शहरातील बाटगे भाजपाई नात्यागोत्यांमध्ये पेरताहेत भाऊबंदकीचा सुरुंग?

जुम्मा जुम्मा आठ दिन भाजपाई झालेल्या बाटग्यांनी निदान पिंपरी चिंचवड शहरातली तरी, आख्खी भाजप नासवली. नुसती नासवली असेच नाही तर, आता हे बाटगेच मूळ भाजपाई असल्याचा आव आणताहेत. पिंपरी चिंचवड शहरात मुळचे भाजपाई हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. राष्ट्रवादीचे मीठ खाऊन एहसान फरामोश झालेल्या मंडळींनी, आपला स्वहिताचा भ्रष्टाचारी कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपची कास धरली. स्वहिताचा आणि राजकीय लाभाचा हा बाटग्या भाजपाईंचा सोस इतका भयावह होऊ लागला आहे की, आता नात्यागोत्याच्या संबंधांमध्येही सुरुंग पेरण्यास हे बाटगे भाजपाई जरादेखील कचरत नाहीत. एकमेकांचे भाऊबंदच एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे कारस्थान आता पिंपरी चिंचवडच्या भाजपाई आजीमाजी शहाराध्यक्षांनी सुरू केले आहे. शहरातील प्रत्येक घराघरात, गावागावात, आळीआळीत, मोहल्यामोहल्यात, एकमेकांना शह काटशह देणारे लोक या भाजपाईंनी तयार केले आहेत.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपच्या शहराध्यक्ष आमदारांवर निशाणा साधला. भाजपाई शहराध्यक्षांचा भोसरीच्या विकासाचा दावा किती पोकळ आहे, हे दाखविण्यासाठी राज्य सरकारच्या दस्तनोंदणी विभागाने तयार केलेल्या आधारभूत दरनिश्चितीचा आधार घेतला. भाजपच्या प्रसिद्धीयंत्रणेने लगेच एक रणजित गव्हाणे नावाचा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता पैदा केला आणि त्याला राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणेंच्या विरोधात विधान करायला लावले. गव्हाणेंना उत्तर देण्यासाठी त्यांच्याच भावकितील एखाद्याला तयार करणे म्हणजेच घराघरात भांडणे आणि वाद तयार करणे आणि तेही केवळ राजकारणापायी, हे कितपत योग्य आहे याचा किंचितही विचार भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी करू नये, हे सगळ्यात खेदजनक. मात्र, केवळ राजकारणासाठीच कशाचाही आणि कोणाचाही बळी चढवायचा असा हडेलहप्पी विचार यामागे असावा हे जास्त खेदजनक आणि उद्विग्नता निर्माण करणारे आहे.

अर्थात, पिंपरी चिंचवड शहरातील या बाटग्या भाजपाईंना त्याचे कोणतेही वैषम्य नाही. कारण या सर्वच उपऱ्या बाटग्याची सुरुवातच धमक्या आणि एहसान फरामोशीतून झाली आहे. आता शहर भाजपचे कर्ताकरविता म्हणून उजळ माथ्याने कारभार करणाऱ्या या बाटग्या भाजपाईंनी आपल्या पूर्वीच्या नेत्यांच्या उपकाराची होळी करूनच आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कारभाराची आणि परस्पर सामंजस्याची अपेक्षा ठेवणेच गैर आहे. मात्र, त्यामुळे आता घराघरात, गावागावात, आळीआळीत कलह आणि वाद निर्माण होतील हे महत्त्वाचे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याच घराचे वासे आपणच मोजू पाहणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचे भविष्य काय, हे आहे.

प्रत्येक घरात कुरुक्षेत्र निर्माण करण्याची ही भाजपाई नीती, आतापर्यंत इतकी फोफावली आहे की, प्रत्येक कुटुंबात एक महाभारत घडण्याची वेळ आली आहे. भाजपची “फोडा आणि मग झोडा” ही नीती आता पिंपरी चिंचवड शहरातही वापरली जाऊ लागली आहे. मात्र, यातून भाजपच्या गोटातही तणाव निर्माण होऊ शकतो, याचा विचार या भाजपाई माजीआजी शहाराध्यक्षांनी केलेला दिसत नाही. हेच महाभारत आपल्या घरातही घडू शकते, याबाबत हे भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष अनभिज्ञ आहेत काय अगर ते तसे सोंग आणताहेत काय, यावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे. मात्र, या वादात जे वापरले जाताहेत त्यांचे भवितव्य काय, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×