पोट निवडणुकीमुळे राज्यातील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात!
चिंचवड आणि कसबा विधानसभेची येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणारी पोट निवडणूक महाराष्ट्र राज्यातील शिर्षस्थ भाजपाई नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे भाजपाई प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या तीनही नेत्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. या दोन्ही निवडणुकांतील भाजप उमेदवाराचा जय पराजय या तीनही नेत्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करू शकतो. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नुसते निवडून येऊन चालणार नाही, तर ते मोठ्या फरकाने विजयी झाले पाहिजेत. अन्यथा या तीनही नेत्यांचे पक्षातील स्थान धोक्यात येणार आहे. मात्र, या दोनही मतदारसंघात भाजपला म्हणावा तसा मतदारांचा कौल अजूनही मिळत नसल्यामुळे या तीनही नेत्यांची हवा पातळ झाल्याची चर्चा भाजपच्या आतल्या गोटात सुरू असून हे तीनही नेते हवालदिल झाले आहेत.
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री आणि नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी आले. या सर्व प्रचारफेऱ्या आणि प्रचारसभा सुरळीतपणे पार पडून मतदारांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून यंत्रणा तयार करून त्या यंत्रणा कामालाही लावण्यात आल्या. प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमांचा शक्य तेव्हढा वापरही करण्यात आला. मात्र एव्हढे करूनही या दोनही मतदारसंघातील पोट निवडणुकीत म्हणावा तसा माहोल तयार करण्यात भाजप अजूनही यशस्वी ठरली नाही. कसबा विधानसभा मतदारसंघात प्राणवायूच्या नळकांड्यासह खासदार गिरीश बापट यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याची नामुष्की भाजपाईंवर आली. यातच निवडणूक भाजपला किती आणि कशी अवघड आहे याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, कसब्यातील उमेदवार चुकला, हे भाजपनेच निश्चित करू टाकले असल्याची चर्चा होते आहे.
त्यामुळे भाजपने आता चिंचवड मध्येच आपली पूर्ण ताकद लावली असली तरी, अपेक्षित साध्यापर्यंत अजूनही भाजपची निवडणूक आली नाही. गेल्यावेळी म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बऱ्याच स्थानिकांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांना मदत केली होती, हे उघड गुपित आहे. त्यावेळच्या मतदार केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी पहिली तरी ही बाब स्पष्ट होईल. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात आहे. शिवाय आपल्या भागात या पोट निवडणूकीत किती मते पडली, यावर राष्ट्रवादीच्या मतदारसंघातील नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार स्वतःची यंत्रणा चिंचवडच्या या पोट निवडणुकीत वापरीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपला मिळणारी रसद यावेळी मिळणार नाही, असे दृश्य स्वरूपात तरी दिसते आहे. आता चिंचवडची ही निवडणूक भाजपसाठी सोपी राहिलेली नाही, हे ठामपणे सांगता येईल.
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक त्यामुळे भाजपसाठी सरळ आणि सोपी मूळीच राहिलेली नाही. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. या दोनही मतदारसंघात भाजपच्या दुर्दैवाने वेगळा निर्णय लागला तर भाजपच्या राज्यातील शिर्षस्थ नेत्यांची नक्कीच नामुष्की होईल आणि महत्त्वाचे म्हणजे भाजप दुर्दैवी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. उमेदवार पडले तर कहरच होईल, त्याहीपेक्षा निसटता विजय जास्त जिव्हारी लागणारा असणार आहे. देशातील शिर्षस्थ नेत्यांनी राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी हवी तशी पार पडली नाही तर, या तीनही नेत्यांना जाब विचारला जाईल. दुर्दैवाने काही वेगळे घडले तर या तीनही नेत्यांची एकूणच राजकीय करकिर्द धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
———————————————————-