शेखर सिंह नवे प्रशासक म्हणतात, “मैं यूँ ही हवा में गोलीयां नहीं चलाता!”

अगदी अठराच महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राजेश पाटील यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्या जागी शेखर सिंह या आणखी तरुण व्यक्तीची वर्णी लागली. सगळ्यात विशेष म्हणजे, शेखर सिंह यांच्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा दर्जा कमी करण्यात आला आहे. थोडक्यात केवळ शेखर सिंह यांना या पदावर आणता यावे म्हणून महापालिकेचा दर्जा बिघडवण्यात आला. आता केवळ आयुक्तपदाचा दर्जा कमी झाला, अगर एकूणच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दर्जाविषयी शिंदे, फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या राज्य सरकारला अडचण आहे काय? याबाबत वेगळे संशोधन करण्याचा मनसुभा ठेऊन नवनियुक्त महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांचे स्वागत करण्यात येत आहे. आता हे नवनियुक्त आयुक्त प्रशासक म्हणून काम करतात की या शहराचे शासक होतात, हे पाहणे गरजेचे. कारण आपल्या पहिल्याच परिचयाच्या पत्रकार परिषदेत सिंह यांनी “मैं हवा में गोलियां नाही चलाता” असे सांगून टाकले आहे. 

गुरुवार दि. १८ ऑगस्ट, २०२२ रोजी मध्यानोपरांत कार्यालयीन कामकाजाच्या शेवटच्या चरणात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवे प्रशासक आणि आयुक्त शेखर सिंह यांनी पदभार घेतला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आणि इतर अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांच्या ओळखपरेड नंतर पत्रकार परिषद घेऊन नवनियुक्त आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह आपला परिचय दिला. नेहमीप्रमाणे पत्रकारांनी तुम्ही काय आणि कसे काम करणार, हे विचारल्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी, अजून माहिती करून घेतल्यावर यावर खऱ्या अर्थाने बोलत येईल, असे स्पष्टीकरण दिले. उगाचच काहीतरी सांगण्यापेक्षा व्यवस्थित अभ्यास केल्यावर आपण काही ठोस कार्यक्रम आखू शकतो, “मैं यूँ ही हवा में गोलियां नहीं चलातां!” असेही सिंह यांनी पत्रकारांना सांगून टाकले.

संरचना अभियंता म्हणून विदेशी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सिंह यांनी शहराच्या एकूणच विकासाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा विचार बोलून दाखवला आहे. हे शहर विकसनशील असून विकासाच्या अनेक संधी येथे उपलब्ध आहेत. या संधी वापरून शहराचा अजून कसा विकास साधता येईल, यावर काम करण्याची तयारी असल्याचे नवे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना शहराची आणि इथल्या एकूणच प्रश्नांची माहिती करून घेतल्यावर नक्की दिशा ठरवून काम करता येईल असे कदाचित नवनियुक्त आयुक्तांचे म्हणणे असावे. मात्र, हवेत गोळीबार करणार नाही, म्हणजेच उगाचच्या वल्गना करणार नाही, ठोस आणि शाश्वत काम करण्यावर भर देणार असे सिंह याचे म्हणणे असावे.

तो अब निशाना लगाकर गोलियां मारियें!

नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना मग असे निशाणा साधून गोळ्या मारण्याची सोय आणि संधी उपलब्ध आहे काय? होय, तशी ती नक्कीच आहे. पिंपरी चिंचवड शहर हे विकसनशील शहर असल्याने, येथे विकास करण्याच्या आणि विकास होण्याच्या अनेक जागा आणि संधी आहेत. अगदी सिंह यांच्याच भाषेत बोलायचे झाले तर, या शहराच्या प्रशासनाचे “ब्रेड बटर इशुज” देखील सिंह यांनी हातात घेतले तर या शहराचा रहिवासी आणि अर्थात मतदार सिंह यांना नक्कीच चिरकाळ लक्षात ठेवील. या ब्रेड बटर इशूजची माहिती त्यांना करून दिली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करणे या शहरातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेतून काही मुद्दे उपस्थित करण्याचा हा प्रयत्न.

सर्व प्रथम या शहराचा मुद्दा म्हणजे गेली दहा वर्षे रेंगाळलेला २४×७ म्हणजेच दररोज पूर्णवेळ पाणीपुरवठा. अनेक नावांच्या योजना आल्या, स्मार्टसिटीची चर्चा झाली, अजूनही तीस टक्के काम बाकी आहे. तोच प्रकार मलजल शुद्धीकरण प्रकल्पाचा. अजूनही शहराचे चाळीस टक्के सांडपाणी सरळ पवना, इंद्रायणी, मुळा नदीत सोडले जात आहे. स्मार्टसिटीच्या एकंदर प्रकल्पात जनासामान्यांच्या गरजेपेक्षा अधिकारी आणि ठेकेदारांना काय हवे याचाच विचार जादा केला जातो आहे. महापालिकेच्या एकंदर कारभारात सल्लागारांना उत आला आहे. सल्लागार मंडळीच महापालिका चालविते किंवा कसे, असे दृश्य आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली ठेकेदार पोसण्याची प्रक्रिया केली जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके कशी द्यायची यावर अजूनही एकमत होत नाही.

थोडक्यात Direct Shoot करण्यासारखे अनेक निशाणे महापालिकेत आहेत. ज्यांचा वेध घेतला तर, शहराचे प्रश्न मार्गी लागू शकतील, शहरवासीयांना दिलासा मिळेल. पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त आणि प्रशासक म्हणून रुजू झालेले शेखर सिंह आता कशाकशावर निशाणा साधताहेत, हे येणाऱ्या काळात कळेलच. तूर्तास शेखर सिंह यांना गोळ्या झाडण्यासाठी योग्य ठिकाणे सापडोत, त्यांच्या गोळ्या हवेत वाया जाऊ नयेत, याच सरळ साध्या अपेक्षा!

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×