शनिवारवाडा, महापालिका, भाजप आणि राष्ट्रवादी!

शनिवार वाड्याबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते, आपल्या निवासासाठी थोरले बाजीराव बाळाजी बल्लाळ या पेशवा म्हणजेच छत्रपतींच्या पंतप्रधानाने हा वाडा बांधला. या वाड्यासाठी जागा शोधत असताना मुठा नदीच्या काठावरच्या एक ठिकाणी ससा लांडग्याच्या मागे लागल्याचे दृश्य पेशव्यांना दिसले. यापुढे आपल्याला मराठा साम्राज्याची लांडगेतोड करण्याच्या मागे सतत पाळावे लागणार आहे, ज्या जागेत ससा लांडग्याच्या मागे लागतो, अशाच जागेतून त्यामुळे आपण पेशवाईचा कारभार चालवू या उद्देशाने याच जागेवर वाडा बांधण्याचे पेशव्यांनी नक्की केले. १७३४ साली काही काम बाकी असतानाच पेशवे बाजीराव बाळाजी यांनी या वाड्यात राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुघल, आदिलशहा, निजाम, टिपू सुलतानासह इंग्रज या लांडग्यांनी घेरलेल्या मराठेशाहीच्या रक्षणासाठी पेशव्यांनी या वाड्यातून कारभार करून अनेक लढाया मारल्या आणि मराठा साम्राज्य अबाधित राखून, अटकेपार, म्हणजेच अफगाणिस्थानपर्यंत मराठा साम्राज्याची धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्या जागेत ससा निडर होऊन लांडग्यांच्या मागे लागतो, त्या जागेवर हा शनिवार वाडा बांधण्यात आला.

आताच्या घडीला या शनिवार वाड्याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे, गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय साठमारीत या शनिवार वाड्याचा उल्लेख करण्यात आला. ते शनिवारवाडा मागतील, मग त्यांना तो द्यायचा का? असा सवाल पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाई महापौरांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उपस्थित केला. त्याला कारण म्हणजे, महापालिकेतील विरोधी पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादीने आपल्या चार स्थायी समिती सदस्यांच्या सहीने महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली. महाराष्ट्र महापालिका अधिनियम, अनुसुचितील प्रकरण दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे, स्थायी समितीच्या चार सदस्यांनी मागणी केली असता, विशेष सर्वसाधारण सभा  आयोजित करावी असे नियम सांगतो. मात्र, अधिनियमात अशी सभा बोलवावी असे म्हटले आहे, बोलवावीच असे नाही, तो अधिकार सर्वस्वी महापौरांच्या आहे, असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे. अधिनियमात “च” नसल्याने हे बंधनकारक नाही, असे स्पष्ट करताना महापौरांनी “ते शनिवारवाडा मागतील, द्यायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे.

उद्यापासून पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाई सत्ताकाळ केवळ तेरा दिवसांचा राहिला आहे. प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालट झाल्यावर, मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजपाईंना धारेवर धरण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने चालविला आहे. या तेरा दिवसात सत्ताधारी भाजपाईंचे तीन तेरा करण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आणखी संधी मिळण्याची शक्यता म्हणून या विशेष सभेच्या आयोजनाचा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. त्याचबरोबर अशी आयती संधी राष्ट्रवादीला मिळू नये, म्हणून भाजपाई महापौरांनी आपला अधिकारी वापरला आहे. विशेष सभा आयोजित करून गेल्या पाच वर्षातील भाजपाई भ्रष्टाचार आणि अनियमितता यावर कोरडे ओढण्याची संधी यामुळे राष्ट्र्रवादी आणि शिवसेनेला मिळाली असती, हे मात्र नक्की.

शनिवार वाड्याची महती आणि पिंपरी चिंचवड महापालिका!

शनिवार वाड्याच्या जमिनीची सशाने लांडग्याच्या मागे लागून त्याला पळवून लावण्याची हिम्मत आणि ताकद निर्माण करणारी महती, वर्णनातीत आहे. महत्वाचे म्हणजे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे चित्र देखील काहीसे तसेच झाले आहे. गेली पाच वर्षे भाजपाईंनी आपल्या सत्ताकाळात या महापालिकेची अक्षरशः लांडगेतोडच केली आहे. या लांडगेतोडीतून आणि लबाड लांडग्यांच्या कवंडळीतून महापालिका सोडवायची असेल तर, शनिवार वाड्याच्या भूमहतीला स्मरून सशांच्या धाडसाने या लांडग्यांना सळो की पळो करून सोडणे गरजेचे आहे. आता शहर राष्ट्रवादीचे लोक ही हिम्मत आणि ताकद कितपत धारण करताहेत यावर पुढचे सगळे राजकारण अवलंबून आहे. या लोकांनी आपापसातल्या लथाळ्या, हेवेदावे, व्यक्तिगत लाभहानी, राजकीय असूया, मोठा छोटा वाद, अलीकडचा पलीकडचा धोरण, आजीमाजी राग या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन केवळ भाजपाईंना पळवायचे आणि त्यांच्या लांडगेतोडीतून महापालिका सोडवून, या शहरातील जनसामान्यांना दिलासा द्यायचा, या भावनेने काम करणे महत्त्वाचे आणि आगत्याचे ठरणार आहे!

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×