्याची शहर भाजपाईंची संधी नष्ट झाली आहे. म्हणून मग आपल्या संधीची माती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावर हे भाजपाई आगपाखड करीत आहेत. या मंडळींचा शहरातील गोरगरिबांचा कैवार हा केवळ राजकीय सत्तालालसेच्या हेतूपायी आणि म्हणूनच पुतना मावशीच्या प्रेमाचा आहे. पण पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी श्रीकृष्णाचा अवतार धारण करून या भाजपाई पुतना मावशीचे येत्या महापालिका निवडणुकीत पूर्ण पारिपत्य केले तर?

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×