पोट निवडणुकीत भाजप गाळात, शिवसेनेचा वाद भोवणार!

शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे फडणवीस यांचे राज्यातील सरकार वाचण्यास सहाय्यीभूत असले तरी, हा निर्णय जनसामान्यांच्या मनातील भाजप बद्दलचा आकस वाढविणाराच ठरला आहे. निवडणूक आयोगासारखी शासकीय स्वायत्त यंत्रणा आपल्याला हवी तशी वाकविण्याची भाजपची पद्धत, भाजप लोकशाहीवादी नाही, हे ठरविणारी असल्याची भावना सामान्य मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. तशातच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड मधील चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्या पोट निवडणुकीने निर्णायक वेग घेतला असताना झालेला हा निर्णय भाजपला पिछाडीवर ढकलणारा ठरला आहे. तसाही या दोनही निवडणुकीत भाजपचा विजय होणे काहीसे अवघड असतानाच शिवसेना गाळात घालण्याच्या प्रयत्नात भाजप स्वतःच गाळात जाणार असल्याचे दृश्य निर्माण झाले आहे. 

या शहराला शिवसेनेची एक मोठी परंपरा आहे. हे पिंपरी चिंचवड शहर ज्यावेळी हवेली तालुक्याचा भाग  होते, तेव्हापासून म्हणजेच १९९५ आणि १९९९ असे सलग दोनदा या शहराने शिवसेनेचे आमदार निवडून दिले आहेत. त्यानंतर शहरात तीन आमदार झाल्यावरही पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. एव्हढेच कशाला, २००९ साली हद्द बदलानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल, पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा एक मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून सलग तीनदा येथून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेशी नाळ जोडलेला एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे, हेच यामागचे मूळ गमक आहे. मात्र, शहरातील शिवसैनिकांना विश्वासघात पसंत नाही, हे राज्यातील एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या उमेदवारीवर सलग दोनदा मावळचे खासदार झालेले श्रीरंगअप्पा बारणे यांना झालेली “ग” ची बाधा आपल्या निष्ठा एकनाथ शिंदेंच्या चरणी अर्पण करण्यास भाग पडणारी ठरली आहे. मात्र, त्यांच्यामागे पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक गेला नाही, हे नितकेच महत्त्वाचे आहे. मूळचा शिवसैनिक कधीही गद्दार अगर विश्वासघातकी नाही, हेच खरे. या शहरात श्रीरंगअप्पा बारणे यांच्या कळण्याच्या वयाअगोदर या शहरात शिवसेना अस्तित्वात होती. कामगार नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात घरमालक भाडेकरू वादातून भाडेकरूंच्या प्रश्नांवर लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म १९७३ च्या सुमारास झाला. लढावू बाण्यातून तयार झालेल्या या शहरातील शिवसैनिकांची नाळ अनेक स्थित्यंतरानंतरही तुटलेली नाही. २००९ साली गजानन बाबर आणि २०१४, २०१९ साली श्रीरंगअप्पा बारणे मावळचे खासदार होऊ शकले ते शिवसैनिकांच्या जोरावरच.

आता हा बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी जोडला गेलेला शिवसैनिक भाजपवर पूर्णतः नाराज आहे. भाजपने प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून शिवसेनेच्या मुळावरच घाव घातला असल्याची भावना शहरातील शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे श्रीरंगअप्पा बारणे जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन भाजपाई झाले असले तरी आणि आपली २०२४ ची खासदारकी अबाधित ठेवण्यासाठी भाजपचे मिंध्ये झाले तरी शहरातील सामान्य शिवसैनिक त्यांच्या सांगण्यावरून भाजपला चिंचवड विधानसभेत मदत करतील ही बाब पूर्णतः अशक्यप्राय आहे.

अगोदरच गोत्यात आलेल्या भाजपला शिवसेनेविरुद्धचा हा निर्णय अजून गाळात घालण्याचीच शक्यता अधिक. प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरून आणि त्या यंत्रणांच्या प्रमुखांना पद गेल्यावर पुन्हा प्रस्थापित करण्याचे आमिष दाखवून भाजपाई लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचे अगदीच नजीकच्या उदाहरण निवृत्त न्यायाधीश सय्यद अब्दुल नजीर यांचे देत येईल. बाबरी रामजन्मभूमी वाद आणि नोटबंदीवरील सर्वोच्य न्यायालयातील खटल्यात भाजपाई सरकारच्या बाजूने निर्णय देणाऱ्या सय्यद अब्दुल नजीर यांना गेल्याच आठवड्यात भाजपने आंध्र प्रदेशचे राज्यपाल पद बहाल केले आहे. शिवसेनेच्या बाबतीतही भाजपला हवा तसा निर्णय देणारे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार भविष्यात एखाद्या लाभाच्या पदावर बसणार हेही शाश्वत सत्य आहे. 

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×