अजितदादांच्या हातात आसूड!

महात्मा फुलेंनी ड्युक ऑफ कॅनॉट (इंग्लंडचे राजपुत्र) यांची भेट घेताना सर्वसामान्य भारतीय कसा जगतो आहे, याचे चित्र उभे करणारा पोशाख १८८८ साली वापरला. डोक्याला मुंडासे, खांद्यावर घोंगडी, दुसऱ्या खांद्यावर आसूड, हातात घुंगुरकाठी आणि अपरे दुटांगी धोतर असा तो पोशाख. सामान्य भारतीय इंग्लंडच्या राणीच्या राज्यात कसा अभावग्रस्त जिणे जगतो आहे, याचे चित्र उभे करण्याचा हा प्रयत्न होता. अंगभर कपडे नाहीत, खायला अन्न नाही, डोक्यावर छत नाही अशी जगणारी राणीची या देशातील रयत, आपला निर्वाह कसा करणार असा प्रश्न त्या निमित्ताने महात्मा फुलेंनी इंग्लंडच्या राजपुत्राला विचारला. हा प्रसंग आत्ता आठवायचे कारण म्हणजे परवा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे करतुम अकरतुम नेते, सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते, नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार केला. फुले मुंडासे, घोंगडी आणि आसूड म्हणजे चाबूक देऊन केलेला हा सत्कार, महाराष्ट्रातील समान्यजनांचे जगणे अधोरेखित करणारा होता, अगर हाती आसूड घेणे, अजितदादांसाठी गरजेचे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न होता, यावर शहरभर चर्चा झाली.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने अजितदादा पवार यांचा सत्कार हाती आसूड देऊन का केला असावा यावरची ही चर्चा, आसुडाभोवती बऱ्यापैकी फिरली. “कार्यकर्ता संवाद” असे नाव देऊन शहर राष्ट्रवादीने केलेला हा कार्यक्रम, स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला हवे, अन्यथा नाईलाजाने आसूड वापरावा लागेल आणि तो आसूड अजितदादांच्या हातात आहे, याची जाणीव स्थानिक नेत्यांना करून देण्याचा हा प्रयत्न होता अशी कानाफुसी सध्या शहर राष्ट्रवादीत आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांनी घातलेल्या घोळामुळेच भाजपची सत्ता आली. तिनचे सत्याहत्तर हे गणित न समजण्यासारखे आहे, हे अजितदादा पवार देखील म्हणतात. अर्थात त्यांनीच ताकद दिलेल्या मंडळींनी भाजपची सत्ता आणली, हे सर्वश्रुत आहे. मग आता हाती आसूड घेऊन पुन्हा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न अजितदादा पवार करणार आहेत काय, असा प्रश्न सामान्य मतदाराला अक्षरशः पडला आहे.

याच कार्यक्रमात भाऊसाहेब भोईर यांनी समस्त स्थानिक नेत्यांना कानपिचक्या देत सत्तेची गरज कोणाला, अजितदादांना की आपल्याला, असे विचारून दादा आपल्यासाठी काय करतील ते नंतर, आधी आपण दादांसाठी काय करणार आहोत, हे महत्वाचे आणि त्यासाठीच निर्धार गरजेचा असल्याचे अधोरेखित केले. अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी अपेक्षा ठेवणे गैर नक्कीच नाही, मात्र किमान आपल्या शहरातील तीन आमदार राष्ट्रवादीचे असण्यासाठी तुम्ही काय करणार याचा कार्यक्रम द्या, ही भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केलेली तळमळ गरजेची. ही तळमळ राष्ट्रवादीच्या ज्या स्थानिक नेत्यांच्या मनात जागणार नाही, त्यांच्यासाठी अजितदादांच्या हातात आसूड देण्यात आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करताना एकमेकांचा “कार्यक्रम” करण्याऐवजी एकमेकांसह कार्यक्रम आखण्याची गरज बोलून दाखविली आहे. आता ही गरज किती स्थानिक नेत्यांच्या डोक्यात उतरते आणि ज्यांच्या डोक्यात इतर “गरजा” घुसतील, त्यांना नीट करण्याचा काय कार्यक्रम दस्तुरखुद्द अजितदादा पवार आणि अजित गव्हाणे यांच्यासह शहर राष्ट्रवादीकडे आहे, यावरही विजयाचा निर्धार अवलंबून आहे. थोडक्यात, “निर्धार विजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा” यातील विजयाचा निर्धार मनापासून हवा. अन्यथा विसंवादी निर्धारच कायम राहील आणि पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधात बसण्याची नामुष्की येईल. 

  • ———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×