भाजपच्या विरोधात लढणार कोण, राष्ट्रवादी काँग्रेस की महाविकास आघाडी?

कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होते आहे. भाजपची निवडणुकीची तयारी करणारी आणि तळच्या मतदारांपर्यंत पोहोचणारी यंत्रणा कायम तयार असते, शिवाय थोड्याशा प्रयत्नात ती पुन्हा कार्यान्वित करता येते. मात्र, भाजपकडून सत्ता हस्तगत करण्याची इच्छा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडणूक काळात वापरात येणारी कोणतीही व्यवस्था नाही. जी यंत्रणा राबविली जाते, ती प्रत्येक उमेदवाराची स्वतःची यंत्रणा असते. उमेदवार ठरल्यावर ही यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे घरोघर उमेदवार पोहोचणे या बाबतीत भाजप कायम आघाडीवर असतो. उमेदवार निश्चिती लवकर झाली, तर उमेदवाराला यंत्रणा राबवायला संधी आणि वेळ मिळेल. मात्र भाजप विरोधातील प्रमुख दावेदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीत अजूनही थंडा मामला आहे. शहरातील सत्ता हवी असल्यास वेगात आणि वेळेत निर्णय घेणे अगत्याचे असतानाही भाजपच्या निर्णयाची वाट पाहणे सध्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीत सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढणार कोण राष्ट्रवादी काँग्रेस की महाविकास आघाडी ही बाब अजूनही गुलदस्तात आहे.  

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये ही चिंचवड विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काही लांब पल्ल्याच्या शर्यतीतील वारू नक्कीच आहेत. मात्र, केवळ वेळ पुरळ नाही म्हणून उत्तरपत्रिका अर्धवट सोडून देणाऱ्या हुशार विद्यार्थांसारखी या उमेदवारांची अवस्था आहे. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे यांच्या जोडीने मयूर कलाटे यांचेही नाव या लांब पल्ल्याच्याया शर्यतीतील वारूंमध्ये आता समाविष्ठ झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे याचे नाव आहेच, मात्र वेळ दवडल्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थांसारखी या मंडळींची अवस्था होऊ नये म्हणजे झाले. 

येत्या दोन अगर तीन फेब्रुवारी दरम्यान महाविकास आघाडीची बैठक घेण्याची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. या बैठकीत चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत नक्की काय करायचे याचा आराखडा ठरणार आहे. यापैकी कोणता मतदारसंघ कोणी लढवायचा हे निश्चित करण्यात येईल आणि त्यानंतर आघाडीतील पक्ष आपला उमेदवार ठरवतील. या दोनही मतदारसंघात विरोधकांना वेळ मिळू नये म्हणून वेगात हालचाली करून राज्यातील सत्ताधारी भाजपाईंनी निवडणूक जाहीर केली आहे. भाजपच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीत देखील वेगवान हालचाली होणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही महाविकास आघाडी बैठकांमध्येच अडकून पडले आहे.

आपले लांब पल्ल्याच्या शर्यतीतील वारू उगाच पळून दमू नयेत म्हणून महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची बैठक युद्धपातळीवर होणे अपेक्षित आहे. भाजप या निवडणुकीत काय करणार यावर लक्ष ठेऊन निवडणुकीची रणनीती आखणे महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकते, याचा विचार झाला पाहिजे. आघाडीकडे लायक उमेदवार नाहीत असे नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय पाठिंब्यावर अपक्ष लढलेले राहुल कलाटे, २०१४ मध्ये लढलेले राहुल कलाटे यांसह लढलेले मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, २००९ मध्ये साक्षात अजितदादांच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या लक्ष्मणभाऊंना धीराने तोंड देणारे भाऊसाहेब भोईर यांसह नव्या उमेदीचा वारू म्हणून मैदानात उतरलेले मयूर कलाटे यांसारखे उमेदवार महाविकास आघाडीकडे आहेत. मग भाजपच्या निर्णयावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंभू निर्णय घेणे आणि निवडणूक एकास एक होण्यासाठी प्रयत्न करणे हे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हिताचे आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×