शहर भाजपाईंनी कोंबडा झाकला म्हणून दिवस उगवायचा थांबला नाही!

भाजपाईंनी पळपुटेपणा दाखवून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा घेणे टाळले. मात्र कोंबडा झाकून ठेवला म्हणजे दिवस उगवायचा थांबत नाही, हे दाखवून देऊन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि आता प्रशासक, राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर केले. नुसते मंजुरच केले नाही, तर भाजपाई स्थायी समितीच्या सर्व राजकीय उपसूचना नाकारून, आता भाजपाईंची सद्दी संपली, हेही स्पष्ट केले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीस सादर केलेले मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, काही प्रशासकीय दुरुस्त्या स्वीकारून मंजूर करण्यात आले. १४ मार्च, २०२२ पासून पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू झालेल्या प्रशासक कारकिर्दीतील पहिली सर्वसाधारण सभा, अंदाजपत्रक मंजुरीने, प्रशासकीय कारकिर्दीत पुढे काय होणार आहे, याची चुणूक दाखविणारी ठरली आहे.

संधी असूनही पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी महापालिकेची शेवटची सर्वसाधारण आमसभा घेणे टाळले. विरोधी पक्षाकडून म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादीकडून गेल्या पाच वर्षातील भाजपाई कारकिर्दीतील भ्रष्टाचारी कारभाराचे वाभाडे काढले जातील या भीतीने, भाजपाईंनी पळपुटेपणा दाखविला. खरे म्हणजे, आपल्या चांगल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याची एक चांगली संधी म्हणून या शेवटच्या सर्वसाधारण आमसभेचा फायदा सत्ताधारी भाजपाईंनी घेणे अपेक्षित होते. याचबरोबर अंदाजपत्रक मंजूर करून, पुढची सत्ता आपलीच असल्याचा, आत्मविश्वासी संदेश मतदारांपर्यंत पोहोचविण्याची संधी सत्ताधारी भाजपाईंना मिळाली असती. मात्र, आपणच घातलेल्या भ्रष्टाचारी नंगानाचाच्या करतुती उघड्या पडतील या भीतीने भाजपाईंनी पळपुटेपणा दाखविला. आपणच उभ्या केलेल्या भुतांना पिंपरी चिंचवड शहर भाजप पुरती घाबरली आहे, हेच यावरून स्पष्ट होते आहे. आपल्या केलेल्या कामांपेक्षा घातलेले घोळगोंधळ जादा चर्चिले जाण्याची भीती, भाजपाईंच्या या पळपुटेपणात आहे.

आपल्याच पायावर आपणच धोंडा पडून घेणारे भाजपाई!

आता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासकिय नियंत्रणात आहे. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांच्या हातात सर्व प्रशासकीय व घोरणात्मक निर्णय आहेत. प्रशासनाने तयार केलेले आणि महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडलेले अंदाजपत्रक, स्थायी समितीने सुमारे एक हजार कोटींच्या पाचशे एकोणनव्वद वाढ घटीच्या उपसूचना स्वीकारून मंजूर केले आणि अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण आमसभेत पाठविले. मात्र, सत्ताधारी भाजपने ही आमसभाच घेणे टाळले. त्यामुळे खरे म्हणजे आपण सादर केलेल्या अंदाजपत्रकाला मंजूर देण्याची संधी भाजपाईंनी आपल्याच नाकर्तेपणामुळे अक्षरशः दवडली. महापालिका निवडणुका याच आर्थिक वर्षात झाल्या आणि भाजपची सत्ता पुन्हा आली तर आपल्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्याची संधी भाजपाईंना मिळाली असती. अगदीच सत्ता आली नाही तरी, भाजपने तयार केलेले अंदाजपत्रक नाईलाजाने राबविणे सत्तेत येणाऱ्या पक्षांना भाग पाडले असते. मात्र, आपल्याच घोळगोंधळाला घाबरलेल्या भाजपाईंनी, आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आहे.

प्रशासकीय अंमलाची पहिली झलक! 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेतून पायउतार होताना पुढच्या मानसुभ्याची तयारी करण्याची चांगली संधी त्या निमित्ताने भाजपाईंनी स्वहस्ते घालवली. आता महापालिकेवर प्रशासकीय अंमल सुरू झाला आहे. महापालिकेचे प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही, हे स्पष्ट करण्याची संधी म्हणून अंदाजपत्रक मंजुरीकडे पाहिले असल्याची खात्री दिली आहे. कारण उपसूचना नाकारताना प्रशासक आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी दिलेल्या उपासूचनाही नाकारल्या आहेत. त्यामुळे हे केवळ आणि केवळ आयुक्तांचे, आयुक्तांनीच प्रशासक म्हणून मंजूर केलेले अंदाजपत्रक असणार आहे. महापालिका निवडणुका मे महिन्याच्या शेवटी होवोत अगर सप्टेंबर आक्टोबर दरम्यान अगर नंतर होवोत, सत्तेत येणाऱ्या पक्षाला आयुक्तांच्याच अंदाजपत्रकाप्रमाणे काम करावे लागेल हे विशेष!

मात्र, या सगळ्यात, मोठी नामुष्की गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता भोगलेल्या भाजपाईंच्या वाट्याला आली आहे, ती म्हणजे भाजपाईंनी अंदाजपत्रक मंजूर करणे टाळले. भाजपाईंनी कोंबडे कितीही झाकले तरी, प्रशासक आयुक्तांनी दिवस उगवायचा थांबला नाहीच, हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले आहे!

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×