भाजप शहराध्यक्ष आमदारांनी, शहर राष्ट्रवादीला पुरते वेड्यात जमा केले?
कुडतोजी गुजर नावाच्या एका शूर योद्ध्याला छत्रपती शिवरायांनी प्रतापराव ही पदवी बहाल करून स्वराज्याचे सरसेनापती केले. या प्रतापरावांनी आदिलशाही सरदार बहलोलखानास, तो एका गनिमि काव्याच्या लढाईत शरण आला म्हणून जीवानिशी सोडून दिले. स्वराज्याला पुढे घातक ठरू शकणाऱ्या बहलोलखानास जिवंत सोडले, म्हणून छत्रपतींनी प्रतापराव गुजरांना दोष देऊन खानास मारल्याशिवाय तोंड दाखवू नका, असे खरमरीत पत्र पाठवले. सहज छावणीतून रपेटीस बाहेर पडलेला हा शूर योद्धा गडहिंग्लज जवळच्या नेसरी येथे खान आहे, हे कळल्यावर आपल्या विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दियाजी राऊतराव, सिद्धी हिलाल आणि कृष्णाजी भास्कर या सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या छावणीवर चालून गेला. पंधरा हजार कडव्या पठाणांच्या फौजेच्या गराड्यात हे सातही वीर मारले गेले. प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांवर कवने रचली गेली, त्यापैकीच एक “वेडात मराठे वीर दौडले सात!” असाच काहीसा प्रकार केवळ “वेडात दौडले” एव्हढ्यापुरता का होईना, पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात नुकताच घडला आहे.
“वेडात दौडण्यापूरते” का होईना पण वेडे ठरलेल्या ह्या स्वतःला वीर समजणाऱ्या, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या लोकांना भाजप शहराध्यक्ष आमदारांनी मात्र, पुरते वेड्यात जमा केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात वेड्यात जमा झालेले राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि त्यांना वेडेच ठरवणारे भाजपाई यांच्या या वेड्या नाट्याचा उहापोह म्हणून प्रतापराव गुजरांचे उदाहरण वापरण्यात आले आहे. या कथानकातील छत्रपती शिवराय, प्रतापराव गुजर, त्यांचे साथीदार, आदिलशहा, बहलोलखान ही पात्रे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात शोधण्याचा प्रयत्न कोणी करू नये, तशा लायकीचे कोणी या शहरात नाही. केवळ यातील वेडेपणा स्पष्ट व्हावा, या उद्देशाने हे उदाहरण वापरण्यात आले आहे.
तर, आता पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात वेडे ठरलेले आणि त्यांना वेड्यात जमा करणारे राष्ट्रवादी आणि भाजपाईंविषयी. मैत्रदिन साजरा करणाऱ्या या मंडळींनी या मैत्रीचे झालेले भजे पाहिल्यावर, अनेक मल्लिनाथी प्रतिक्रिया दिल्या. भाजपच्या शहराध्यक्षांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण देण्यासाठी ही मैत्रीपूर्ण “चाय पे चर्चा” झाली आणि या चर्चेचा पुढचा भाग भोसरीच्या लांडेवाडी चौकात छत्रपती शिवरायांच्या साक्षीने होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. दरम्यान पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी फेसबुकवर आपला फेस दाखवून आपण आमरण पक्ष सोडणार नाही, अशी जाहीर ग्वाही दिली. एव्हढेच काय, तर आपण राजकारणापासून दूर झालो तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ काम करिन, असाही मनोदय त्यांनी जाहीर केला.
मैत्रदिनाच्या या भेटीत आणि त्यानंतरच्या गावचर्चेत पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष महेशदादा लांडगेंनी शहर राष्ट्रवादीला वेड्यात जमा केलेच, शिवाय या भेटनाट्यातून अनेक तीर मारण्यातही ते यशस्वी ठरले. यापैकी पहिला तीर भाजपच्या पक्षश्रेष्ठींसाठी होता. आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला शहर भाजप हाकू दिली नाही, तर आपल्याकडे पर्याय आहे, हा संदेश भाजपाई पक्षश्रेष्ठींना आमदारांनी पोहोचवला. दुसरा तीर येत्या महापालिका निवडणुकीत भाजप सोडू इच्छिणाऱ्यांच्या मनात दचकदिवा निर्माण करणारा ठरला. तिसरा तीर आमदार लांडगेंनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना, अगदी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासह सर्वांना, आपल्याशिवाय तरणोपाय नाही, हा संदेश देऊन मारला. पुढचे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचे तीर कामानीला लावून आमदार महेशदादा लांडगे तयारीतच आहेत.
आता स्वतःहून दौडून वेडे ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर प्रतिनिधींनी, आमदार लांडगेंच्या पुढेपुढे करण्यासाठी अजून किती दौडून, किती वेडेपणा करायचा, हे ठरविले पाहिजे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदार महेशदादा लांडगेंची तिरमारी किती सहन करायची, हेही ठरवले पाहिजे. कारण दुःख म्हातारी मेल्याचे नसते, तर त्यामुळे काळ सोकावतो, हे असते. कोणाचीही, कधीही आपला “बालभी बांका” होऊ शकत नाही, ही भावना निर्माण होणे, कोणालाही, कधीही घातकच, आणि ही घातकता समाज स्वास्थ्यासाठी जास्तच घातक ठरू शकते, हेही तितकेच घातक! ——————————————————