इस शहर मे राष्ट्रवादी परेशानसी क्यों हैं?

१९७८साली “गमन” नावाचा एक प्रायोगिक धर्तीवरील चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शहरयार यांनी लिहिलेली, जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली, एका शहरातील लोकांच्या आयुष्यावरची एक गाजलेली गझल होती,
सिने मे जलन आंखोमे तुफ़ानसा क्यों है,                      इस शहर मे हर शक्स परेशान सा क्यों है।
सध्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था या गझलसारखी झाली आहे काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. “आई खाऊ घालेना, बाप भीक मागू देईना”, अशा चमत्कारिक अवस्थेतून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी बाहेर पडण्याची वाट समस्त शहरवासी पाहात आहेत. त्यामुळे वर उधृत केलेल्या गाण्यात बदल करून
“इस शहरमे राष्ट्रवादी परेशानसी क्यों है!”
असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

शहर राष्ट्रवादीच्या परेशानीचे कारण दस्तुरखुद्द नामदार अजितदादा पवार यांनीच गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण केले आहे. शहर राष्ट्रवादीच्या मुख्य, युवक आणि महिला शहराध्यक्षांना आपल्या पदाचे राजीनामे देण्याचा फतवा त्यांनी जरी केला आणि राष्ट्रवादीत गावगोंधळ निर्माण केला. शहर राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. आता कोण, याची चर्चा शहरभर सुरू झाली. अनेकांनी प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून आपले घोडे पुढे आणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मोठ्या साहेबांना साकडे घालून आताच्या शहर राष्ट्रवादीच्या कार्यकारी मंडळींनी तूर्तास हे राजीनामा नाट्य थांबवून धरले, त्यावरचा पडदा उघडूच दिला नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. वेळेत झाल्या तर अवघ्या अडीच महिन्यात होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा बदल करून काय फरक पडणार आहे, यावर गल्लीगल्लीत चर्चासत्रे सुरू झाली. या सगळ्या नाट्यामुळे शहर भाजपाईंमध्ये मात्र, “कुछ खुशी, कुछ गम” अशी अवस्था सुरू झाली.

शहरयार यांच्या त्या गझलच्या पुढच्या ओळी आहेत,
दिल है तो धडकनेका बहाना कोई ढुंढें,                  पथ्थरकी तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है।
या ओळींप्रमाणे शहर राष्ट्रवादी साजिवंत ठेवायची इच्छा खरेच, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना आहे काय, हा खरा प्रश्न आहे. जर तशी इच्छा नसेल, तर प्रश्नच मिटला, मात्र असेल, तर त्यासाठी निमित्त निर्माण करण्यात करण्याचा प्रयत्न कोणी करावा यावर चर्चा होऊ शकते.

गेल्या आठवड्यात सांगवी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, सगळ्यांची अंडीपील्ली आपल्याला माहीत असल्याचे नामदार अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे. कोणाची मैत्री कोणाशी आणि कितपत आहे, हे माहीत असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. मग “बेहिस-ओ-बेजान” म्हणजेच असंवेदनशील आणि मृतप्राय शहर राष्ट्रवादी पक्षाकडे ठरवून दुर्लक्ष करण्याची अक्षम्य चूक नामदार अजितदादा पवार यांनी का केली असावी, हे अनाकलनीय आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दोनही भाजपाई आमदार आणि माजीआजी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांची नामदार अजितदादा यांच्याशी चांगली सुतगुत असल्याची चर्चा शहरभर आहेच. अजितदादा यांनीही ती कधी पूर्णतः खोडून काढण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यातून अगर वागण्यातून केल्याचे दृश्गोचार झालेले नाही.

शहरवासियांची साद, दादा – काका, आम्हाला वाचवा!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा सत्ताधारी भाजपाईंनी टक्केवारी आणि ठेकेदारीचा भ्रष्टाचारी अड्डा बनवून टाकला असल्याची शहरभर वदंता आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही ठेकेदारी आणि भ्रष्टाचार करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या भाजपचा कारभार शहराला नको असला तरी, सक्षम पर्याय उभा करण्यास अगर सत्ताधारी भाजपाईंना जाब विचारून जेरीस आणण्यास शहर राष्ट्रवादी कमी पडली, हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नसावी. तशातच अजूनही पूर्णतः न थांबलेले कारभारी बदलाचे वारे, राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्या, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे ठरले आहे. सध्याच्या करभाऱ्यांची, दादांनी मारले आणि काकांनी तारले, अशी अवस्था आहे. तर, बदलाची आस ठेवून असणाऱ्यांनी पाण्यात देव ठेवले आहेत. आताच्या घडीला लगेचच बदल करावा अगर बदल होणार नाही हे स्पष्ट करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा संभ्रम शहर राष्ट्रवादीला परवडणारा नाही. महापालिका निवडणुकांचा विचार करता, सत्ताधारी भाजपाई शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यूहरचना करीत आहे आणि अजूनही शहराचे कारभारी नक्की कोण या संभ्रमात राष्ट्रवादी चिनभिन आहे. आता दादा, काकांनीच हा संभ्रम दूर करावा. अन्यथा शहरयार यांच्या गझल मधल्या पुढच्या ओळी,
तनहाई की ये कौनसी मंज़िल है रफ़ीक़ो,                      ता-हद-ए-नजर एक बयाबान सा क्यों है।
यांसारखी होईल आणि हे मित्रांनो, शहर राष्ट्रवादीत नजर पोहोचेल तिथपर्यंत विराणा पसरला आहे, अशी अवस्था येईल आणि दादा – काका आम्हाला वाचवा अशी साद शहरवासी देत राहतील. शहरवासियांची ही साद मुकरुदन स्वरूपाची ठरू नये, यासाठि निर्णय होणे आणि तो अंमलात येणे, नितांत आवश्यक आहे.

बदल करायचा की न करायचा हा सर्वस्वी शहर राष्ट्रवादीचा आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा प्रश्न आहे. मात्र, त्यावर निर्णय होऊन नवे अगर जुने, किंवा जे असतील ते, कारभारी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूका वेळेत झाल्या तर अवघा अडीच महिन्यांचा कालावधी सत्ताकांक्षी शहर राष्ट्रवादीच्या हातात आहे. या अडीच महिन्यांच्या हातघाईच्या कालावधीत अनेक स्थित्यंतरे घडणार आहेत. काही लोक राष्ट्रवादीत येतील, पक्षाचे नफा नुकसान पाहून आणि त्यांचा हेतू तपासून घेणे, त्यांची गरज आणि उपयोगिता पाहणे आवश्यक ठरणारे आहे. तसेच बाहेर पडणारे देखील असतील त्यांना सक्षम पर्याय शोधणे, सत्ताधारी भाजपला ताकदीचे प्रतिद्वंद्वी उभे करणे, असा फार मोठा पल्ला राष्ट्रवादीला आणि त्यांच्या राजकीय मित्रपक्षांना गाठायचा आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीत संभ्रम आणि अराजकता असू नये, हे महत्त्वाचे. “इस शहर में राष्ट्रवादी परेशानसी क्यों है?” या शहरवासीयांनी विचारलेल्या प्रश्नाऐवजी शहर राष्ट्रवादीनेच शहरयार यांच्या त्या गझलमधील शेवटच्या
क्या कोई नाई बात नज़र आता है हम में,                    आईना हमें देख के हैरान सा क्यों है।
ओळींप्रमाणे शहर राष्ट्रवादीलाच, शहरवासीयांना प्रश्न विचारण्याची हिम्मत प्राप्त होईल.

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×