ते देश विकताहेत, हे शहर विकणार काय?

भाजपाई केंद्र सरकारने गेल्या पंच्याहत्तर वर्षातील भारताचा विकास आपल्या धनको व्यापाऱ्यांना विकून टाकला आहे. अगदी रेल्वे पासून लढाऊ विमानांपर्यंतचे व्यवसाय अदानी, अंबानी सारख्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा पराक्रमी विकास आता देश पाहतो आहे. मात्र, नुकतेच दक्षिण बेंगळुरूचे तरुण तडफदार वगैरे असलेले लक्या सूर्यनारायण तेजस्वी उर्फ तेजस्वी सूर्या नावाच्या भाजपाई खासदारांनी मोदीजींसारखा विकास साधण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला मतदान करा, असे आवाहन केले आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो हा की, मग मोदीजींच्या सरकारने जसे देशातील सरकारी, निमसरकारी उद्योग विकले तसे या शहरातील भाजपाईंनी पिंपरी चिंचवड शहर विकायला काढायचे काय, याचे उत्तर काही या तेजस्वी महोदयांनी दिले नाही. पण मग मोदीजींसारखा विकास करायचे म्हटले तर, प्रशासकीय व्यवस्था विकणे आले आणि पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या पांच वर्षातील भाजपाई कारभार पाहता, इथले भाजपाई नक्कीच शहर विकायला काढतील, असा होरा जाणकार व्यक्त करताहेत. 

फार लांब इतिहास खोदण्याची आवश्यकता नाही, २०१७ मध्ये या शहरात भाजपाई सत्ताधीश झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला स्वैराचारी, भ्रष्टाचारी, अनाचारी कारभार पहिला तर मोदीजींनी देश विकायला काढला, त्याच धर्तीवर शहरातील भाजपाई नक्कीच आख्खे पिंपरी चिंचवड शहर आपल्या सग्यासोयऱ्यांना, बगलबच्च्यांना विकून टाकतील याबाबत कोणालाही दुमत असणार नाही. कसा कारभार या शहरात भाजपाईंनी केला, यावर एक धावती नजर टाकली तरी, पूर्ण सत्ता आल्यावर ही मंडळी काय करतात हे स्पष्ट होऊ शकते. पूर्ण सत्ता असताना शहरातील भोसरी आणि चिंचवडच्या आमदारांनी सरळसरळ दोन वाटे घालून शहर वाटून घेतले. हे वाटे घातल्यावर संडास साफ करण्यापासून पूल बांधण्यापर्यंतचे ठेके आपल्या नातेवाईक, सगेसोयरे, हितसंबंधितांना अक्षरशः वाटले. ठेके शहराबाहेरच्या मोठ्या कंपन्यांंच्या, उद्योगांच्या नावाने घ्यायचे आणि त्याची कामे मात्र, धाकदपटशा दाखवून स्वतःच्या लोकांना मिळतील अशी सोय करायची हा उद्योग गेल्या सहा वर्षात भाजपाईंनी शहरात केला आहे.

अगदी विद्यार्थ्यांच्या खावटीतही आणि कोरोना काळातील साहित्यातही या मंडळींनी भ्रष्टाचार केला आहे. प्रशासनाला हाताशी धरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामांची किंमत वाढवायची आणि जादाचा मलिदा आपल्या हितासंबंधितांना वाटायचा असा कारभार या शहरातील भाजपाई आमदारांनी केला आहे. आता या मंडळींना शहरावर पूर्ण ताबा हवा आहे. त्यासाठी चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समस्त भाजपाई जीवाचा आटापिटा करताहेत. या मंडळींना या शहराच्या विकासासाठी सत्ता नको आहे, तर या विकासाचा मलिदा स्वतःला आणि स्वतःच्या बगलबच्च्यांना पोसण्यासाठी हवा आहे. यांना या शहराविषयी आणि शहरातील समान्यजनांविषयी काहीही घेणेदेणे नाही. आपली ठेकेदारी आणि भागीदारी अबाधित राखण्यासाठी शहरात निरंकुश सत्तेची यांची हाव इतकी मोठी आहे, की कालवश लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनापूर्वीच पोट निवडणूकीची तयारी यांनी सुरू केली होती की काय आणि ही समस्त भाजपाई मंडळी त्यांच्या निधनाचीच वाट पाहात होते की काय असा स्पष्ट संशय निर्माण होतो आहे.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×