आमदार अण्णा बनसोडे शहर राष्ट्रवादीत अजूनही अस्पृश्यच!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मराठा, मायत्यांचा पक्ष असा आरोप अगदी पक्षाच्या स्थापनेपासून खाजगीत केला जातो. या आरोपाबाबत अनेकदा मागास जातींसह बहुजन वर्ग खाजगीत चर्चा करीत असतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व शरदचंद्रजी पवार, कायम उघडपणे शाहू, फुले, आंबेडकर विचार वाच्यार्थाने मांडीत असले तरी, हा समतावादी विचार पक्षाच्या एकंदर धेय्यधोरणांमध्ये स्पष्टपणे दिसण्याचा अभाव असल्याचे अनेक सामाजिक, राजकीय मंडळींच्या व्यक्तिगत चर्चेतून जाणवते. या प्रकारचे सांप्रतचे उदाहरण पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंदर कार्यक्रमांमध्ये जाणवत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून पिंपरी विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीसाठी अजूनही अस्पृश्यच आहेत की काय,असे वाटावे इतपत त्यांची अनुपस्थिती सध्या पक्षात जाणवते आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकीर्द तशी जवळपास पंचवीस वर्षांची आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे तीनदा नगरसदस्य राहिलेले अण्णा बनसोडे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर अस्तित्वात आलेल्या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे ते २००९ मध्ये पाहिले आमदार झाले. २०१४ मध्ये त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र पुन्हा २०१९ मध्ये झालेल्या पिंपरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीनंतर झालेल्या पहाटेच्या शपथविधी नाट्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण समर्थकांनी अजित पवारांची साथ सोडून दिली. मात्र, उभ्या महाराष्ट्रात अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार आघाडीचे सरकार स्थापन होईपर्यंत कोणाच्याही समजावण्याला न घाबरता अजित पावरांबरोबर होते. याबाबत अण्णा बनसोडे खाजगीत सांगतात की, आपल्या जातीत इमान बदलले जात नाही, ज्याला एकदा इमान दिले, तो चुकीचा की बरोबर याचा विचार न करता आपले इमान राखण्याची पद्धत आपल्या जातीत आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांचे इमान पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जाणवल्याचे मात्र दिसत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात आमदार अण्णा बनसोडे अस्पृश्यच राहिले आहेत. राजकारण करताना फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा अतिरिक्त लाभ घेणारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळी वस्तुस्थितीत मात्र आमदार बनसोडेंना टाळताहेत असे दृश्य सध्या शहरात निर्माण झाले आहे. शहरात होणारी विविध आंदोलने, घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदा, एखादा कार्यक्रम ठरवताना होणाऱ्या बैठका यांमध्ये आमदार बनसोडे कोठेही दिसत नाहीत. त्याहीपुढे जाऊन शहर राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांकडून आमदार बनसोडे यांचा नामोल्लेखही टाळला जातो, असे चित्र शहरात आहे. या बाबत पिंपरी चिंचवड शहरातील मागासवर्गीय समाज घटकांचे खाजगीत असे म्हणणे आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील बहुतांश पदाधिकारी आणि स्थानिक नेते, महापलिकेतील सत्ताधारी भाजपशी संधान बांधून आपला ‘उद्योग’ उरकीत आहेत. या व्यक्तिगत उद्योगांमध्ये आमदार अण्णा बनसोडे अडचणीचे ठरू शकतील अशी भीती शहर राष्ट्रवादीच्या धंदेवाईक नेत्या, पदाधिकाऱ्यांना वाटत असावी. त्यामुळे शहर राष्ट्रवादीने महापलिकेच्या राजकारणातून आमदार बनसोडेंना ठरवून अस्पर्शी अगर अस्पृश्य ठरविले असावे.

यावर नवनायकने आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता मुंबईहून आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातीय भेदभाव पळाला जात नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले. ते म्हणतात की, “शहर राष्ट्रवादीच्या यंत्रणेतून प्रत्येक छोट्यामोठ्या कार्यक्रमात माझा सहभाग विचारला जातो. बऱ्याच वेळा मी मुंबई किंवा इतरत्र असल्यामुळे शहरातील कार्यक्रमात माझा सहभाग असणे शक्य नसते. माझ्यासाठी शहर राष्ट्रवादीचे कार्यक्रम अगर आंदोलने थांबू नयेत, असे मला वाटते.” आमदार बनसोडे यांचे हे स्पष्टीकरण पक्षशिस्तीला धरून असले तरी, शहरात मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार अण्णा बनसोडे यांना शहर राष्ट्रवादीतून अलिप्त ठेवले असल्याची भावना बळावत आहे. वाच्यार्थाने फुले, शाहू, आंबेडकर मांडणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वास्तवात समतेचा विचार आमलात आणून आमदार अण्णा बनसोडे यांना शहराच्या राजकारणात मानाचे स्थान द्यावे, अशी सुप्त मागणी शहरातील मागासवर्गीय आणि बहुजन समाजाच्या धुरीणांकडून सध्यातरी होत आहे.                    ———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×