लक्ष्मणभाऊंनी हात हलवला, अनेकांची मने हेलावली, अनेकांचे जीव भांड्यात!

सुमारे दीड महिना अक्षरशः मृत्यूशी झुंज देऊन जिंकलेले लक्षणभाऊ जगताप यांना काचेतून का होईना समक्ष हात हलवताना, नमस्कार करताना पाहून, अनेकांची मने हेलावली. अनेकांचे अनेक अर्थांनी जीव भांड्यात पडले. पोशिंदा जगला पाहिजे असे वाटून नियतीनेच लक्ष्मणभाऊ जगताप यांना आपल्यात राखून ठेवले ही भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आज आहे. त्यामुळे लक्ष्मणभाऊंचे हात हलवणे, अनेकांची मने हेलवणारे ठरले आहे. अर्थात काही आपमतलबी मंडळींसाठी आपला मतलब आता पुन्हा साधता येईल ही भावना आहे, तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना त्यांचे असणेच आनंददायी आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात आपले निश्चित स्थान निर्माण करून गेली पस्तीस वर्षे या शहराच्या विकासाचा भार वाहणारे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजपचे माजी शहराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहरावर आपला एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर प्रेम करणारे लोक, त्यामुळे शहरभर आहेत. त्यांच्या पुन्हा कार्यरत होण्याने, अनेकांना अनेक अर्थाने जीवदान मिळणार आहे.

गेले दीड महिना शहरात एक प्रकारचे उदास असे वातावरण लक्ष्मणभाऊंच्या आजारपणामुळे पसरले होते. अर्थात ही उदासी काहींची प्रेमापोटी तर काहींची मतलबापोटी होती. ज्यांची प्रेमापोटी होती, त्यांच्याबद्दल कोणाचेही काही म्हणणे असण्याचे कारण नाही. मात्र, मतलबापोटी उदास आणि चिंताग्रस्त झालेल्यांची चर्चा त्यानिमित्ताने होणे, अत्यावश्यक आहे. “आता गंभीर व्हायला हवे…….” असे म्हणून लक्ष्मणभाऊंच्या आजारपणावर प्रतिक्रिया देणारांचा मतलब ओळखता आला पाहिजे. त्यासाठी शहराच्या राजकारणाची काही पार्श्वभूमी विशद करावी लागेल.

भाऊंच्या मेहनतीवर, आयत्या बिळातील भाजपाई नागोबा!

२०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका भाजपने तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढल्या. आपला राजकीय डावपेचांचा कस लावून आणि योग्य व्यक्तींना योग्य प्रकारे वापरून सर्वांच्या मदतीने भाऊंनी शहरात भाजपची सत्ता अक्षरशः खेचून आणली. आताचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांचे महत्त्वाचे योगदान आणि “शहर-ए-आझम” आझमभाई पानसरे यांचा विजयी सहभाग यामुळे हे सत्तापरिवर्तन झाले. ही राजकीय उलथापालथ केवळ लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या राजकीय खेळ्यांचे फलित होते. त्याअगोदर तीन तेरा एव्हढीच लायकी असलेला भाजप, भाऊंनी जुन्या नव्या भाजपाईंची आणि राष्ट्रवादीतून आलेल्या आपल्या सहकाऱ्यांची व्यवस्थित मोट बांधून सत्तेत आणला.

त्यानंतर अचानक तत्कालीन भाजपाई पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुचकामी वाटल्याने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाची गच्छंती झाली आणि नव्याने दिल्या घेतल्या संबंधातून गळ्यातले ताईत झालेले भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांची वर्णी भाजपचे शहराध्यक्ष म्हणून लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तेचा पुरेपूर उपभोग घेताना या सर्वच मंडळींनी कोणतीही कसूर केली नाही. अक्षरशः ओरबाडल्यासारखी सत्ता वापरली गेली. सत्ता मिळवून देण्यात सगळ्यात मोठा वाटा असलेले लक्ष्मणभाऊ जगताप आणि भाजपला राक्षसी बहुमताच्या आकड्यांवर आणून पोहोचविणारे आझमभाई पानसरे यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. भोसरीने चिंचवडवर कायम कुरघोडीचे राजकारण भाजपाई भोसरीकर शहराध्यक्ष आणि त्यांच्या व्यावहारिक नेत्यांनी केले आहे. सत्तेच्या आयत्या बिळावरचे हे नागोबाच नव्हेत काय, अशी भावना शहर भाजपच्या गोटात असल्यास नवल वाटायला नको.

लक्ष्मणभाऊंचे आजारपण आणि भाजपाई मतलबी राजकारण! 

विदेशातून उपचार घेऊन आल्यावर अचानक लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आजारपण बळावले आणि त्यांना बाणेरच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपच्या लेखी लक्ष्मणभाऊंचे काय स्थान आहे, याचा उलगडा झाला. भाऊ अत्यावस्थ असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यक्रम रद्द करून, भाऊंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या बंधूंना आश्वस्थ करण्यासाठी समक्ष ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, शहरातील आणि वरिष्ठ पातळीवरील कोणत्याही भाजपाई नेत्यांनी आपल्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही. शहरातील काही भाजपाई नेते तर, आता आपला सत्तेतील वाटेकरी “वाटेला लागला”, असे म्हणून आतल्याआत खूषमस्करे झाले. मात्र, नियतीने त्यांचीच मस्करी करून लक्ष्मणभाऊंना पुन्हा संजीवनी दिली.

भाऊंच्या आजारपणा आणि औषधोपचारातही काही भाजपाईंकडून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. लक्ष्मणभाऊंसाठी कशी औषधे मिळविली, उपचारात कसे मार्गदर्शन केले, भाऊंना दुरून का होईना, पाहता यावे म्हणून कसे प्रयत्न केले, यांची रसभरीत वर्णने ठरवून प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसूत करण्यात आली. ज्यांचे नाव घेतले तरी लक्ष्मणभाऊंच्या तोंडाची चव कडवट होत होती, असे काही “सांगेल काम ते कर” अशा वकुबाचे लोक आवर्जून ठाण मांडून का बसले, किंबहुना, त्यांना कोणी बसून राहण्यास सांगितले, हे अजूनही गुलदस्तात आहे. मात्र, लक्ष्मणभाऊ यांच्या प्रकृतीत सुधार होऊ लागताच, या मंडळींनी आपले तोंड काळे केले.

वावड्या, चर्चा आणि तर्कवितर्कांचा सावळागोंधळ!

प्रकृती बिघडल्यामुळे बाणेरच्या ज्युपिटर रुग्णालयात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना दाखल केले गेले. मात्र, अनेक वावड्या ठरवून उठवण्यात आल्या. भाऊंची प्रकृती पुरती बिघडली आहे इथपासून अगदी जाहीर करायचे बाकी राहिले आहे इथपर्यंत अनेक चर्चा शहरात सुरू झाल्या. काही नेत्यांचे काहीशे कोटी अडकलेत, ते नक्की कुठे आहेत, ते कळण्याची वाट पाहिली जात असल्याचीही चर्चा सुरू झाली. परदेशी बँकांमधल्या खात्याची शहानिशा करण्याची वाट पाहिली जात असल्याचीही चर्चा झाली. आता भाऊ नाहीत, असेच गृहीत धरण्याचे मानसुभे काहींनी आखले. मात्र, भाऊंवर प्रेम करणाऱ्यांची सदिच्छा, त्यांनी घातलेले साकडे, कुटुंबीयांनी दाखवलेला संयम आणि हिम्मत या सर्वांचे फलित म्हणून आज आमदार लक्षणभाऊ जगताप रुग्णालयातून सुखरूप घरी पोहोचले. नियतीने भाऊंच्या चाहत्यांना निराश केले नाही.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना आमच्या वाट्याच्या आयुष्याचीही दोन चार वर्षे मिळोत, त्यांच्या असण्याने आनंदलेली अनेक माणसे या शहरात आहेत. त्यामुळे त्यांची साथ आणि सहवास कायम रहावा, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे, याच सढळ, सहृदय सदिच्छा!

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×