चिंचवडच्या मैदानात सर्वपक्षीय गोची, उमेदवारीचा संभ्रम कायम?

येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक होते आहे. उण्यापुऱ्या अठ्ठावीस दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र, निवडणुकीचे दावेदार, भाजप आणि त्यांचे प्रमुख विरोधक यांच्यात उमेदवार कोण याचा संभ्रम अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. भाजपाई आमदार लक्ष्मणभाऊ जगताप याच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या घरातील नक्की उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्तात आहे. निवडणूक त्यांचे बंधू शंकरराव लढवतात की त्यांच्या पत्नी अश्विनी यावर तर्कवितर्क चालू असतानाच खुद्द लक्ष्मणभाऊंच्या कुटुंबातही आपसी ताळमेळ नसल्याचे चित्र समोर येत आहे. लक्ष्मणभाऊंच्या समर्थकांमध्ये शंकरराव आणि अश्विनीजी याच्या पाठीराख्यांचे सरळ गट तयार झाल्याच्या चर्चा असून दोनही बाजूचे पाठीराखे उमेदवरीवर हक्क सांगत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याचाच परिपाक म्हणून नुकतेच जिल्ह्याचे भाजपाई पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्वतायरीच्या आडून लक्ष्मणभाऊंच्या कुटुंबात वाद नसल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 

भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याने त्यांच्या विरोधकांमध्ये देखिल अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, की मागच्या वेळसारखे अपक्षाला पाठिंबा याबाबत अजून चर्चाच सुरू झाली नाही. राज्यात महाविकास आघाडीत देखील अजून यावर साधा उल्लेखही आला नाही. तशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक व्हावी म्हणून आग्रह धरला आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत चिंचवड विधानसभेची ही पोट निवडणूक एक सर्वपक्षीय गोचिची बाब होऊन बसली असल्याचे चित्र मतदारांमध्ये निर्माण झाले आहे. 

लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चाही या दरम्यान सुरू झाली आहे. भाजपतर्फे कोणाला एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याला उमेदवारी देण्यास सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेची ही पोट निवडणूक कुटुंब कलहामुळेच गाजणार की काय, अशीही शक्यता निर्माण होते आहे. मात्र, अशा परिस्थितीत, आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे काय, हा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. लक्ष्मणभाऊंच्या हयातीत २००९ पासून विधानसभेत आमदार होण्यासाठी तुंबलेल्या उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला असला तरी, लक्ष्मणभाऊंच्या कुटुंबातील कोणी राष्ट्रवादीकडे आल्यास राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार नक्की काय पवित्रा घेतात, याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी अजितदादांनी लक्ष्मणभाऊंना आणि त्यांच्या समर्थकांना झुकते माप दिल्याचे सर्वश्रुत आहेच.

प्रत्येक निवडणुकीत असते, तसे हौसे, नवसे, गवसे यांचे प्रमाणही या निवडणुकीत किती असेल ही बाब अजून अलाहिदा! वस्तुतः ही निवडणूक एकास एक होणे राष्ट्रवादी अगर भाजप विरोधकांच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे. तसे झाले तर भाजप आणि त्यांचे विरोधक या दोहोंनाही आपली खरी कुवत कळून येईल. चिंचवड विधानसभेची ही निवडणूक येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांची नांदी ठरणार असल्याने अत्यंत महत्वाची आहे.

उद्या म्हणजे दि. ३१ जानेवारीपासून निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसह उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना या आठवड्यातच निर्णय घ्यावा लागेल, हे खरे. आता अजितदादांना लक्ष्मणभाऊंचा गहिवर येतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार, की महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला रोखून धरण्याचा प्रयत्न करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, त्याही पुढे जाऊन चिंचवड विधानसभेची ही पोट निवडणूक कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबात कुटुंबकलह निर्माण करणारी ठरणार काय, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×