स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?

भारत स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे झाली, संपूर्ण देश आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करीत आहे. सध्याच्या भाजपाई केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव प्रत्येक घरात तिरंगा लावून साजरा करण्यात यावा, असा फतवा काढला आहे. त्यासाठी संपूर्ण भारतभर भाजपाई सरकार शासकीय स्वस्त धान्य दुकानदार, मनरेगाचे पगार वाटणारे अधिकारी, तहसील कार्यालये, ग्रामपंचायती यांच्या मार्फत वीस रुपये ते पंचवीस रुपयांचा तिरंगा प्रत्येकाला विकत घ्यायला भाग पाडत आहे. हे भाग पाडणेच सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे नाही काय? मग आपण म्हणजे या देशातील यच्चयावत सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, हातावर पोट असणारी जनता, खरोखरच स्वतंत्र आहोत काय? एकावन्न वर्षांपूर्वी नामदेव ढसाळ या तरुणाने हाच प्रश्न समस्त समष्टीला विचारला होता. मात्र, तुमचे आमचे भाग्यविधाते, मायबाप केंद्र आणि राज्य सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, बुद्धिवंत, मग ते कोणत्याही विचारांचे असोत, नोकरशहा, मग ते कोणत्याही स्तरांवरचे असोत, कोणीही,  आजतागायत नामदेव ढसाळ यांच्या प्रश्नाचे उत्तर गेल्या एकावन्न वर्षात दिले नाही. 

नामदेव ढसाळ आपल्या “निमित्त १५ ऑगस्ट ७१” या कवितेत व्यवस्थेला काही प्रश्न विचारतात, आजही ते प्रश्न कायम आहेत. “स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?” किंवा त्याच्याच पुढे ते विचारतात “कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा?” लहानपणी प्रत्येक पंधरा ऑगस्टला केलेली निबंध, गाणी यांची पारायणे लक्षात ठेवून केवळ भावनाहीन पद्धतीने एक परिपाठ म्हणून शिक्षकांनी घेतलेली शाळा आठवून त्यांनी त्यातला म्हणजे सगळ्या शिक्षण पद्धतीतला फोलपणा दाखवून दिला. त्याचबरोबर “तू बराए वस्ल कर्दन आमदी, न बराए वस्ल कर्दन आमदी” या ओळी उधृत करून माणसानेच माणसांचे कर्दनकाळ होऊ नये, हे सुचवितात. १९७१ साली झालेली त्यावेळच्या पूर्व पाकिस्थान आणि आताच्या बांगलादेशातील अमानुष कत्तली, नरसंहार अधोरेखित करून तथागत गौतम बुध्द यांचा विचार बोलून दाखवतात. “स्वातंत्र्यात माणूस निराश व्हतो, कोई सागर दिल को बहलाता नही” असे विधान करताना नामदेव ढसाळ “ते कॅलेंडरवरलं जंतुजन्य खिंडार स्वातंत्र्य” म्हणत वस्तुस्थितीत आपली अवस्था दर्शवितात.

मग नामदेव ढसाळ निराशावादी आहेत काय? तर, नक्कीच नाही. स्वातंत्र्याचे अप्रूप आपल्यालाही आहे, मात्र, “स्वातंत्र्या– तू ऱ्हायला नकोस काळ्या खडकाआड,…. तू सर्वांच्या डाळरोटीवर पसर गूळखोबरं” अशी इच्छा आणि आशा बाळगून नामदेव ढसाळ स्वातंत्र्याला साद घालतात आणि म्हणतात, “तू ये आणि हा उरातला गहिवर, ज्याच्या चांदण्या तुझ्या मार्गात पसरलेल्या…….”! स्वातंत्र्य आम्हालाही मिळावेच, मात्र, ते आमच्या दैनंदिन जीवनात जाणवणारे असावे. सर्वसामान्यांचे जगणे या स्वातंत्र्यातही दुष्कर, दुर्लभ, दुभंगलेले असेल, तर हे स्वातंत्र्य समष्टीच्या काय कामाचे? मग नामदेव ढसाळ यांचा “स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे” हा प्रश्न १९७१ साली जसा अनाठायी नव्हता, तसाच तो आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अनाठायी अगर गैरलागू नाही, हे खरेखुरे, विदारक तरीही निखालस स्वयंस्पष्ट सत्य आहे.

सोबत नामदेव ढसाळ यांची कविता जोडली आहे.

। निमित्त १५ ऑगस्ट ७१ ।

पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे
रामराज्याच्या कितव्या घरात आपण हातोत
उद्गम विकास उंची संस्कार संस्कृति
कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा
कुठल्या औट घटकेत स्वातंत्र्यानं केली पारायणं                                                              माँटेसरीची
स्वप्नातल्या स्वप्नात चोरीला गेलीयत पाने फुले
कुठल्या महस्थित्यंतरानंतर कामधेनू व्यालीय
सटरफटर दु:चिन्ह
९ महिने ९ दिवस कुठल्या षंढांच्या बैलाला झालाय रेडा
कुठलं शिंगरू मेलंय येरझऱ्यानं
का नुस्त्याच केसावरून हितसंबंधात बांधल्यायत                                                                चिनीभिंती
अन्न
पाणी
वस्त्र
निवारा
आज मला २४वं वर्ष लागलंय या आपण मिळून आईचं गौरवगान गावू कारण जेव्हा सर्व राण्या सम्राज्ञा मरमिटून जातील तेव्हा एक महाराणी शेष असेल ती आई!
तिच्या जवळ असेल तिची सन्तान
फाटक्या कपाळावर अभिवादनाचा हात ठेवून
“माँ आता आम्ही डायझोन घेतोत’
कारण आई आपल्याच लेकरांची शोषिता नस्ते तर…
आम्चा काय काय ड्यू तुझ्यापास्नं
तुझ्या वावरात पिक निघालं मटकारायटरांचं
नि शिकले आबालवृद्ध एफेल वापरायचं
तू सजवलेस ज्यूडास वृक्ष
ज्यांच्या पायथ्याशी अगणित प्रेतांचा खच
मी पाहिले नाहीत महायुद्यांचे दुष्परिणाम आणि नंतर
पसरलेले संसर्गजन्य रोग
मला माहीत नाही स्त्रियांच्या गर्भात फुटलेला हिरोशिमा
किंवा हिटलर मुसोलिनीनं घुसवलेल्या माणसांच्या छातीत
खिळ्यांच्या टाचा
मी कसे १५-८-४७ ला पायलं होतं एका बाजूला
स्वच्छ निळसर आकाश
घोटा घेऊन झिंगलेले माडताड
गुलालाच्या अबिराच्या राशी
नाच घोडे लेझीम ढोल
आईच्या पिशवीतली समृद्धी

२:
स्वा
तं
त्र्य-
३ अक्षरांची उठबस लोकल रजिस्टरात
जिथं उसळपावाची दैनंदिनी आम्ही रोज खरडतो
नाहीतर गुरुजी वर्गातून हाकलून देतील
बापाची चिठ्ठी आणायला सांगतील
किंवा आईला बोलावतील
किंवा किंवा किंवा कावकावकाव
विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा
चाहे जान भलेही जाये शान न उसकी जाने पाये
कुठल्या हुकाला माझं शरीर लोंबतय
कितनी खनी कितना बावडा
मेहताजी शाम को घर आना
अबे तेरे मा के मुलुखमे लंड मारू
सत्यमेव जयते
तर या स्तंभशीर्षावर चारी दिशांना तोंडे असलेले चार सिंह आहेत खालच्या वर्तुळाकार पट्टीवर प्रत्येक सिंहाखाली धर्मचक्र कोरलेले असून मधल्या जागेत हत्ती अश्व वृषभ सिंह यांची धावती चित्रे आहेत या पट्टीच्या खाली उलट्या कमळाची रचना कोरलेली आहे हे उलटे कमळ व त्यावरील वर्तुळाकार पट्टी प्राचीन इराणी स्थापत्य शिल्पावरून घेतलेली असावी सिंहाच्या आकृती व घडण ही परकीय शैलीचा प्रभाव दर्शविते एकूण शिल्पवैभव आणि उदात्तता यांचे निदर्शक आहे कल्पना आणि कारागिरी आणि विशेषत: घासून त्याला आणलेला काचेसारखा गुळगुळीतपणा यामुळे हे शिल्प अप्रतिम झाले आहे स्वतंत्र भारताने या स्वातंत्र्यशीर्षाचा राजमुद्रा म्हणून अंगिकार केला आहे त्यावरील चक्रही मध्यवर्ती चिन्ह म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.

ठण ण ण ण ण ण ण ठण ठण ठण
शनवारी स्केचबुकं घेऊन या
नायतर धोडी केली जाईल
मास्तर मास्तर बिनखवडा
पोरं पळाली धर लवडा

३:

तांबडा तांबड्या रंगाच्या भिन्न छटा
तांबडा + तांबडा- तांबडा + जांभळा = एक रंगसंगती
तांबडा- तांबडा – नारंगी + तांबडाजांभळा }  सजातीय                                                              रंगसंगती
तांबडा+ हिरवा
तांबडा + सफेद + ?                             त्रिरंगसंगती
देवाला सगळे सारखे आहेत
तू बराए वस्ल कर्दन आमदी
न बराए वस्ल कर्दन आमदी
अवर्षण पूर भूकंप
४:

आर्थिक सामाजिक नैतिक सांस्कृतिक: विटाळ माझ्या                                                                आईचा
मला मधुमेह झालाय
माझ्या शिश्नातून साखर जातेय
माझ्या सिफिलिससाठी डॉक्टर मागवा
फॉरीनरिटर्न
संस्कृतीचा उत्कर्ष हास मी येथलं काय काय वाचलय
मारुतीनं आपली शेपटी वाढवली नंतर शेपटीला धरून    वानरं पालिकडल्या टोकाला गेली समुद्र पार केला          मारुतीची शेपटी भीमाला उचलंना थूः                          मी येथं का जगतोय कशासाठी जगतोय                       मी येथं फुकट गेलोय– छी:

 जे जे म्हणून मानवी त्यातले काहीही मला परावे नाही– तर हे मार्क्सवाद्यांना अमानवी समजून नाकं मुरडणाऱ्यांना आधी सांगितलं पाहिजे अन् त्या जोडीनं स्वतःला मार्क्सवादी म्हणविणाऱ्यांनाही जेव्हा अंदाजअडाखे कल्पना संपतात तेव्हा प्रत्यक्ष जीवनात खरेखुरे वस्तुनिष्ठ सप्रमाण शास्त्र सुरू होते दारूगोळा व तोफाबंदुकांच्या शेजारीच अँचिलस बसू शकतो का? छापखान्याच्या वाफेच्या यंत्राच्या जमान्यात इलियड निर्माण होऊ शकते का? म्हणूनच महाकाव्यनिर्मितीला आवश्यक असलेली भूमी नष्ट होत नाही का ?
बांगलादेशमध्ये अमानुष हत्याकांड चालले आहे
प्रेतं नदीतून वहात जातात नदीचं पाणी लालीलाल लालीलाल
काठाला लागलेल्या प्रेतांवर
कावळे बसतात गिधाडे बसतात
आतडी काढतात खातात
डोळे काढतात खातात
नाक काढतात खातात
कान काढतात खातात
इंद्रिय काढतात खातात
बुद्ध आला त्याच्या हातात एक प्रेत होतं त्यानं प्रेताच्या पाठीवरून हात फिरवला स्मित केले एकही शब्द उच्चारला नाही आम्हाला त्याचा अर्थ कळला आणि आम्ही
उत्तर + दक्षिण + पूर्व + पश्चिम
कुणीकडेच गेलो नाही
फक्त निराश झालो
स्वातंत्र्यात माणूस निराश व्हतो
कोई सागर दिल को बहलाता नही
५:

पाद्री व्हाइटफिल्डसारखे आपुन किती वेळा स्वच्छ व्हतो
आंघुळ करतो
माझ्या खिडकीच्या काचेवर मी लिहितो
मला गुन्हे अबोध असोत
मला गुन्हे अबोध असोत
लेडी मॅक्बेथ तुझ्या हातावर
साकळलेलं रक्त धुवायला
माझ्या पिपात पाणी नाही
कारण आमच्या स्वतंत्र देशात
१ तांब्याला १० पैसे पडतात
गोळाबेरजीत वात्स्यायनाची स्वरूपं दिसतात
मजूर हमाल सिनेमास्कोपात ८४ ब्लू शिखा पहातात
उदासवस्त्या जात्याखाली भरडल्या जातात
आणि सायलन्सझोनमध्ये मी संतासारखा निर्विकार
स्वातंत्र्य आलंच नाहीतर आम्ही सुराज्याचं
झाड हालवतो
प्राणाच्या स्वातंत्र्यासाठी जीभ छाटली जाते
ते कॅलेंडरवरलं जंतुजन्य खिंडार स्वातंत्र्य
वाहने डाव्या बाजूने हाकावीत
डाव्या बाजूने चालावे हिर्वा सिग्नल पडला तर जायचे
लाल सिग्नल पडला तर थांबायचे
गांधीसारखा सत्पुरुष हाताळायला मिळ्ळा तर
माझंही मुकंबहिरं आंधळं माकड होईल                        आज २४  वर्षांनंतरमाझ चेहरा पुन्हा उजळतोय :                                         पाघळून  मेण बाजूला होतंय          माझा बाप माझ्याबद्दल निराशहे                                  माझा समाज माझ्याबद्दल निराशहे                              प्रत्येक फुगा टाचणी लागल्याबरोबर फुटतोय                  स्वातंत्र्या- तू ऱ्हायला नकोस काळ्या खडकाआड
तू झोपायला नकोस स्वच्छ इस्तरीच्या गालीच्यावर
तूझ्या पिलावळीत नकोत चिरडायला आम्चं पुंबीज
तुझ्या सस्यश्यामला कुशीत नकोत उगवायला पोल्सनी                                                            घागरी
तू सर्वांच्या डाळरोटीवर पसर गूळखोबरं
मी तुझ्यासोबत फायपीस बेलबॉटम
विकासून हाडकी हाडवळा पुन्हा हाक मारतोय तुला
तू ये आणि हा उरातला गहिवर
ज्याच्या चांदण्या तुझ्या मार्गात पसरलेल्या
तू ये झोळणा घेऊन ज्यात पान
सुपारी
कात
चुना
लवंगा अस्तर

■■■■■

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×