आयुक्तांना सल्ला, ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका!

आज दिनांक १४ मार्च, २०२२ पासून पिंपरी चिंचवड शहरात आणि अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वेगळा अध्याय सुरू होतो आहे, तो म्हणजे महापालिकेत आता प्रशासकीय राजवट सुरू होते आहे आणि अर्थातच शहराचा करतुमअकरतुम कारभार, प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हातात जातो आहे. आता या शहराला तारणहार, मारणहार केवळ आणि केवळ आयुक्त राजेश पाटील असणार आहेत. किमान एक महिना आणि कमाल अनिश्चित काळासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून काम करणार आहेत. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याबाबत नुकताच कार्यकाळ संपलेल्या सत्ताधारी  भाजपाई आणि विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षात किंचितसा अढीयुक्त गैरसमज आहे. नुकत्याच सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाईंना ते राष्ट्रवादीचे वाटतात तर, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मंडळींना आयुक्त नक्की कुणाचे याचे नीटसे आकलन होत नाहीये. महापालिकेत आयुक्तांची वर्षपूर्ती होऊनही, त्यांचा कल आणि पद्धत याबद्दल राजकीय आणि प्रशासकीय मंडळींमध्ये एकवाक्यता नाही.

मात्र, अशा अनाकलनीय परिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, आपली प्रशासकीय राजवट सुरू करणार आहेत. या परिस्थितीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून एकच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, किंबहुना, त्यांना सल्ला देण्यात येत आहे, तो म्हणजे “पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, आपल्या प्रशासक म्हणूनच्या कारकिर्दीत स्वतः आणि प्रशासनातील कोणालाही ऊतू देणार नाहीत, मातू देणार नाहीत आणि घेतला वसा टाकुही देणार नाहीत.” कारण महापालिका आयुक्त राजेश पाटील हे एक संवेदनशील आणि “नाही रे” गटाशी जवळीक साधणारे व्यक्ती आहेत. आपल्या “ताई, मी कलेक्टर व्हयनू” या आत्मकथानात त्यांनी आपली परिस्थितीशी केलेली झुंज चितारताना, आपण कोणत्या आर्थिक गटाचे प्रतिनिधित्व केले आहे, हे खुलेपणाने मांडले आहे.

यापुर्वी ओडिसा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आदिवासींसाठी जे कार्य उभे केले, त्याची वाखाणणी शासन स्तरावर केली गेली आहे. आता त्यांना पिंपरी चिंचवड शहरासाठी आणि या शहरातील जनसामान्यांसाठी काही ठोस करण्याची संधी प्रशासक म्हणून उपलब्ध झाली आहे. समान्यजनांच्या मूलभूत सुविधांसाठी काही वेगळा कार्यक्रम महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तयार केल्याचे, त्यांनी सादर केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंदाजित अर्थसंकल्पात स्पष्ट केलेच आहे. तो अर्थसंकल्प पूर्ण करण्याची संधी आता आयुक्तांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयुक्तांना हवा असलेला एक महिना, नक्कीच मिळेल!

अशी एक चर्चा आहे, की पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार हाकताना येथील सर्वपक्षीय राजकारण्यांची आणि प्रशासकीय कारभारी मंडळींची स्वहितदक्ष कार्यपद्धती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना कळून चुकली होती. या राजकीय मंडळी आणि काही प्रशासकीय मंडळींचे मनसुभे त्यांच्या पूर्णतः लक्षात आले होते. खाजगीत चर्चा करताना या सर्व मंडळींना सरळ करण्यासाठी केवळ एक महिना हवा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आता प्रशासक म्हणून त्यांना “तो एक महिना” नक्कीच मिळाला आहे. कदाचित हा कालावधी सहा महिन्यांचा अगर अनिश्चित काळचा असू शकणार आहे. त्यामुळे आता या भ्रष्टाचारी, टक्केवारीबाज, आपमतलबी लोकांचे, प्रशासक म्हणून राजेश पाटील नक्की काय करणार आहेत, हे पाहणे मोठे गंमतीदार, तरीही गंभीर असणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारणी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची मिलीभगत असणे, ही काही नवीन अगर लपून राहिलेली बाब नाही, हे एव्हाना महापालिका आयुक्तांच्या नक्कीच लक्षात आले आहे. कोणतीही राजकीय व्यक्ती, प्रशासनाची साथ असल्याशिवाय भ्रष्टाचार अगर अनियमितता करूच शकत नाही, हे उघड गुपित आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा एकूणच कारभार या गुपिताला अनुसरूनच झाला आहे, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. भ्रष्टाचारी टक्केवारीची ही अनियमितता महापालिकेच्या कित्येक नस्त्यांमधल्या पानापानांतून बाहेर डोकावते आहे. या नस्त्या त्यांच्यातील घोळगोंधळ सांगण्यास आतूर आहेत, फक्त ते ऐकणारे कान दक्ष असले पाहिजेत.

आता, प्रशासक राजेश पाटील यांचे कान किती तयारीचे आहेत अगर त्यांची ऐकण्याची क्षमता कितपत आहे, यावर हे अवलंबून आहे, की त्यांना काय ऐकू येईल. अर्थात कानाला लागणारे आणि कान भरणारे आवाज टाळून पाटील यांना हा प्रत्येक नस्तीचा सांगावा समजून घेणे अपेक्षित आहे. काय दडलेले आहे या नस्त्यांमध्ये, याचा ढोबळ मागोवा घेतला असता, अनेक रहस्यमय बाबी दृष्टीपथात येतील. केवळ गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा तपासला तर, अनावश्यक कामे, अनियमित कामकाज, भ्रष्टाचारी टक्केवारी, उगाचच वाढविलेल्या विकासकामांच्या किमती, राजकारणी आणि प्रशासन यांच्या साटेलोट्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर मारण्यात येणारा डल्ला, राजकारण्यांच्या सगेसोयऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या निविदा, त्या निविदांमध्ये फुगवटा करून किमती वाढविणाऱ्या सल्लागारांचे सल्ले, खोटी कागदपत्रे, खोट्या बँक गॅरंटी जोडून मिळविलेल्या निविदा असे अनेक प्रकार या नस्त्यांमध्ये दडलेले सापडतील.

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत, मग ती महिन्याची असो अगर अनिश्चित काळाची, या नस्त्यांमध्ये डोकावण्याचे धारिष्ट्य पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि आता प्रशासक असलेले राजेश पाटील करतील काय हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आता पुढील काळात नक्कीच मिळेल मात्र, पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांना त्यांच्या समान्यजनांप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देऊन एव्हढीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की, पाटीलसाहेब, घेतला वसा टाकू नका आणि कोणी तसे करीत असेलच तर, तसे होऊ देऊ नका!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×