पदनाम पांच, काम करनेवाले आदमी छे, बहुत नाइन्साफी है!

नियम, नियमन आणि नियंत्रण नसलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा सामान्य प्रशासन विभाग आपल्या अचाट आणि चमत्कारिक कार्यपद्धतीसाठी कायम चर्चेत आहे. पण या विभागाविरुद्ध काही बोलण्याची सोय अगदी आयुक्तांपासून गटारकुलींपर्यंत कोणालाही नाही. महापलिकेतील प्रत्येक कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या नाड्या या विभागाच्या हातात असतात. शिवाय कोणाची, कोणती नाडी कुठे दाबायची याचे अगाध ज्ञान या विभागाला आहे. “कोणाच्या पदरात धोंडा, तर कोणाला मणिहार!” या प्रकारात मोडणारे निर्णय या विभागामार्फत कायम घेतले जातात. बढत्या, बदल्या, अतिरिक्त कार्यभार अशा नाड्या हातात असलेल्या या विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेतील सह शहर अभियंत्यांच्या पाच मंजूर पदांवर सहा अधिकारी नेमून आपल्या अचाट कामगिरीचा नमुना पेश केला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, महापालिका आयुक्त राजेश पाटील देखील या विभागाच्या झाश्यात आले आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सह शहर अभियंता अभिनामाची पाच पदे मंजूर आहेत. मात्र, सहा अधिकारी या पदनामाचा आस्वाद घेत आहेत. बांधकाम परवाना विभागाचे मकरंद निकम, बीआरटी आणि प्रकल्प विभागाचे श्रीकांत सवणे, जलनिस्सारण आणि पर्यावरण विभागाचे रामदास तांबे, प्रतिनियुक्तीवर राज्य शासनाने पाठविलेले अशोक भालकर, नव्याने बढती झालेले सतीश इंगळे ( अजून कोणताही पदभार दिलेला नाही.) आणि अतिरिक्त कार्यभार म्हणून सह शहर अभियंता पाणी पुरवठा विभाग या पदाची मजा चाखणारे प्रवीण लडकत हे सहा सह शहर अभियंता सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत कार्यरत आहेत. याशिवाय सह शहर अभियंता पर्यावरण या पदाची अतितीव्र इच्छा असलेले संजय कुलकर्णी आणि तत्कालीन सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर यांच्या निवृत्तीपासून सह शहर अभियंता या पदावर ( अनुसूचित जाती आरक्षण) वर्णी लागावी म्हणून प्रयत्नरत असलेले संजय भोसले हे अजून या पदाच्या रांगेत आहेत. यावर प्रश्न असा उपस्थित होतो की, मंजूर पदे पाच असताना सहा अधिकारी या पदावर कसे आणि का काम करताहेत? याहीपुढे आयुक्त पाटील यांनी प्रशासन विभागाच्या या अचाट कामगिरीला का पाठबळ दिले असावे? या प्रश्नांचे आकलन करून उत्तर शोधण्यासाठी थोडेसे खोदकाम आवश्यक आहे.

हे खोदकाम केल्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीला जुलुमाचा रामराम ठोकावा लागेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जाती संवर्गातून सह शहर अभियंता पदावर काम करणारे रवींद्र दुधेकर सेवानिवृत्त झाल्यापासून अनुसुचित जाती संवर्गात असलेले संजय भोसले या पदावर दावा सांगत आहेत. कार्यकारी अभियंता पदावर काम केल्याच्या कालावधीचा बाऊ करून प्रशासन विभाग भोसलेंना टाळत आला आहे. अनुसुचित जातींसाठी हा कालावधी कमी करून तीन वर्षे केल्याचे राज्य शासनाचे परिपत्रक आपल्या दाव्याला पूरक असल्याचे सांगून आणि त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करूनही संजय भोसले यांना झुलवत ठेवले गेले आहे. आता राज्य शासनाने बढत्या करताना संवर्गाचा विचार होऊ नये, अशी मार्गदर्शक तत्वे प्रसूत केली आहेत. मात्र, नितीन राऊत आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे हे मार्गदर्शन तूर्तास स्थगित ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून आहे. संजय भोसले यांचा दावा मात्र गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाकडे दाखल आहे. योग्य ते शासन आदेश आणि आपल्या दाव्याला पूरक सर्व माहिती प्रशासनाला देऊनही महापालिका प्रशासनाने भोसले यांच्या बाबतीत चालढकल का केली असावी हे अनाकलनीय आहे. त्याहूनही अनाकलनीय बाब म्हणजे प्रवीण लडकत यांना सहावे सह शहर अभियंता पद निर्माण करून अतिरिक्त कार्यभार देण्याचा आणि त्यातही पाणीपुरवठा विभाग वेगळा काढुन त्याचे कामकाज सोपवून बढतीच्या रांगेत आणण्याचा अचाट प्रकार आहे.

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येऊन तिखट झालेल्या अशोक भालकरांचे पोटकथानक तर अजूनच गमतीशीर आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता महावीर कांबळे सेवानिवृत्त झाल्यावर त्या पदावर हक्क सांगत अशोक भालकर महापालिकेत आले. आमच्या महापालिकेत शहर अभियंता या वैधानिक आणि सन्माननीय पदावर बाहेरचा माणूस नको म्हणून राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठा विरोध झाला. भालकरांना पुन्हा शासनाकडे परत पाठवा असा आग्रह धरला गेला. मात्र राज्य शासन स्तरावर वजन आणि वचक असलेल्या अशोक भालकर यांना महापालिकेला नाईलाजाने आणि राज्य शासनाच्या दबावाने स्वीकारावे लागले. शिवाय स्मार्ट सिटीचा सवतासुभा त्यांच्या अखत्यारीत द्यावा लागला. या विभागाचे सर्व कामकाज स्वतंत्र पद्धतीने चालते, सगळे निर्णय घेण्याचे अधिकार फक्त आयुक्तांच्या आधिन राहून वापरणारे हे भालकर सह शहर अभियंता म्हणून पद उपभोगत आहेत. या विभागाची कोणतीही माहिती बाहेर येत नसल्यामुळे हा विभाग पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट करतो आहे, की वेगळेच घोळ घालतो आहे, हे गुलदस्तात आहे.

नव्याने सह शहर अभियंता म्हणून बढती मिळालेले सतीश इंगळे सध्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज वाटप अजून झाले नाही. मात्र, मंजूर पदांवरही योग्य व्यक्तीची वर्णी लावण्यास विनाकारण चालढकल करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सह शहर अभियंता ही पाच पदे मंजूर असतानाही सहा व्यक्तींना या पदाचा आस्वाद का दिला असावा हे गूढच आहे. “आदमी तीन” अशी विचारणा करणारा गब्बरसिंग पिंपरी चिंचवड महापालिकेत निर्माण व्हावा आणि त्याने “पदनाम पांच, आदमी छे, बहुत नाइन्साफी है” अशी विचारणा करावी ही अपेक्षा महापलिकेतील अधीकारी व्यक्त करीत आहेत.
———————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×