भ्रष्टाचाराची प्रेतं, भानामती कुठली, बारामतीची की नागपुरी?

एक आटपाट नगर होतं, सोयीसाठी आपण त्याला पिंपवड म्हणू, तर या पिंपवड नगरातील जनता मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत होती. कोणे एके दिवशी या पिंपवड मधील जनतेला पाण्याचा वास येऊ लागला. वास इतका गदळ होता की, पाणी तोंडाजवळ न्यावेसे वाटेना. पाण्याची चवही घाणेरडी येऊ लागली आणि जनतेने तक्रारी सुरू केल्या. पाणीच घाण तर, जीवन घाण. जगायचं कसं? प्रश्न मोठाच गहन. मग नगर प्रशासनाने जनतेच्या तक्रारींवर विचार करून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पाणी घाण म्हटल्यावर, जिथून पाणी येते, तिथून शोध मोहीम सुरू झाली. शोधता शोधता नगर प्रशासनाच्या असे लक्षात आले की, नगराच्या काही पाण्याच्या टाक्यात प्रेतं पडली आहेत. ही प्रेतं सडल्यामुळे सगळ्याच नगराचे पाणी नासले आहे. ही कसली भानामती? कोणाची करणी? बारामती की नागपुरी?

मग पिंपवड नगरीच्या प्रशासनाने ही प्रेतं आली कुठून, कोणाची आहेत, कोणी टाकली, वगैरे प्रकाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी नगर प्रशासनाने समिती नेमली, समितीला सल्लागार नेमले, सल्लागारांना चाकर नेमले, चाकरांना पडचाकर, पडचाकरांना आडचाकर नेमले आणि एकदाचा शोध सुरू झाला. समितीने आश्चर्यकारक रित्या मुदतवाढ वगैरे न घेता सल्लागार वगैरेंच्या मदतीने अहवाल तयार केला आणि अहवालात सांगितले की, ही प्रेतं भानामती नसून, भ्रष्टाचाराची आहेत. ती आता कुजली आहेत, म्हणून नगराचे सगळे पाणी नासले आहे. या नासलेल्या पाण्यामुळे नगरात जीवनव्यापन कठीण झाले आहे. प्रेतांचे हे ढीग प्रत्येक जलाशयात आहेत, हे सांगतानाच, त्या प्रेतांची व्युत्पत्ती, आढळ आणि असणे याचा लांबलचक अहवाल तयार करण्यात आला. या प्रेतांची व्युत्पत्ती सांगताना अहवालाने चौदा सालपासूनच्या घटनांचा समावेश केला होता.

चौदा सालपर्यंत पिंपवड नगरात सगळे काही आलबेल नसले तरी, बरे चालले होते. चौदा साली नगरात सुभेदारांच्या निवडणुका झाल्या आणि घोळ सुरू झाला. तोपर्यंत नगरातील सुभेदार, दरकदार, मनसबदार, सरदार सगळे राजा अजितच्या अधिपत्याखाली गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र सुभेदार निवडीदरम्यान नगराच्या मालकी आणि मक्तेदारीची आस काही स्थानिक सुभेदारांना लागल्यामुळे राजा अजित यांचे जू झुगारून, या सुभेदारांनी देवइंद्राची झुल अंगावर पांघरली. तसे पाहिले तर, नगरीचे सर्वच सुभेदार, दरकदार, मनसबदार, सरदार एकमेकांचे जवळचे, आप्त, इष्ट, सगेसोयरे, अगदीच गेलाबाजार बगलबच्चे. मग देवइंद्राची झुल पांघरल्यामुळे राजा अजित कडे राहिलेल्यांना त्रास कसा द्यायचा, हा प्रश्न सर्वांना पडला. म्हणून मग नदीपल्याडच्या सुभेदाराने, नदीआल्याडच्या सुभेदाराच्या मुकसंमतीने साळकाई, म्हाळकाई आणि एक झोटिंग यांची नेमणूक केली आणि राजा अजित यांच्या मनसबदारांना त्रस्त आणि त्राहीमाम करण्याचा कार्यक्रम आखला. 

या साळकाई, म्हाळकाई आणि झोटिंगाने केवळ राजा अजितचे मनसबदारंच नव्हे, तर नगर प्रशासन आणि नगरवासीयांनाही वेठीस धरण्यास सुरुवात केली. काहीवेळा राजा देवइंद्राचे मनसबदारही या साळकाई, म्हाळकाई आणि झोटिंगाने त्रासले, पिडले. मात्र, राजा अजितचे मनसबदार त्रासले जात आहेत, म्हणून नदीपल्याडच्या आणि नदीआल्याडच्या सुभेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तशातच एकोणीस सालची मनसबदार निवड झाली आणि त्या निवडीत दोन्ही सुभेदारांसह राजा देवइंद्राच्या झुलिखालचे मनसबदार जादा निवडून आले. मग झोटींगाच्या मसलती कामास येऊन साळकाई नगराच्या तिजोरीची राखणदार झाली. आता आपल्याला थांबवणारे, रोखणारे कोणी नाही, या विचाराने साळकाई, झोटिंग आणि म्हाळकाई बेबंद झाले. त्यांनी नगर प्रशासन, राजा अजितचे मनसबदार, दोन्ही सुभेदार यांना वेठीस धरून भ्रष्टाचारी मुडदे पाडण्याचा सपाटा लावला.

भ्रष्टाचारी मुडदे पाडण्यात या साळकाई, म्हाळकाई आणि झोटींगाने नदीपल्याडच्या आणि नदीआल्याडच्या सुभेदारांनाही शरम वाटावी असे उद्योग केले. दोन्ही सुभेदार आणि साळकाई, म्हाळकाई, झोटिंग, विलासी संतोष, यांच्यासह राजा देवइंद्र आणि राजा अजित यांचे काही मनसबदार यांनी संगनमताने अनेक भ्रष्टाचारी मुडद्यांचा खच पाडला. हे भ्रष्टाचारी मुडदे, कचऱ्यात, कचरा वाहतुकीत, स्मार्ट सिटीत, रस्त्यात, खोदाईत, सिमेंटमध्ये, औषधात, जेवणात, पुतळ्यात, चबूतऱ्यात, पाण्यात, सांडपाण्यात आणि अशाच अनेक प्रकारात तयार झाले. बाकीच्या ठिकाणचे मुडदे गाडले गेले, मात्र पाण्यातले, सांडपाण्यातले सडले. आता या सडलेल्या मुडद्यांमुळे सगळे पाणी म्हणजे जीवन नासले. त्यामुळे नगरवासीयांना दुर्गंधीयुक्त आणि घाण चवीचे पाणी मिळत आहे.

समितीने आणि सल्लागारांनीं काढलेल्या या निष्कर्षामुळे पाणी खराब का झाले हे कळले, आता प्रश्न उभा राहिला, तो पाणी स्वच्छ कसे करायचे. देवइंद्राच्या सुभेदार, मनसबदार यांचा धर्म आणि धर्मपद्धतींवर जास्त विश्वास असल्याने, त्यांनी पाणी स्वच्छ करण्यासाठी गंगाजल, पंचामृत, अगदी गंगेच्या उगमस्थानातून, मागवले. कपिलेचे गोमूत्र, गोमय, पंचगव्य यांची सिद्धता केली. तांत्रिक मांत्रिक, बोलावले. यज्ञयागाचे नियोजन केले. दुर्गंधीयुक्त आणि घाणेरड्या चवीचे जीवन शुद्ध करण्याची सुरुवात झाली. यज्ञयागांमध्ये आहुती पडल्या, मांत्रिक, तंत्रिकांचे मंत्रोच्चारण झाले, गंगाजल, पंचगव्य, गोमूत्र, गोमय, पंचामृत कालवून झाले. सगळ्यांनी उसासे सोडले. आपली भ्रष्टाचाराची प्रेतं आता कुणाला कळणार नाहीत, आढळणार नाहीत, दिसणार तर त्याहून नाहीत, म्हणून राजा देवइंद्राचे सुभेदार, मनसबदार, सरदार, दरकदार सगळे सुखावले आणि निर्ढावले देखील.

मात्र, सकाळ होताच पुन्हा मागचे पाढे पंचावन्नच. पाण्याची म्हणजेच जीवनाची चव आणि गंध काही सुधारला नव्हता. तोच भ्रष्टाचारी प्रेतांची दुर्गंध सर्वत्र होता. आता मात्र, नगर प्रशासन गोंधळले. आता उपाय काय, यावर चर्चासत्रे, खलबते, मसलती, मल्लिनाथी झडू लागल्या. उत्तर काही केल्या सापडेना. राजा देवइंद्राच्या झुलिखालचे सगळेच हतबल आणि हतप्रभ झाले. राजा अजितचे मनसबदार देखील चक्रावले, आश्चर्यचकित झाले. नगर प्रशासनाने मग दवंडी पिटली, हा दुर्गंध, ही घाण चव घालवून देणाऱ्यास इनाम घोषित करण्यात आले. पिंपवड नगरीत चर्चा होऊ लागल्या. राजा देवइंद्राचे आणि राजा अजितचे लोकदेखील चर्चा करू लागले. एव्हढेच काय तर, या जीवन घाण करणाऱ्या भ्रष्टाचारी प्रेतांची राज्याच्या प्रमुख अधिपतीनेही दखल घेतली, तीही शासनदरबारी.

अचानक एक साधासा दिसणारा इसम नगर प्रशासनासमोर प्रकटला. त्याने नगर प्रशासनाला विचारले की, सर्व प्रकारचे शुद्धीकरण करण्यापूर्वी जलाशयात सडलेली प्रेतं काढली का? प्रेतं तशीच ठेऊन केलेले शुद्धीकरण काय कामाचे? राजा देवइंद्र आणि राजा अजित यांच्या सुभेदार, मनसबदार, दरकदार, सरदार यांच्यासह नगर प्रशासनही बावचळले. अरे, खरेच की, ती प्रेतं तशीच ठेऊन आपण या राजा देवइंद्राच्या झुलिखालच्या लोकांनी घातलेल्या घोळाला फसलो आहोत. एव्हाना मनसबदारांचा कार्यकाळही संपला होता. आता ही प्रेतं काढायची कुणी? नगर प्रशासनाने आता ही सडलेली, कुजलेली, भ्रष्टाचाराची प्रेतं काढण्यासाठी हात सरसावून पुढे आले पाहिजे, तरच नगरवासीयांचे जीवन म्हणजेच त्यांना मिळणारे पाणी शुद्ध होऊ शकेल, यावर नगर जनांचे एकमत झाले आहे. नगर प्रशासन हे काम कधी आणि कसे करते आहे, याची वाट नगरवासीयांकडून पहिली जात आहे.

———————————————————

(सदर कथा तथागत गौतम बुद्धाच्या जातककथांपासून प्रेरित असून, याचा उद्देश केवळ मनोरंजनाचा आहे. प्रसंग, वर्णन, स्थिती, घटना आणि व्यक्तिविशेष यांपैकी कशाचेही साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×