महापालिकेत वाढू शकतो अनुसूचित जाती, जमातींसह सर्वसाधारण महिलांचा टक्का!

प्रभाग रचना आणि त्या अनुषंगाने येणारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी असणारे आरक्षण जाहीर झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत एकशे एकोणचाळीस नगरसदस्य असतील. त्यापैकी सत्तर जागा आरक्षणाने महिलांना देण्यात आल्या असल्या तरी, सर्वसाधारण आणि जिथे महिला आरक्षण नाही अशा, अनुसूचित जाती, जमातींच्या प्रभागातही महिलांना निवडणूक लढता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे अशा खुल्या जागांवर निवडणूक लढण्याची तयारी आणि वकूब असलेल्या महिला देखील पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आहेत. त्यामुळे महिलांना जादाच्या संधी मिळून महिलांची टक्केवारी वाढण्याची चिन्हे शहरात आहेत. सर्वसाधारण गट म्हणजे पुरुष आरक्षण नाही, याची कायदेशीर समज धोरणकर्त्यांना करून देण्याची धमक, शहरातील महिलामध्ये नक्कीच आहे. मुळातच एकशे एकोणचाळीस या विषम संख्येत सदस्यसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तर महिलांसाठी आरक्षण असून एकोणसत्तर महिलांच्या नसलेल्या अनारक्षित जागा आहेत. या जागांवर महिला आपला दावा सांगू शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचे!

अनुसूचित जातीच्या महिलांना यात सगळ्यात जास्त संधी उपलब्ध आहेत. ज्या बावीस प्रभागात अनुसूचित जातींसाठी आरक्षण आहे, त्यापैकी अकरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण आहे. मात्र कोणतीही अनुसूचित जातीच्या महिला या बावीस जागांवर निवडणुकीत भाग घेऊ शकते. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण म्हणजेच कोणतेही आरक्षण नसलेल्या जागांवरही आपले नशीब अजमावून पाहू शकतात. कोणतेही आरक्षण नसलेल्या जागा म्हणजे पुरुष आरक्षण असा समज राजकीय पक्ष आणि मातब्बर राजकीय पुढारी यांनी करून घेतला आहे. मात्र, वकूब आणि ताकद असलेल्या महिलांसाठी सगळे रान खुले असून, कोणत्याही प्रभागात, कोणत्याही आरक्षणात अगर अनारक्षित जागेवर त्यांना आपली ताकद अजमावण्याची संधी आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांनाही अनुसूचित जातीच्या बावीस जागा वगळता एकशे सतरा जागा उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या महिलांप्रमाणेच सर्वसाधारण गटातील महिलांनाही या संधी उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींची आरक्षित असलेल्या पंचवीस जागा वगळता उर्वरित एकशे चौदा जागा सर्वसाधारण महिलांसाठी उपलब्ध आहेत.

नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण नसल्यामुळे महिलांना या जादाच्या संधी मिळत असल्याने महापालिकेत महिलांचा टक्का नक्कीच वाढू शकतो. ज्या मातब्बर महिलांचे पूर्वीचे प्रभाग तोडले गेले आहेत, त्यांना नव्याने तयार झालेल्या आणि आपल्या पूर्वीच्या प्रभागाचा भाग असलेल्या आजूबाजूच्या प्रभागातही नशीब अजमावण्याची संधी आहे. आता पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय पक्ष आणि नेते, पुढारी आरक्षणाशिवाय महिलांना कितपत संधी देतात, हा भाग अलाहिदा!

शहरात मातब्बर महिला नक्कीच आहेत!

अनुसूचित जातीच्या महिलांमध्ये सुलक्षणा शिलवंत- धर, पौर्णिमा सोनवणे, सीमा सावळे, अश्विनी बोबडे, ममता गायकवाड, चंद्रकांता सोनकांबळे अशा महिला कोणत्याही प्रभागात नक्कीच नशीब अजमावू शकतात. अनुसूचित जमातींमध्ये माजी महापौर शकुंतला धराडे, चंदा रामा लोखंडे ही नावे घेता येतील. सर्वसाधारण गटात झामाबाई बारणे, शमीम पठाण, मोना कुलकर्णी, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, अश्विनी डोके, यांप्रमाणेच उषा वाघेरे, नम्रता लोंढे, हिरानानी घुले, अश्विनी चिंचवडे आणि अशा अनेक महिलांना महिला आरक्षण अगर सर्वसाधारण गटात महापालिका निवडणुका लढण्याची संधी आहे.

अर्थात पुरुषप्रधान संस्कृतीत आणि पुरुषप्रधान राजकीय पक्षांमध्ये महिलांना कायम दुय्यम स्थान दिले जाते, हेच खरे. महिलांचा कैवार घेऊन व्यासपीठावरून टाळ्या मिळविणारे, प्रत्यक्षात महिला आरक्षणच नको, अशा भूमिकेत असल्याचे पाहण्यात आले आहे. मात्र, संधी मिळाली की, महिला देखील पुरुषी व्यवस्थेला धक्का देऊ शकते, हा इतिहास आहे. आता पिंपरी चिंचवड शहरात त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते किंवा कसे हे, महापालिका निवडणुकाध्ये नक्कीच स्पष्ट होईल.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×