पाण्याच्या टाकीचे राजकारण, भोसरीच्या आमदारांची भूमिका संशयास्पद?
पाण्याची शितलता सर्वश्रुत असली तरी भोसरी परिसरात पाण्यामुळे, किंबहुना पाण्याच्या टाकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. इंद्रायणीनगरची होऊ घातलेली पाण्याची टाकी आता भोसरीच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावीत आहे. हे पाण्याच्या टाकीचे नाट्य बहुपेडी असून त्यात भोसरीच्या आमदारांची भूमिका मात्र संशयास्पद आहे. “मंदिर वहीं बनाएंगे!” या भाजपच्या आरोळीसारखी “मंदिर वहीं रहेगा!” अशी आरोळी सध्या इंद्रायणीनगरमधील ओमनगरीतील गुरुदत्त गृहसंस्थेचे लोक देत असतानाही भाजपचे शहराध्यक्ष असलेले भोसरीचे आमदार मात्र या आरोळी आणि टाहोकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमदार केवळ दुर्लक्षच करताहेत असे नव्हे, तर गुरुदत्त गृहसंकुलातील दत्त मंदिर परिसर विद्रुप करणारी अनावश्यक पाण्याची टाकी बांधण्याचा आग्रहही करीत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेची ही प्रस्तावित पाण्याची टाकी सध्या भोसरीच्या राजकारणाची उष्णता वाढवीत आहे. या उष्णतेमुळे आणि आमदारांच्या संशयास्पद भूमिकेमुळे बहुपेडी बनलेले या पाण्याच्या टाकीच्या नाट्यात भाजपचे कालवश शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक रवी लांडगे यांनीही भूमिका ग्रहण केली आहे.
काल २३ जून रोजी भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र देऊन सदरची पाण्याची टाकी अनावश्यक असल्याचे सांगितले आहे. अजिबात नसलेल्या पाणी टंचाईचा बागुलबुवा करून आणि परिसरातील कोणाचीही पाण्याची तक्रार नसताना असामाजिक पद्धतीने काही मंडळींकडून या पाण्याच्या टाकीचा आग्रह धरला जात असल्याची त्यांची भूमिका आहे. ओमनगरीच्या गुरुदत्त गृहसंकुलातील नागरिकांसाठी मंजूर विकास आराखड्यात मोकळी जागा म्हणून सोडलेल्या या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचे नाटक तयार केले जात आहे. परिसरातील नागरिकांच्या दत्त मंदिराबाबत असलेल्या धार्मिक भावना ठरवून दुखावल्या जात असल्याचेही मत रवी लांडगे यांनी व्यक्त केले आहे. या मंदिराचे भूमिपूजन कालवश अंकुशराव लांडगे यांनी केले होते. ओमनगरी येथील या गुरुदत्त गृहसंकुलाला नाव देतानाच येथे दत्त मंदिर निर्माण करण्याचे ठरविण्यात आले होते. गृहसंकुलातील नियमानुसार सोडण्यात आलेली ही मोकळी जागा दत्त मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवर पाण्याची टाकी बांधून परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावू नये असा आग्रह रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात धरला आहे.
वस्तुस्थिती काय आहे?
भोसरीच्या ओमनगरीतील गुरुदत्त गृहसंकुलाच्या मोकळ्या जागेत पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रस्तावित केलेल्या या पाण्याच्या टाकीच्या नाट्यात रवी लांडगे यांचा प्रवेश झाल्यामुळे अगोदरच बहुपेडी असलेले हे नाट्य अधिकचे पेड म्हणजे पदर धारण करून आहे. या बहुपेडी किंवा बहुपदरी नाट्याचा पेड अगर पदर उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रयत्नातून अनेक गमतीदार पेड नजरेत आले. या नाट्याचा पहिला पेड म्हणजे गुरुदत्त गृह संकुलाची जागा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मूळ शेतकऱ्यांना दिलेल्या साडेबारा टक्के परताव्यातील आहे. या जमिनीचा मूळ विकास आराखडा तयार करून तो मंजूर करून घेताना सुमारे एकोणीस गुंठे मोकळी जागा ठेवण्यात आली होती. ही मोकळी जागा गुरुदत्त गृहसंकुलातील रहिवाशांसाठी असावी आणि तेथे क्रीडांगण अगर उद्यान करावे अशा उद्देशाने प्राधिकरणाने ती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुपूर्द केली होती. मात्र, नेहमीप्रमाणे राजकीय आग्रहाला बळी पडून आणि मूळ रहिवासी नागरिकांचे मत विचारात न घेता महापालिकेने येथे पाण्याची टाकी प्रस्तावित केली. अर्थात नागरिकांना काय हवे यापेक्षा राजकीय आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी मंडळींनाच महापालिका प्राधान्य देत आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार व त्यांचे बगलबच्चे यांचे हित नागरिकांच्या हितापेक्षा महत्त्वाचे मानून हे पाण्याच्या टाकीचे प्रयोजन करण्यात आले आहे.
पाण्याच्या टाकीचा आग्रह का?
भोसरीतीलच भाजप शहराध्यक्ष आमदारांच्या पंखाखाली असलेले भाजपचे नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे गुरुदत्त गृहसंकुलातील या मोकळ्या जागेत पाण्याची टाकी उभी करण्यात विशेष आग्रही आहेत. त्यासाठी राजेंद्र लांडगे यांनी पाणी टंचाईचे दृश्य उभे करून महापालिकेला याच जागेवर पाण्याची टाकी उभारावी म्हणून भरीस घातले. टाकी नाट्याचा हा दुसरा पेड उलगडण्यासाठी ओमनगरीतील काही नागरिकांशी बातचीत केली. या प्रस्तावित टाकीच्या अगदी समोर म्हणजे ओमनगरीतील नागरिकांच्या नाकाखाली नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी प्राधिकरणाची जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला आल्याची तक्रार येथील काही नागरिकांनी प्राधिकरणाकडे केली. ही मंडळी केवळ तक्रार करून थांबली नाहीत, त्या तक्रारीचा पाठपुरावाही ही मंडळी गेल्या दोन वर्षांपासून करीत आहेत. त्याचा रोष धरून राजेंद्र लांडगे यांनी या पाण्याच्या टाकीचा आग्रह धरला. या परिसरातील नागरिक आपले म्हणजेच भाजपचे मतदार नाहीत, या संशयावरून भाजपच्या आमदारांनी महापालिका प्रशासनाने राजेंद्र लांडगे यांच्या म्हणण्याप्रमाणे या मोकळ्या जागेवर पाण्याची टाकी उभारावी म्हणून आपला विशेष हातभार लावला. दरम्यान राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या प्राधिकरणाची जमीन हडपण्याचा तक्रारीची शहानिशा होऊन भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना अटक झाली आणि काही दिवस पोलीसांच्या ताब्यात राहिल्यानंतर त्यांना जमीनही मिळाला. वस्तुतः राजेंद्र लांडगे यांच्या परिसरातील नागरिकांवरील रोषामुळे आग्रही राहून उभारण्यात येणाऱ्या या पाण्याच्या टाकीसाठी आता आमदारांसह त्यांचे समर्थक आग्रही आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध काय?
भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे आणि त्यांचे आमदार नेते यांच्या आग्रहाला बळी पडून पिंपरी चिंचवड महापालिकेने गुरुदत्त गृहसंकुलाजवळच्या या मोकळ्या जागेत पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाचे आदेश निर्गमित केले. हे काम थांबविण्यासाठी परिसरातील काही नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटले. या मंडळींचे म्हणणे ऐकून अजित पवारांनी प्रकरण समजून घेऊन प्रश्न मार्गी लावा, तोपर्यंत तूर्तास पाण्याच्या टाकीचे काम थांबवा, असे तोंडी निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांच्या पाणीप्रश्नाच्या आड येत आहे, अशी बोंब मग भाजप आमदार आणि समर्थकांकडून मारण्यात आली. त्यासाठी आमदारांची प्रसिद्धी यंत्रणा कामाला लावण्यात आली. तशातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी त्यांच्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या सहशहर अभियंत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टाकीचे काम थांबविण्याचे तोंडी निर्देश दिले असल्याचे पत्र राजेंद्र लांडगे यांना दिले. अर्थात हे पत्र केवळ प्रशासकीय बाब म्हणून देण्यात आले, की तसे संबंधीत अधिकाऱ्याने द्यावे म्हणून त्याला भाग पाडण्यात आले, याचे संशोधन अलाहिदा करावे लागेल. मात्र हे पत्र अगोदरच धगधगणाऱ्या या पाण्याच्या टाकीच्या नाट्यात तेल ओतणारे अजून एक पेड ठरले आहे.
या वादात नागरिकांच्या पदरी हालच!
ज्या मतदारांच्या जोरावर या राजकारण्यांची सगळी मदार असते, त्यांचा विचार मात्र या एवढ्या बहुपेडी नाट्यात का विचारात घेतला जात नाही? त्यांचाही एक पेड या नाट्याला आहे आणि तोच महत्त्वाचा असला पाहिजे, याचा पूर्ण विसर या मंडळींना झाला आहे. इंद्रायणीनगर जवळच्या ओमनगरीतील गुरुदत्त गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या हक्काची मोकळी जागा कशासाठी वापरायची हे त्यांना ठरवू देण्याचा साधा अधिकार आमदार, त्यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र लांडगे आणि त्यांची सर्व चाणक्य मंडळी का डावलत असावीत? तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांना जे हवे ते कायदेशीर असेल तर करा, या बाबी तपासून होईपर्यंत पाण्याच्या टाकीचे काम थांबवा, असे साधेसरळ निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले. ज्या पद्धतीने या आशयाचे पत्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना दिले, ती सगळी पद्धतच संशयास्पद आहे. वस्तुतः ज्यावेळी अजित पवारांनी असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले, त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी तेथे उपस्थित असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांना हा सगळा प्रकार केवळ ऐकीव आहे. पाण्याच्या टाकीचे काम थांबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याचे मग या संबंधित अधिकाऱ्याने लिखित स्वरूपात कसे मान्य केले, हे अनाकलनीय आहे.या सर्व प्रक्रियेत मग भोसरीच्या आमदारांची एकूणच भूमिका संशयास्पद असल्याचे समजण्यात वावगे नसावे. ——————————————————–