आपल्या बुडाखालचा अंधार लपविण्यासाठी शहर भाजपाईंचा कांगावा!

आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी गुन्हेगार लपविण्यासाठी आता पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंनी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून म्हणजेच मार्च २०१७ पासून अनेक लफडी कुलंगडी सत्ताधारी भाजपाईंनी केली आहेत. महापालिकेच्या कामकाजात, काही अधिकाऱ्यांना आणि प्रसंगी आयुक्तांनाही दमात घेऊन अगर आणखी कोणत्या “वेगळ्या” मार्गांनी अनियमितता निर्माण करण्यास भाग पाडले आहे. टक्केवारी आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले हे सत्ताधारी भाजपाई आता संशयित गुन्हेगारही ठरू लागले आहेत. एक माजी भाजपाई उपमहापौराला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. एक नगरसेविकेला तिच्या कार्यकर्त्यांसह लवकर जमीन मिळाला नाही म्हणून कारागृहात रहावे लागले आहे. जमीन हडपण्याच्या प्रकरणात एक नगरसेवकावर गुन्हा दाखल आहे. शहर भाजपाई नेत्यांच्या भ्रष्टाचारी कर्तृत्वाचा फटका बसून त्यांच्याच पक्षातील एक चांगल्या माणसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारला आहे. याची चाड बाळगून गप्प बसण्याऐवजी आता हे भाजपाई आपल्याच बुडाखालचा अंधार लपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारवर तोंडसुख घेऊन उगाचचा कांगावा करीत आहेत.

यालाच मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात?

नुकतेच शिवसेनेची सोडचिठ्ठी घेऊन भाजपाई झालेल्या गजानन पोपटराव चिंचवडे यांचे दुर्दैवी निधन झाले. एक चांगला कार्यकर्ता म्हणून नाव असलेल्या गजानन चिंचवडे यांना त्यांच्याच कुटुंबियांपैकी काहींनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अटक होणे शक्य होते. अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जमीन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आपल्या इभ्रतील लागलेला बट्टा सहन न झाल्यामुळे चिंचवडेंना हा त्रास झाला असावा अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे भांडवल करून, समस्त शहर भाजपाई आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडी सरकारला दोषी धरण्याचा कांगावा करीत आहेत.

खरे म्हणजे भाजपाई कमळाबाईच्या नादी लागल्याबरोबर चिंचवडेंच्या मागे शुक्लकाष्ठ लागले, म्हणून समस्त भाजपाईंना लज्जा उत्पन्न व्हायला हवी होती. शहर भाजपाईंच्या पापाचे खापर चिंचवडेंच्या माथी फुटले म्हणून त्यांनी गुमान राहावे हे योग्य होते. मात्र, आघाडी सरकारने चिंचवडेंच्या मागे चौकशीचा बडगा लावला असा आरोप आता शहर भाजपाई करीत आहेत. एखाद्या माणसाच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर करणे म्हणजे, हलकटपणाची परिसीमा आहे. कालवश गजानन चिंचवडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला चाळीस वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी आहे. याला ऑक्टोबर २०१९ मध्ये अस्तित्वात आलेले आघाडी सरकार कसे कारणीभूत असू शकते, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे शहर भाजपाईंनी चिंचवडेंच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करण्यालाच मेल्या मढ्याच्या टाळूवरले लोणी खाणे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गेले पाच आठवडे कमी पाच वर्षांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताकाळात या भाजपाईंनी आपल्या बुडाखालचा अंधारात अनेक अनियमितता, अनाचार, अनागोंदी करून भ्रष्टाचारी काळी कृत्ये केली आहेत. ही सर्व कृष्णकृत्ये आता पिंपरी चिंचवड शहरवासीयांसमोर उघड होऊ लागली आहेत. भाजपच्या एकंदर कारभाराबाबत शहरवासी आता नाराज आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या या स्थानिक भाजपाई नेत्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांंनी महापालिकेत भ्रष्टाचाराचा जो नंगानाच चालविला आहे, तो शहरवासीयांना आता कळून चुकला आहे. म्हणून मग यांच्यापेक्षा राष्ट्रवादीच बारी होती असा सूर शहरवासीयांमधून उठू लागला आहे. आपल्या हातून पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता निसटू लागली असल्याचे द्रुश्गोचर झाल्यामुळे हवालदिल झालेल्या स्थानिक भाजपाईंनी आता नवीन फंडा सुरू केला आहे.

स्थानिक भाजपाई नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून स्थानिकांचा कळवळा!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये भाजपाईंची सत्ता जाणार हे जवळपास नक्की झाले आहे. आपण केलेल्या काळ्या करतुतींमुळे आपली पुरती गच्छंती होणार हे डोळ्यासमोर आल्यावर या स्थानिक भाजपाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे राज्यातील आघाडी सरकार, पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिकांना ठरवून त्रास देते आहे, असा कांगावा सुरू केला आहे. महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर पडलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, राजेंद्र लांडगेंवर दाखल झालेला जमीन हडपण्याच्या गुन्हा आणि आता गजानन चिंचवडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे, त्यांचा झालेला दुर्दैवी अंत ही उदाहरणे देऊन राज्यातील आघाडी सरकार, त्यातही विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, स्थानिकांना मुद्दाम त्रास देते आहे असे दृश्य निर्माण करण्याचा प्रयत्न आता भाजपाई करीत आहेत.

मात्र, या तीनही प्रकरणाचा नीट धांडोळा घेतला असता, वेगवेगळी सत्ये समोर येतात. इतर भाजपाई मंडळींनी, किंबहुना भोसरीच्या भ्रष्टाचारी स्थानिक नेत्याच्या करतुतींमुळे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे गोत्यात आले, हे एक स्वयंस्पष्ट सत्य आहे. भोसरीच्या स्थानिक नेत्यांच्या स्वाधिष्ठित आणि स्वहिताच्या गदळ राजकारणाचे पाहिले बळी, दुर्दैवाने नितीन लांडगे ठरले, याची लाज बाळगायची सोडून उदाहरण म्हणून त्यांचा उल्लेख करण्याचा हलकटपणा स्थानिक भाजपाई करीत आहेत. राजेंद्र लांडगे यांना प्राधिकरणाची जमीन हडपण्यास राष्ट्रवादीने अगर राज्यातील आघाडी सरकारने प्रोत्साहन दिले नव्हते, तर भाजपाई शहराध्यक्षांच्या वरदहस्ताखाली राहून असले उद्योग करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यामध्ये निर्माण झाले, ही वस्तुस्थिती लपवली जात आहे. तर चाळीस वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी असलेल्या कौटुंबिक गुन्ह्यात कालकथीत गजानन चिंचवडे यांचे नाव आले आहे.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता केवळ राजकीय हव्यासापोटी आता भाजपाई शहराध्यक्ष आणि त्यांचे बगलबच्चे राज्याच्या आघाडी सरकारवर आणि त्यातही राष्ट्रवादीवर, किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. अचानक निर्माण झालेला हा स्थानिकांचा कळवळा, केवळ आपली पापे लपविण्यासाठी आणि आपल्या पापांचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्यासाठी करण्यात येतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अगर आघाडी सरकार स्थानिक भूमिपुत्रांना त्रासदायक आहे, असे दृश्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आपल्यालाही मोठे होण्याची मूळ संधी राष्ट्रवादी काँग्रेसने, अर्थात अजितदादा पवार यांनीच दिली हे मात्र, जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रकार आताच्या स्थानिक भाजपाईंनी चालविला आहे. अर्थात आता या कोणत्याही प्रकाराला अगर उद्योगाला पिंपरी चिंचवड शहरवासी भुलणार नाही, हे नक्की. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या भाजपाई आजीमाजी शहाराध्यक्षांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी कितीही कांगावा केला, तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंची गच्छंती निश्चित झाली आहे, हे येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचे सध्याचे भाकीत आहे. त्यामुळे बावचळलेल्या भाजपाईंनी चालविलेला हा कांगावा त्यांच्या बुडाखालचा अंधार लपविण्यास नक्कीच उपयोगी ठरणार नाही.

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×