भोसरीचा बोका विधानभवनात गुरगुरतो तेव्हा ………..!

मार्जार वर्गातील घरगुती वंशाच्या मादीस मांजर असे म्हणतात, तर नरास बोका असे संबोधतात. तर असा हा बोका परवा म्हणजे बुधवारी २३ मार्च, २०२२ रोजी भोसरीच्या बालाजीनगर येथील राज्य वीज वितरण विभागाच्या महापारेषण केंद्राला मोठाच दणका देऊन गेला. त्याचबरोबर बिचारा शंभर एमव्हिएच्या विद्युत जनित्रातील विजेचा झटका खाऊन जीवानिशी गेला. मात्र मरतामरता  महापारेषण विभागाकडून आपल्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल दणकेबाज बदला घेण्यासही तो विसरला नाही. सुमारे साडेचार हजार लहानमोठ्या उद्योगांसह साठ हजार विद्युत जोडण्या बंद पडून गेला. त्या बोक्याचा पार्थिव देह बाजूला करून पुन्हा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यास महापारेषण विभागाला सुमारे दीड दिवस खर्चावा लागला. या दीड दिवसात अनेक उद्योजक, निवासी मंडळी महापारेषण विभागाला लाखोली वाहात होती. “व्यर्थ न हो बलिदान!” असा घोषा करून या बोक्याने मृत्योपरांत देखील आपल्या बलिदानाला न्याय मागितला.

त्या बोक्याने आपल्या मृत्यूमुळे महापारेषण विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगलीच, त्याबरोबरच त्याच्या बलिदानाचा फायदा पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनादेखील करून दिला. आता या दोन वेगवेगळ्या बाबी या एकट्या बोक्याचा बलिदानाने कशा साधल्या, यावर काही लोकांना प्रश्न पडू शकतो, हे नक्की. त्यामुळे या प्रकारचा साग्रसंगीत उलगडा करून देणे आपकर्तव्य समजून त्यावर माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

सर्वप्रथम महापारेषण विभागाच्या बालाजीनगर येथील वीज वितरण कार्यपद्धतीचा पोकळपणा दाखवून देण्यास या बोक्याचे बलिदान कामी आले. या महापारेषण केंद्रात अतिउच्च दाबाच्या २२० केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाला परावर्तित करून पुढे विद्युत पुरवठा करण्याच्या क्षमतेत आणण्यासाठी शंभर एमव्हिए क्षमतेची दोन जनित्रे आणि पंच्याहत्तर एमव्हिए क्षमतेचे एक राखीव जनित्र आहे. त्यापैकी शंभर एमव्हिएचे जनित्र गेले कित्येक दिवस बंद आहे आणि एकच शंभर एमव्हिएच्या जनित्रावर आणि पंच्याहत्तर एमव्हिएच्या राखीव जनित्रावर पिंपरी चिंचवड शहरातील निम्म्या भागाचा विद्युत पुरवठा चालू आहे. आता तो मृत्युमुखी पडलेला बोका त्या एकमेव शंभर एमव्हिएच्या जनित्रात घुसला आणि हे भूतल सोडता झाला. मात्र त्यामुळे महापारेषणच्या सुमारे साठ हजार ग्राहकांची लाहीलाही होऊन महापारेषणला शिव्याशाप मिळाले. त्याचबरोबर एकच जनित्र चालू असल्याचा शोध लागला आणि महापारेषण विभागाच्या अब्रूही लक्तरे वेशीवर आली.

आता या बोक्याचे बलिदान पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपयोगी कसे पडले, ते पाहू.

शंभर एमव्हिएच्या जनित्रात शिरून आपला प्राण गमावलेला हा बोका भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांचा खुट्टा विधानसभेतील भाजपाई विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर अजून घट्ट रोवणारा ठरला. या बोक्याने दिलेल्या बलिदानामुळे भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादांना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोंब मारण्याची एक नवी संधी उपलब्ध झाली. त्यामुळेच महेशदादांना ऊर्जामंत्र्यांचा आणि आघाडी सरकारचा निषेध करण्याचे बळ मिळाले, विधानभवनात आपल्या पहिलवानी अविर्भावात आणि आवाजात बोलण्याची संधी मिळाली, (मात्र तेथे त्यांचे आवडते गाणे, “पहिलवान आला रे, पहिलवान आला” वाजवण्याची सोय नव्हती, हे दुर्दैव!) टीव्हीवर तीन मिनिटे सात सेकंदाचे फुटेज मिळाले, ते फुटेज पिंपरी चिंचवड शहरातील बच्चाबच्चांपर्यंत पोहोचविण्याचे काम, महेशदादांच्या शहरातील यंत्रणेला मिळाले आणि या सर्वांचे पर्यावसान महेशदादा ज्या धाग्याने फडणवीसांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत, त्या धाग्याला अजून एक जोरगाठ मारणारे ठरण्यात झाले. अशी त्या बोक्याचा बलिदानाची अनन्यसाधारण अशी महती.

कोणताही बोका, आपली बाजू ठासून आणि हिरीरीने मांडताना गुरगुरतोच. तर भोसरीच्या बालाजीनगर येथील महापारेषणच्या प्रांगणात बागडणारा हा बोका, तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अक्षरशः खर्ची पडला. मात्र, आपल्या मृत्योपरांत देखील त्याने आपला मृत्यू व्यर्थ जाऊ दिला नाही. आपले गुरगुरणे त्याने विधानभवनात पोहोचविलेच आणि त्याचबरोबर आपले बलिदानही सत्कारणी लावले. त्याच्या बलिदानामुळे महापारेषणची लक्तरे दिसली आणि पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांना एक संधी मिळाली.

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×