सुस्तावलेले राजकारण, धास्तावलेले राजकारणी आणि पस्तावलेले उमेदवार!

निवडणुका पुढे गेल्या, कधी होतील माहीत नाही; कशा होतोल, नागरिकांचा मागासवर्ग संवर्गाच्या आरक्षणासह, की आरक्षणाशिवाय, माहीत नाही; प्रभागरचना परत बदलेल काय, माहीत नाही; असा सगळा अशाश्वताचा प्रकार. आतापर्यंत इतरेजन निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात कज्जा-खटला दाखल करायचे, आता निवडणूक आयोगच न्यायालयात गेलाय. सगळंच मुसळ केरात म्हणण्यापेक्षा मुसळाचाच आख्खा केर झालाय, अशी परिस्थिती. टांगती तलवार म्हणण्यापेक्षाही चमत्कारिक स्थिती. या सर्व बाबींमुळे एक प्रकारचे सुस्तावलेपण या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात निर्माण झाले आहे. “सगळा खर्च करतो” म्हणणारे नेते, बगला झाकायला लागले आहेत. परिस्थिती अशी की, खर्च कोणाचा करायचा आणि किती काळ, हे सगळेच अध्याहृत झाले असल्यामुळे समस्त राजकारणी धास्तावले आहेत. त्याही पुढची परिस्थिती आहे ती, उमेदवारांची. मी लढणारच, किंबहुना, मीच लढणार असे म्हणून शड्डू ठोकून झाल्यावर आता निवडणूकच पुढे गेली आणि तीही किती काळासाठी माहीत नाही म्हटल्यावर, पस्तावले आहेत.

तर अशा या अशाश्वताच्या परिस्थितीत सध्या पिंपरी चिंचवड शहर आणि या शहरातील समस्त राजकारणी लोक आहेत. आताची अशी किंकर्तव्यविमूढ परिस्थिती या शहरात कधीच निर्माण झाली नव्हती. कोणाची तरी सत्ता येणार, कोणाची तरी नाही येणार अशी सर्वसाधारण सवय या शहरातील समान्यजनांनाही होती. मात्र लटकंतीचा असा प्रकार या शहरानेही यापूर्वी कधी अनुभवलेला नाही. त्यामुळेच शहरातही एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली आहे. साधारणतः सुस्तावलेल्या या शहराच्या राजकारणामुळे धास्तावलेल्या राजकारण्यांच्या गोटात नक्की काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या धांडोळ्यातून काही गंमतीशीर पण गंभीर बाबी समोर आल्या आणि त्याच बाबींचा उहापोह करण्याचा प्रयत्न काही जाणकार मंडळींनी केला आहे.

या सुस्तावलेल्या राजकारणाचे धास्तावलेपण सगळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवले ते पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंच्या गोटात. एकीकडे सोडून गेलेले नगरसदस्य, दुसरीकडे ज्यांना सोडून देण्याचे ठरविण्यात आले होते, ते नगरसदस्य, अशा दुहेरी कचाट्यात शहर भाजपाई सापडले आहेत. जे सोडून जाणारच आहेत, असे भाकीत मांडून माजीआजी भाजपाई शहाराध्यक्षांनी गणिते मांडली होती, त्या गणितांची मूळ समिकरणेच आता चुकीची ठरली आहेत. काय दोनचार सोडून जातील ते जातील, असे म्हणून पर्याय उभे करण्याची तयारी दाखवलेल्या या स्थानिक भाजपाई करभाऱ्यांचा होरा चुकला आणि सोडून जाणाऱ्यांंची संख्या वाढली. त्यामुळे पर्याय शोधण्यात जास्त समय आणि मय व्यतीत झाले. अर्थातच ज्यांना सोडून देण्यात या स्थानिक कारभाऱ्यांना रस होता, त्यांना आता थांबविणे भाग पडते आहे. एव्हढेच नव्हे तर, त्यांच्या नाकदूऱ्या काढाव्या लागताहेत. शिवाय त्यांच्या जागेवर पर्याय म्हणून सांगून ठेवलेल्यांना कोठे कोठे चोळावे लागते आहे, ते निराळेच.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक जमेची, एक खातरजमेची आणि एक खामीची बाजू अशा त्रिमितीत स्थानिक कारभारी अडकले आहेत. जमेची बाजू ही की, पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांची भूमिका विरोधकांची होती म्हणून, त्यांना काहीही सिद्ध करायचे नाहीये. विरोध करताना आम्ही काय केले, हे सांगण्याची गरज नसते. त्यामुळे आम्ही नव्हतो म्हणून काय झाले, हे ठासून सांगितले तरी पुरेसे आहे. पण म्हणून त्यांचा ताण कमी आहे. खातरजमेची बाजू तेव्हढी अत्यंत हुशारीने आणि चलाखीने वागून भरून काढता येते. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हुशार आणि चलाख मंडळींपेक्षा बनेल मंडळींची, त्यातही हुशार आणि चलाख पण बनेल मंडळींची संख्या जास्त असल्याने प्रत्येकाच्या हेतूंची खातरजमा करणे मुश्किलीचे आणि जिकिरीचे होत आहे. राष्ट्रवादीत खामी म्हणजे कमतरता हीच की प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठांची मोठीच उणीव या मंडळींमध्ये आहे. त्यामुळे कोण कोणाच्या पायात पाय घालेल, कोण कोणाला गोत्यात आणेल अगर तसे करणारच नाही याची ठाम शाश्वती मिळणे दुरापास्त आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस याआगोदारच्या पाच वर्षात सत्तेतही नव्हती आणि विरोधातही नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर तशी कोणतीही नैतिक अगर अनैतिक जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांचे सगळे आलबेल चालले आहे. त्यांना कसलीही उत्तरे द्यायची नाहीत, केवळ प्रश्न विचारून त्यांचे भागणार आहे. मात्र, काँग्रेस सत्तेत आणि विरोधातही का नव्हती, यावर अलाहिदा संशोधनपर शोधनिबंध तयार करावा लागेल. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत तर सगळा आनंदीआनंदच आहे. या पक्षात कोण कोणाच्या वर आणि कोण कोणाच्या खाली काम करतो आहे, हे त्यांनाही नीटसे समजलेले नाही, तर आम मतदार बिचारा अडाणीच ठरतो. पिंपरी चिंचवड शहराच्या दोन त्रितीयांश भागाचे खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र गेली अनेक दशके या शहरात शिवसेनेने सैन्य नसलेले सेनापतीच दिले आहेत. आता हा या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नाकर्तेपणा की सेनापती म्हणून मिरवणाऱ्यांंचा, यावर वेगळे संशोधन करावे लागेल.

यानंतर निवडणुकांच्या चाव्याने बाधित झालेल्या इतर पक्ष, संघटना, स्वतःला सामाजिक वगैरे म्हणवणारे लोक तर “लेना ना देना, फुकटका घुमना” अशा परिस्थितीत आहेत. त्यांना नक्की काय करायचे आहे, हेच अजून उमगलेले नाही. तर सध्या पिंपरी चिंचवड शहराचे वातावरण या1 अशा परिस्थितीचे झाले आहे. या सुस्तावलेल्या राजकारणात धास्तावलेले राजकारणी आणि पस्तावलेले उमेदवार कितपत जान आणतात, यावर सगळे पुढचे आखाडे अवलंबून आहेत. आता हा सगळा खेळ, राज्यातील आघाडी सरकार, राज्यातील विरोधक आणि केंद्रात सत्ताधारी असलेले भाजपाई, केंद्राच्या भाजपाई सरकारच्या अखत्यारीत असलेला निवडणूक आयोग आणि अर्थातच सर्वोच्च न्यायालय यांच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. हे अवलंबित्व जेव्हा संपेल, तेव्हाच काहीतरी स्पष्ट चित्र दृष्टीपथात येईल. तोपर्यंत केवळ वाट पाहणेच सामान्य मतदारांच्या हाती शिल्लक राहिले आहे.

—————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×